जोसेफ वू हे ‘स्पेशल चॅनल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैठकीसाठी एका प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करत होते, असे फायनान्शियल टाइम्सने यापूर्वी वृत्त दिले होते. 20 जानेवारी रोजी व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच या चॅनलचा वापर केला.
या आठवड्याच्या सुरुवातीला, चीनच्या सैन्याने तैवानच्या भोवती दोन दिवसीय युद्ध सरावाचे आयोजन केले होते ज्यामध्ये त्यांनी पूर्व चीनच्या सागरी भागात लांब पल्ल्याच्या, थेट-गोळीबाराच्या कवायतींचे आयोजन केले होते. मात्र यामुळे तैवानभोवतालच्या सरावांमध्ये लक्षणीय वाढ झाली.
तैवानची नाराजी
अशाप्रकारचा सराव आयोजित केल्याबद्दल तैवानने चीनचा निषेध केला आहे. औपचारिक राजनैतिक संबंध नसतानाही तैवानचा सर्वात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय समर्थक आणि मुख्य शस्त्रास्त्र पुरवठादार असलेल्या अमेरिकेने या आठवड्याच्या सुरुवातीला पार पडलेलल्या सरावाचा निषेध केला.
तैवान हे अमेरिका आणि चीनमधील तणावाचा केवळ एक मुद्दा आहे. याशिवाय मानवाधिकार, कोविड-19 चे मूळ आणि ट्रम्प यांनी या आठवड्यात लागू केलेल्या उपाययोजनांसह व्यापार शुल्क यासारख्या अनेक मुद्द्यांमुळे उभय देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.
या आठवड्यात ट्रम्प यांनी लादलेल्या व्यापार शुल्कामुळे तैवानही अस्वस्थ झाला. ही शुल्क आकारणी अवास्तव असल्याचे त्याने म्हटले आहे.
अमेरिकेचा सेमीकंडक्टर व्यवसाय ताब्यात घेण्याबद्दलही ट्रम्प यांनी तैवानवर टीका केली आहे. मात्र त्याचवेळी या उद्योगाने अमेरिकेत पुन्हा सुरूवात करावी अशी त्यांची इच्छा आहे. तैवानच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटले आहे की, तैवानला ट्रम्प प्रशासनाचा “खूप मजबूत” पाठिंबा आहे.
परजीवी
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या आशिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते यांना ‘परजीवी’ म्हणत चीनने त्यांच्याविरुद्ध टीकेची झोड उठवली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या दौऱ्यात हेगसेथ यांनी वारंवार बीजिंगवर टीका केली होती.
व्हाईट हाऊस आणि अमेरिकेतील तैपेई आर्थिक तसेच सांस्कृतिक प्रतिनिधी कार्यालयाने प्रतिक्रिया देण्याच्या विनंत्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही.
लोकशाही पद्धतीची शासन व्यवस्था असणारा तैवान हा आपला स्वतःचा प्रदेश असल्याचा चीन दावा करतो. म्हणूनच त्याने वारंवार लाईचा ‘फुटीरतावादी’ म्हणून निषेध केला आहे. गेल्या वर्षी निवडणूक जिंकलेल्या लाई यांनी बीजिंगच्या सार्वभौमत्वाचे दावे कायम नाकारले असून केवळ तैवानचे लोकच त्यांचे भविष्य ठरवू शकतात हे त्यांचे मत नेहमीच व्यक्त केले आहे.
माओ त्से तुंग यांच्या साम्यवाद्यांशी गृहयुद्ध हरल्यानंतर 1949 साली पराभूत चीन प्रजासत्ताकाचे सरकार तैवान बेटावर पळून गेले तेव्हापासून तैवान चिनी आक्रमण होईल या भीतीत जगत आहे. अर्थात दोन्ही बाजूंनी गेल्या अनेक दशकांपासून रागाच्या भरात एकदाही गोळीबार करण्यात आलेला नाही.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)