तैवानने चिनी तटरक्षक जहाजांना प्रतिबंधित सागरी क्षेत्रातून ‘लवकरात लवकर बाहेर पडण्याचे’ आदेश जारी केले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनच्या तटरक्षक दलाची चार जहाजे तैवानजवळ असलेल्या विवादित बेटांवर आली आहेत.
“तुम्ही आमच्या देशाच्या प्रतिबंधित सागरी क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे कृपया ताबडतोब परत जा”, असा आदेश तैवानच्या एका अधिकाऱ्याने चीनच्या या जहाजांना रेडिओद्वारे प्रसारित संदेशात दिल्याचे वृत्त आहे.
ही चिनी जहाजे किनमेन बेटांजवळ होती जी चीन प्रजासत्ताकाद्वारे शासित बेटांचा समूह आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, फेब्रुवारीमध्ये चिनी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी तैवानच्या पर्यटक क्रूझवर चढून दहशत निर्माण केली होती. चिनी कोस्ट गार्डकडून होणारा पाठलाग चुकवण्याच्या नादात दोन चिनी मच्छिमार बुडाल्यानंतर ही घटना घडली आहे.
तैवान तटरक्षक दल अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार शुक्रवारीही याच भागात चिनी जहाजे दिसली होती.
शुक्रवारी होडी उलटल्यामुळे बुडत असलेल्या एका चिनी मच्छिमाराला वाचवण्यासाठी तैवान आणि चीनने संयुक्तपणे मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर लगेचच चीनने अशी आगळीक करणे फार आश्चर्यकारक असल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.
चीनच्या तटरक्षक दलाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
गेल्या आठवड्यात, तैवानच्या मेनलॅन्ड कौन्सिलने चीनला आपल्या सागरी सीमांमधील परिस्थिती “जैसे थे” राखण्याचे आवाहन केले.
“सामुद्रधुनीतील सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे”, असे परिषदेचे उप प्रमुख आणि प्रवक्ते जान जेह – होंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जान यांनी चीनला सीबीएम (कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स) पुनरुज्जीवित करण्याचे आणि चिनी विद्यार्थी तसेच पर्यटकांना तैवानला भेट देण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले. कोविड साथीमुळे चीनने ही गोष्ट स्थगित केली होती.
यंदाच्या जानेवारीत तैवानमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये उपराष्ट्रपती लाई चिंग राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यामुळे तैवान – चीन संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मे महिन्यात लाई चिंग पदभार स्वीकारतील. मात्र तैवानच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करणारे लाई आणि गरज भासल्यास बळजबरीने तैवान परत घेईन असे सांगणारे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान समान भूमिकेवर एकमत होण्याची जवळपास शक्यता नाही.
वन चायना पॉलिसीसाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जरी म्हटले असले तरी चीनने तैवान बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर गरज भासल्यास वॉशिंग्टन लष्करी हस्तक्षेप करेल असा इशारा बायडेन यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये दिला होता.
जानेवारीमध्ये तैवानच्या निवडणुकीनंतर लगेचच अमेरिकेच्या नौदलाने तैवान सामुद्रधुनीतून आपली पहिली युद्धनौका रवाना केली.
अश्विन अहमद