ट्रम्प यांना चीनच्या टॅरिफ मर्यादा मान्य; जिनपिंग यांच्यासोबत बैठकीची तयारी

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केले की, चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर त्यांनी लादलेले प्रस्तावित 100 टक्के शुल्क (Tariff) दीर्घकाळ टिकवणे शक्य नाही, परंतु त्यांनी या नव्या व्यापार चर्चेतील स्थितीसाठी बीजिंगला जबाबदार धरले आहे. चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवरील निर्बंध कडक केल्यानंतर, या नव्या व्यापार कारवाईच्या चर्चेला सुरूवात झाली होती. 

‘हे अतिरिक्त शुल्क शाश्वत आहे का आणि त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो,’ असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की, “हे शाश्वत तर नाही, पण हेच आकडे समोर आहेत. चीनने मला हे करण्यास भाग पाडले आहे.” ट्रम्प यांनी फॉक्स बिझनेस नेटवर्कला दिलेली ही मुलाखत, शुक्रवारी प्रसारित करण्यात आली.

“हे निष्पक्ष असायला हवे”: ट्रम्प

ट्रम्प यांनी एक आठवड्यापूर्वीच, चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर 100 टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली होती. यासोबतच त्यांनी नोव्हेंबर 1 पासून, म्हणजे विद्यमान कर सवलतीची मुदत संपण्याच्या नऊ दिवस आधी, “सर्व महत्त्वाच्या सॉफ्टवेअर”वर नवीन निर्याती नियंत्रणे लादली.

चीनने दुर्मिळ खनिजांवरील निर्यात नियंत्रणात मोठा विस्तार केल्यानंतर, अमेरिकेची ही नवीन व्यापार कारवाई जाहीर करण्यात आली. ही खनिजे, तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादनासाठी अत्यावश्यक मानली जातात आणि या बाजारपेठेत चीन वर्चस्व गाजवतो.

ट्रम्प यांनी याचीही पुष्टी केली की, ते दोन आठवड्यांत दक्षिण कोरियामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. त्यांनी चीनी नेत्यांची प्रशंसाही केली.

“मला वाटते, चीनसोबतचे आमचे संबंध सुस्थितीत राहतील, फक्त आम्हाला न्यायपूर्ण कराराची अपेक्षा आहे. ” असे ट्रम्प यांनी FBN च्या ‘Mornings with Maria’ या कार्यक्रमात सांगितले. ही मुलाखत गुरुवारी रेकॉर्ड करण्यात आली होती.

त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत, रशिया विरुद्ध सुरू असलेल्या युद्ध समाप्तीच्या चर्चेची तयारी करत असताना ट्रम्प म्हणाले की, “चीन आमच्यासोबत संवाद साधण्यास इच्छुक आहे, आणि आम्हालाही चीनसोबत बोलायला आवडेल.”

शी जिनपिंग यांच्यासोबत भेट घेण्याच्या ट्रम्प यांच्या भूमिकेतील मवाळ सूर आणि याबाबतच्या पुष्टीमुळे, वॉल स्ट्रीटवरील सकाळच्या शेअर मार्केट घसरणीला आळा बसला. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी अचानक चीनवरील मोठ्या शुल्कांची घोषणा केली आणि प्रादेशिक बँकांच्या कर्जावरील चिंतेमुळे अस्थिर झालेल्या अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक दुपारपर्यंत वाढले.

अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी, शुक्रवारी संध्याकाळी चीनचे उपपंतप्रधान हे लीफेंग यांच्याशी व्यापाराबाबत ‘स्पष्ट आणि सविस्तर चर्चा’ केल्याचे सांगितले आणि दोघे पुढील आठवड्यात प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचेही नमूद केले.

व्यापारातील तणाव कमी करा: WTO चे आवाहन

जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) प्रमुखांनी, अमेरिका आणि चीन यांनी व्यापारातील तणाव कमी करावा, असे आवाहन केले आहे. त्यांनी इशारा दिला की, जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील संबंध तुटल्यास भविष्यात दीर्घ काळासाठी जागतिक आर्थिक उत्पादनात 7% घट होऊ शकते.

WTOच्या महासंचालक न्गोझी ओकोंजो-इवेला यांनी, रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की: “जागतिक व्यापार संस्था अमेरिका–चीन यांच्यातील वाढत्या व्यापार तणावाबद्दल अत्यंत चिंतित आहे आणि दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांशी याबबत चर्चा करण्यासाठी पुढाकार घेत आहे.”

ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या भेटीची तयारी सुरू असतानाही, हा तणाव उच्च पातळीवर कायम आहे.

चीनविरुद्ध कठोर भूमिका घ्या: अर्थमंत्री बेसेंट

शुक्रवारी, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी, ‘आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंड’ (IMF) समितीला दिलेल्या निवेदनात, चीनच्या राज्य-नियंत्रित आर्थिक धोरणांवर थेट टीका केली. त्यांनी IMF आणि जागतिक बँकेला, चीनच्या बाह्य आणि अंतर्गत आर्थिक ताळेबंदांवर तसेच औद्योगिक धोरणांविरुद्ध अधिक कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, याच धोरणांमुळे चीनने कमालीची उत्पादन क्षमता निर्माण केली असून, जगभरात स्वस्त वस्तूंचा पूर आला आहे.

शुक्रवारी, चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकेवर आरोप केला की, ‘2025 मध्ये ट्रम्प प्रशासन सत्तेवर आल्यापासून, अमेरिका नियम-आधारित बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेला कमकुवत करत आहे.’ याव्यतिरिक्त चीनने जागतिक व्यापार संघटनेत (WTO) वाद निराकरण प्रक्रियेचा अधिक आक्रमक वापर करण्याचा संकल्प व्यक्त केला.

चीनने, अमेरिकेला भेदभावविरोधी नियमांचे उल्लंघन करणारी उपाययोजना मागे घेण्याचे आणि आपली औद्योगिक तसेच सुरक्षा धोरणे WTOच्या बांधिलकांशी सुसंगत करण्याचे आवाहन केले आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला बेसेंट यांनी, लीफेंग यांच्या वरिष्ठ सल्लागारांपैकी एकावर आरोप केला होता की, अमेरिकन व्यापार चर्चेदरम्यान त्यांचे वर्तन ‘अविचारी’ होते. त्यावर प्रतिक्रिया देत चीनने म्हटने की, ‘बेसेंट यांची ही वक्तव्ये चुकीची असून, वास्तवाला चुकीच्या पद्धतीने सादर करतात.’

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleकिशोरवयीन मुलांच्या पालकांना Meta चा विशेष अधिकार, सुरक्षेचा केला विचार
Next articleघटती कर्मचारीसंख्या लक्षात घेऊन चीनने नागरी सेवेसाठी नियुक्तीचे वय वाढवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here