लष्करी मुत्सद्देगिरीला बळकटी देणार जनरल द्विवेदी यांचा नेपाळ दौरा

0
जनरल
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल उपेंद्र द्विवेदी पुढील आठवड्यात नेपाळच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा दोन्ही देशांमधील कायमस्वरूपी लष्करी भागीदारीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या दौऱ्यामुळे भारत-नेपाळ लष्करी संबंधांची ऐतिहासिक आणि धोरणात्मक सखोलता अधोरेखित होणार आहे. हे संबंध गेल्या शतकभरापेक्षा अधिक काळापासून विकसित झाले असून  प्रादेशिक सुरक्षा आणि सहकार्याला चालना देत आहेत.
भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक मुद्द्यांवर आधारलेले आहेत. याशिवाय प्रादेशिक सुरक्षा वाढवण्यासाठी हे संबंध एक भक्कम लष्करी भागीदारीत बदललेले आहेत. संयुक्त लष्करी प्रशिक्षण, सराव आणि प्रादेशिक तसेच जागतिक सुरक्षा आव्हानांवर चर्चा यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून हे बंध आणखी मजबूत करणे हा जनरल द्विवेदी यांच्या भेटीचा उद्देश आहे.
मुख्य मुद्दे : संरक्षण आधुनिकीकरण आणि प्रशिक्षण
नेपाळ आणि भारताच्या संरक्षण सहकार्य, सामायिक प्रशिक्षण कार्यक्रम आणि आधुनिकीकरण उपक्रम यांच्यात होणारी नियमित देवाणघेवाण हे याचे वैशिष्ट्य आहे. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात द्विपक्षीय कार्यक्रमांद्वारे लष्करी क्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.
यावर्षी, भारताने 300 हून अधिक नेपाळी जवानांना बंडखोरीचा प्रतिकार करणे, शांतता राखणे आणि नेतृत्व विकास यावर लक्ष केंद्रित करणारे विशेष प्रशिक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे, भारतीय लष्कराच्या जवानांना नेपाळमधील प्रगत अभ्यासक्रमांचा फायदा होतो, जे व्यावसायिक विकासासाठी परस्पर वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
डिसेंबरमध्ये होणार संयुक्त लष्करी सराव
भारत-नेपाळ लष्करी संबंधांचा पाया म्हणजे दरवर्षी होणारा ‘सूर्य किरण’ नावाचा संयुक्त सराव, जो दहशतवादविरोधी, आपत्ती निवारण आणि मानवतावादी सहाय्यावर केंद्रित आहे. दोन्ही सशस्त्र दलांमधील आंतरसंचालनीयता वाढविण्याच्या उद्देशाने विस्तारित व्याप्तीसह या सरावाच्या 18व्या आवृत्तीचे डिसेंबर 2024 मध्ये नेपाळमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
संयुक्त सरावांव्यतिरिक्त, भारत लहान शस्त्रे, वाहने आणि प्रगत प्रशिक्षण सिम्युलेटर पुरवून नेपाळच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो. नेपाळ-भारत सुरक्षा मुद्यांवरील द्विपक्षीय सल्लागार गट (एनआयबीसीजीएसआय) सारख्या माध्यमातून केलेल्या सहयोगात्मक प्रयत्नांमुळे उपकरणांच्या गरजा आणि धोरणात्मक आव्हाने दूर करण्यासाठी ही भागीदारी आणखी मजबूत झाली आहे.
नेपाळ भारताच्या लष्कर प्रमुखांना जनरल पद बहाल करणार
दोन्ही देशांमधील एक चिरस्थायी परंपरा म्हणजे एकमेकांच्या लष्करप्रमुखांना जनरलचा मानद दर्जा प्रदान करणे, जे त्यांच्या सामायिक वारशाचे आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक आहे. जनरल द्विवेदी यांच्या भेटीमुळे ही परंपरा बळकट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे दोन्ही सैन्यांमधील खोलवर रुजलेल्या मैत्रीची पुष्टी होईल.
नेपाळमध्ये 88 हजारांहून अधिक भारतीय लष्कराच्या माजी सैनिकांची उपस्थिती या संबंधांना आणखी बळकटी देते. शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रात सक्रिय असलेले हे माजी सैनिक दोन्ही देशांदरम्यान जिवंत सेतू म्हणून काम करतात, लोकांमधील परस्पर संबंध आणि सामाजिक तसेच आर्थिक विकासाला चालना देतात.
याशिवाय, जनरल द्विवेदी नेपाळमधील ऐतिहासिक मुक्तीनाथ मंदिराला भेट देतील अशी अपेक्षा आहे. या भेटीला भावनिक महत्त्व देखील आहे, या मंदिरात भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या स्मरणार्थ स्थापित केलेली ‘बिपीन बेल’ आहे.
प्रादेशिक सुरक्षेसाठी असणारी दूरदृष्टी
जनरल द्विवेदी यांचा हा दौरा भारत-नेपाळ लष्करी मुत्सद्देगिरीतील एक महत्त्वपूर्ण अध्याय दाखवणारा आहे, जो दहशतवाद आणि अतिरेकीवादासारख्या समान धोक्यांना तोंड देण्यासाठी सामायिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. दोन्ही देश आपली संरक्षणविषयक भागीदारी वाढवत असताना, त्यांचे सहकार्य दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्याचा आधारस्तंभ राहील.
लष्करी संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि धोरणात्मक सहकार्याला चालना देऊन ही भेट भारत-नेपाळ संबंधांची शाश्वत ताकद अधोरेखित करणारी आहे, वाढत्या गुंतागुंतीच्या भू-राजकीय परिदृश्यात परस्पर प्रगती आणि सुरक्षा सुनिश्चित करणारी आहे, असे निरीक्षण भारतीय लष्कराच्या सूत्रांनी नोंदवले. 

रवी शंकर


Spread the love
Previous articleAs Trump 2.0 Nears, End Of Conflict In Ukraine On The Horizon?
Next articleUnited Nations To Strengthen UNIFIL In Lebanon Post Ceasefire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here