अमेरिकेच्या Texas मधील पूरात 96 जणांचा मृत्यू, बेपत्ता लोकांचा शोध सुरूच

0

अमेरिकेच्या Central Texas मधील पुरग्रस्त भागातील दलदलीतून वाट काढत, शोध पथकांनी सोमवारी शोध आणि बचाव कार्य सुरु ठेवले होते, यावेळी हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी देखील केली गेली. अचानक आलेल्या पूरानंतर तेथील परिस्थीती बिकट झाली असून, अजूनही अनेकजण बेपत्ता आहेत, ज्यापैकी कुणीही जिवंत सापडण्याची आशा मावळत चालली आहे. या भीषण आपत्तीत किमान 96 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.

रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे, Texas च्या ग्वाडालूप नदीला उग्र आणि जीवघेण्या पूराचे स्वरुप प्राप्त झाले. या भीषण पुराने, ख्रिस्ती मुलींच्या एका समर कॅम्पलाही आपले लक्ष्य केले, ज्यामध्ये 27 शिबिरार्थी विद्यार्थिनी आणि मार्गदर्शकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. याच कॅम्पमधील 10 मुली आणि एक मार्गदर्शक अजूनही बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकीकडे शोध आणि बचाव पथक चिखल आणि ढिगाऱ्यांमधून वाट काढत कार्य करत आहेत, तर दुसरीकडे अधिक पावसाचा आणि वादळी हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी आलेल्या या पूरामुळे, ज्या भागात सर्वाधिक मृत्यू झाले, तो परिसर म्हणजे ग्वाडालूप नदीकिनाऱ्यावरील कर्व्हिल (Kerrville) या टेकड्यांच्या परिसरातील गाव आणि तेथील कॅम्प मिस्टिक हे शिबिराचे मैदान.

सोमवारी दुपारपर्यंत, कर्व्ह काउंटीमध्ये 84 मृतदेह सापडले, ज्यात 56 प्रौढ आणि 28 मुलांचा समावेश आहे. बहुतेक मृतदेह कर्व्हिल शहरात सापडल्याचे, स्थानिक शेरिफने सांगितले.

रविवारी दुपारपर्यंत, इतर पाच शेजारच्या काउंटीमध्ये आणखी 12 मृत्यूची नोंद झाली आणि कर्व्ह काउंटीच्या बाहेर अजून 41 जण बेपत्ता आहेत.

द न्यूयॉर्क टाइम्ससह अनेक वृत्तसंस्थांनी वेगवेगळी आकडेवारी जाहीर केली असून, काहींच्या मते एकूण मृतांचा आकडा 104 पर्यंत पोहोचला आहे.

‘पुढील आठवडा आव्हानात्मक’

अधिकार्‍यांनी अजूनही काहीजण जिवंत सापडतील अशी आशा ठेवली असली तरी, वेळ जसा पुढे सरकत आहे, तशी ती शक्यता कमी होत चालली आहे.

“रेस्क्यु टीमसाठी हा आठवडा अवघड आणि आव्हानात्मक असणार आहे,” असे महापौर जो हेरींग जूनियर यांनी सोमवारी सांगितले.

कॅम्प मिस्टिक, ग्वाडालूप नदीच्या काठावर असलेले जवळपास शंभर वर्षे जुने ख्रिश्चन मुलींचे शिबिर, या आपत्तीच्या केंद्रस्थानी होते.

“ही दु:खद घटना आपल्या कुटुंबियांप्रमाणे आमच्याही काळजाला लागली आहे,” असे कॅम्पने एका निवेदनात म्हटले.

रिचर्ड “डिक” ईस्टलँड, वय 70, जे शिबिराचे सह-मालक व संचालक होते, त्यांनी पूरातून मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमावला. त्यांच्या पत्नीसोबत त्यांनी 1974 पासून हे शिबिर चालवले होते.

अस्मानी संकट, हवामानाचा धोका

“सोमवारी एक अनपेक्षित घटना घडली, कर्व्ह काउंटीच्या पूरग्रस्त भागात एका खाजगी ड्रोनने शोधासाठी वापरण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरला धडक दिली. परिणामी हेलिकॉप्टरला आपत्कालीन लँडिंग करावे लागले. यामध्ये कुणालाही इजा झाली नाही, पण ते विमान आता वापरायोग्य राहिलेले नाही,” असे शेरिफ कार्यालयाने स्पष्ट केले.

नॅशनल व्हेदर सर्व्हिसने सोमवारी अंदाज व्यक्त केला की, “Texas हिल कंट्रीमध्ये अजून 4 इंचांपर्यंत पाऊस पडू शकतो, काही ठिकाणी हा पाऊस 10 इंचांपर्यंत जाऊ शकतो.”

मौसम तज्ज्ञ एलिसन सॅन्टोरेली यांनी सांगितले की, “आधीच ओलसर झालेली जमीन आणि नदीकाठावरील ढिगाऱ्यांमुळे नवीन पूर येण्याचा धोका अधिक आहे. रात्री 7 वाजेपर्यंत पूराचा इशारा देण्यात आला आहे.”

राज्य आपत्कालीन यंत्रणांनी, 4 जुलैच्या सुट्टीच्या आधीच चेतावणी दिली होती की, सेंट्रल टेक्सासमध्ये झपाट्याने पूर येऊ शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा दुपटीने, पावसाचे प्रमाण ग्वाडालूपच्या दोन फांद्यांवर पडले आणि सारा पाणी एकाच नदीमार्गाने कर्व्हिलमध्ये शिरले.

शहर व्यवस्थापक डॅल्टन राईस यांनी सांगितले की, ही अनपेक्षित घटना अवघ्या दोन तासांत घडली.

“आम्ही लोकांना स्थलांतरित का केले नाही? स्थलांतर ही एक नाजूक गोष्ट आहे,” असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. “उशिरा स्थलांतर केले, तर लोक वाहत्या पाण्यात फसतील, आणि त्यामुळे संकट अधिक वाढू शकते.”

राजकीय आरोप-प्रत्यारोप

AccuWeather चे मुख्य हवामान तज्ज्ञ जोनाथन पॉर्टर म्हणाले की, “अधिकाऱ्यांकडे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पुरेसा वेळ होता.”

राज्यपाल ग्रेग अ‍ॅबॉट आणि इतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या पूर परिस्थितीची सखोल चौकशी केली जाईल – हवामान अंदाज, इशारे, आणि आपत्ती व्यवस्थापन योग्य होते का यावर पुनर्विचार केला जाईल.”

सेनेट डेमोक्रॅटिक नेते चक शूमर यांनी सोमवारी एका सरकारी यंत्रणेला विचारणा केली की, ट्रम्प प्रशासनाने केलेल्या निधी कपातीमुळे अंदाज वर्तवण्यात अचूकता कमी झाली का.

सेनेटर टेड क्रूझ, रिपब्लिकन यांनी म्हटले की, “जीव वाचवण्याच्या दृष्टीने अजून काही करता आले असते का याचा विचार करायला नंतर वेळ आहे, सध्या पक्षीय आरोप-प्रत्यारोप टाळावेत.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleDAP 2020 Review Calls for Unorthodox Approach
Next articleजपान आणि दक्षिण कोरियावर 25% टॅरिफ लादण्याची, ट्रम्प यांची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here