
चिनी लष्करी हालचालींमध्ये वाढ झाल्याचा दावा तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी केला असला तरी बेटाच्या नैऋत्य किनाऱ्यावरील ड्रिल झोनमध्ये कोणतेही लाइव्ह फायर ड्रील आढळले नसल्याचे स्पष्ट केले.
लोकशाही पद्धतीने शासित तैवानकडे चीन स्वतःचा प्रदेश म्हणून पाहतो, त्याने बुधवारी सांगितले की चिनी सैन्याने तैवान सामुद्रधुनीच्या नैऋत्य भागात काओसिउंग आणि पिंगटुंग या प्रमुख लोकसंख्या केंद्रांपासून दूर ‘शूटिंग’साठी एक क्षेत्र तयार केले आहे.
तैवानच्या सरकारने चिनी “लाइव्ह फायर ड्रीलचा” धोकादायक, चिथावणीखोर आणि व्यावसायिक उड्डाणे तसेच नौवहनाला धोका म्हणून निषेध केला असून याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. चीनने अद्याप यावर भाष्य केलेले नाही.
मागील 24 तासांत चिनी लष्करी हालचालींच्या दैनंदिन अद्ययावत माहितीनुसार, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांना बेटाभोवती कार्यरत असलेली 45 चिनी लष्करी विमाने आणि 14 नौदलाची जहाजे सापडली आहेत. त्यात तैवानपासून 40 सागरी मैल अंतरावर असलेल्या चीनकडून घोषित ड्रिल झोनमधील सात जहाजांचा समावेश होता.
सोबतच्या नकाशामध्ये, मंत्रालयाने ड्रिल झोनचे स्थान दाखवले आहे जे तैवानी प्रादेशिक पाण्याच्या बाहेर असले तरी 70 सागरी मैल लांब आणि 20 सागरी मैल रुंद होते.
लाइव्ह फायर ड्रील आढळले नाही
तैवानच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेऊन नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, तैवानला चीनच्या ‘ड्रिल झोन’ मध्ये लाइव्ह फायरिंग झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे लष्करी तणावात आणखी वाढ झालेली नाही.
ते म्हणाले की, चीनचे हे पाऊल दक्षिण चीन समुद्र आणि ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळील चीनच्या अलीकडील इतर लष्करी हालचालींसारखेच आहे, ज्याच्याबद्दल चीनच्या नौदलाने त्यांच्या सरावाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नव्हती.
“हे अत्यंत दुर्मिळ आहे आणि म्हणूनच सामान्य अपेक्षांपेक्षा जास्त आहे,” असे चिनी सैन्याच्या पूर्वसूचना न देता सराव करण्याच्या हालचालीचा संदर्भ देत एका अधिकाऱ्याने सांगितले.
तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की चीन हा या प्रदेशातील सर्वात मोठा समस्या निर्माण करणारा देश आहे.
“परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय समुदायाला तैवान सामुद्रधुनी आणि प्रदेशाच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याचे आणि चीनच्या वारंवार तसेच एकतर्फी कृतींचा संयुक्तपणे निषेध करण्याचे आवाहन केले आहे,” असे गुरुवारी म्हटले आहे.
बुधवारी वॉशिंग्टनमध्ये बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला जबरदस्तीने तैवानवर नियंत्रण ठेवण्यास अमेरिका कधी परवानगी देईल का? या प्रश्नाच्या उत्तरात भाष्य करण्यास नकार दिला.
मात्र, फॉक्स न्यूजला दिलेल्या एका वेगळ्या मुलाखतीत, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ म्हणाले की कोणत्याही सक्तीच्या किंवा जबरदस्तीच्या परिस्थितीत तैवानला सोडून न देण्याची सरकारची दीर्घकालीन भूमिका कायम आहे.
चीनकडून हल्ला झाल्यास अमेरिका काय करेल असे विचारले असता ते म्हणाले, “अशी परिस्थिती उद्भवू नये आणि समजा उद्भवलीच तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अमेरिकेने जे वचन दिले आहे, ते पाळण्याची कुवत अमेरिकेकडे आहे आणि ते अंमलात आणले जाईल. चीनलाही याची जाणीव आहे.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)