इस्लामाबाद जिल्हा न्यायालयाबाहेरील आत्मघातकी स्फोटात 12 जण ठार

0
इस्लामाबाद

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे, एका स्थानिक न्यायालयाबाहेर मंगळवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात, किमान 12 लोक ठार झाल्याचे आणि अनेकजण जखमी झाल्याचे, गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी जाहीर केले.

अधिकाऱ्यांनी आणि सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायिक संकुलाच्या प्रवेशद्वारावरील एका चारचाकीमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना नक्वी यांनी सांगितले की, “कोर्टच्या इमारतीमध्ये पायी प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोराने, नंतर 10 ते 15 मिनिटे बाहेर थांबून पोलिसांच्या वाहनाजवळ हा स्फोट घडवून आणला.”

“आम्ही या घटनेची विविध दृष्टिकोनातून चौकशी करत आहोत. हा केवळ एक बॉम्बस्फोट नाहीये, तर थेट इस्लामाबादवर झालेला हल्ला आहे,” असे गृहमंत्री  म्हणाले.

रुग्णालयातील सूत्रांच्या सांगण्यानुसार, ‘हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. हा स्फोट न्यायालयीन संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाला, जो सहसा पक्षकार (litigants) आणि वकिलांनी गजबजलेला असतो.’

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये, सुरक्षा बॅरिअरमागे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली  एक चारचाकी आणि त्यातून निघणारे धूराचे लोट दिसत आहे, अशी माहिती Dawn वृत्तसंस्थेने दिली. सरकारी मालकीच्या पाकिस्तान टेलिव्हिजन (PTV) ने, हा स्फोट आत्मघाती हल्ला असल्याची पुष्टी केली आणि बॉम्बरचे डोके रस्त्यावर पडलेले आढळून आल्याचे नमूद केले.

आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही.

अफगाण सीमेजवळ असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील, वाना येथील एका कॅडेट कॉलेजवर सशस्त्र अतिरेक्यांनी रात्रीच्या वेळी केलेला हल्ला सुरक्षा दलांनी परतवून लावल्यानंतर, काही तासांतच हा बॉम्बस्फोट झाला.

इस्लामाबादमधील हल्ल्याला “वेक-अप कॉल” म्हणत, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान “युद्धाच्या स्थितीत” असल्याचे म्हटले.

एक्स (X) माध्यमावर पोस्ट करताना आसिफ यांनी लिहिले की, “या परिस्थितीत, काबूलच्या राज्यकर्त्यांसोबत यशस्वी वाटाघाटींची आशा ठेवणे व्यर्थ ठरेल.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स/एजन्सीजच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleपंतप्रधान मोदींचा भूतान दौरा: जलविद्युत क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना चालना
Next articleCNS Adm Tripathi Embarks on Official Visit to US to Strengthen Maritime Ties

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here