
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शुक्रवारी झालेली भेट अत्यंत वादळी ठरली. व्हाईट हाऊसमध्ये जागतिक प्रसारमाध्यमांसमोरच या दोन्ही नेत्यांमध्ये रशियाशी झालेल्या युद्धावरून विलक्षण खडाजंगी झाली.
तीन वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण करण्याचे आदेश देणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची बाजू घेऊ नका हे अमेरिकेला पटवून देण्याची संधी म्हणून झेलेन्स्की यांनी ओव्हल ऑफिसमधील बैठकीकडे पाहिले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी झेलेन्स्की यांना पत्रकारांसमोरच फटकारले, त्यांना अनादर करणारा नेता म्हणून संबोधले. कीवच्या सर्वात महत्त्वाच्या युद्धकालीन मित्रांशी असणारे संबंध आता रसातळाला गेले आहेत.
या वादविवादामुळे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना व्हाईट हाऊस सोडून जाण्यास सांगण्यात आले, असे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
युक्रेनच्या समृद्ध नैसर्गिक संसाधनांचा संयुक्तपणे विकास करण्यासाठी युक्रेन आणि अमेरिका यांच्यातील करारावर – ज्यामुळे कीव आणि त्याच्या युरोपीय मित्र राष्ट्रांना चांगले संबंध प्रस्थापित होतील अशी आशा होती – शेवटी स्वाक्षऱ्या झाल्याच नाहीत, त्यामुळे हा करारही आता अडचणीत आला आहे.
युरोपियन नेत्यांनी झेलेन्स्की यांच्या बचावासाठी पुढाकार घेतला आहे. जर्मन चॅन्सेलरपदाचे उमेदवार फ्रेडरिक मेर्झ म्हणाले, “या भयंकर युद्धात आपण कधीही आक्रमण करणारे आणि ते सहन करणारे अशा दोघांनाही गोंधळात टाकू नये.”
झेलेन्स्की यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे आणि ईयू कौन्सिल अँटोनियो कोस्टा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, असे वॉशिंग्टनमधील युक्रेनियन प्रतिनिधीमंडळातील एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले.
मॉस्को आणि कीव यांच्यातील कोणत्याही शांतता करारासाठी सिक्युरिटी बॅकस्टॉपवर चर्चा करण्यासाठी ब्रिटन रविवारी युरोपचे नेते आणि झेलेन्स्की यांची बैठक आयोजित करणार आहे.
राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ट्रम्प यांचा कल रशियाकडे झुकला आहे. त्यामुळे युरोप आणि त्यापलीकडे असलेल्या पारंपरिक मित्रांना मोठा धक्का बसला आहे आणि युक्रेनला अधिकाधिक असुरक्षित वाटायला लागले आहे.
शुक्रवारचा उद्रेक हा त्या असुरक्षितेतून आलेला होता आणि सार्वजनिक ठिकाणी तो दिसून आला.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या युरोपमधील सर्वात मोठ्या संघर्षाचे निराकरण करण्यासाठी मुत्सद्देगिरीच्या गरजेवर व्हान्स यांनी भर दिला आणि आधीच तणावपूर्ण वातावरणात सुरू असलेली ही बैठक वादळी ठरली. झेलेन्स्की यांनी हात जोडून, पुतीनवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही असे म्हणत व्हॅन्स यांनी आतापर्यंत कधीही युक्रेनला भेट दिली नसल्याचे नमूद केले.
रशियाबरोबरच्या अयशस्वी राजनैतिक प्रयत्नांची पुनरावृत्ती केल्यानंतर झेलेन्स्की यांनी विचारले, “जे. डी., तुम्ही कोणत्या प्रकारच्या मुत्सद्देगिरीबद्दल बोलत आहात?”
यावर उत्तर देताना व्हेन्स म्हणाले, “मी अशाप्रकारच्या मुत्सद्देगिरीबद्दल बोलत आहे, जी तुमच्या देशाचा होणारा विनाश थांबवू शकते.”
झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्याबद्दलच्या त्यांच्या सौम्य दृष्टिकोनाबद्दल ट्रम्प यांना उघडपणे आव्हान दिले आणि त्यांना “एका मारेकऱ्याशी तडजोड करू नका” असे आवाहन केले.
ट्रम्प – ज्यांच्या टीमने याआधीच सांगितले की ते आणि व्हान्स “अमेरिकन लोकांसाठी उभे आहेत” – यांनी बैठकीनंतर त्वरित ट्रुथ सोशलवर जाऊन झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा अनादर केल्याचा आरोप केला.
ट्रम्प म्हणाले, “बैठकीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. पण राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शांततेसाठी तयार नाहीत कारण अमेरिका त्यात सहभागी आहे. मला कोणताही फायदा नको आहे, मला फक्त शांतता हवी आहे.”
ट्रम्प म्हणाले, “जर त्यांना शांतता हवी असेल तर ते येथे परत येऊ शकतात.”
आठवड्याच्या शेवटी व्हाईट हाऊसमधून फ्लोरिडाच्या घरी जाण्यासाठी निघताना ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, झेलेन्स्की यांना हे समजून घेण्याची गरज आहे की ते युद्ध हरत आहेत.
“त्याला काय म्हणायचे आहे, ‘मला शांतता प्रस्थापित करायची आहे’. त्याला तिथे उभे राहून ‘पुतीन हे, पुतीन ते’ असे म्हणण्याची गरज नाही, या सर्व नकारात्मक गोष्टी आहेत. ‘मला शांतता प्रस्थापित करायची आहे’, असे त्याला म्हणायचे आहे. मला आता युद्ध लढायचे नाही, असे ट्रम्प म्हणाले.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान झेलेन्स्की यांना विचारले की शुक्रवारच्या वादविवादानंतर ट्रम्प यांच्याशी त्यांचे संबंध परत सुरळीत होऊ शकतात का?” ते म्हणाले, “हो नक्कीच” आणि “मी झाल्या प्रकाराबद्दल दिलगीर आहे.”
युक्रेनियन सशस्त्र दलाचे प्रमुख, ऑलेक्झांडर सिर्स्की यांनी टेलीग्रामवर एक विधान पोस्ट केले की त्यांचे सैन्य झेलेन्स्की यांच्या पाठीशी उभे आहे आणि युक्रेनची ताकद त्याच्या ऐक्यात आहे.
चिंताग्रस्त युक्रेनियन लोकांनी दुरूनच त्यांच्या नेत्याभोवती मोठ्या प्रमाणात गर्दी केली परंतु मदतीसाठी अमेरिकेवर अवलंबून असल्याने अमेरिकेने लष्करी मदतीचा प्रवाह चालू राहिल की नाही या विचारांनी ते घाबरले आहेत.
काँग्रेसमध्ये, ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या, तर डेमोक्रॅट्सने त्यांच्या बैठकीच्या हाताळणीवर टीका केली.
या वादळी चर्चेनंतर ट्रम्प यांनी आपल्या सहाय्यकांना झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमधून निघून जाण्याची वेळ आली आहे हे सांगण्याचे निर्देश दिले.
युक्रेनियन शिष्टमंडळाला ही चर्चा सुरू ठेवण्याची इच्छा असूनही तेथून जाण्याची सूचना देण्यात आली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
या सगळ्या घडामोडींमुळे युक्रेन आणि अमेरिका यांच्यात खनिजांबाबतच्या करारावर स्वाक्षरी झालेली नाही. याचा अर्थ असा होता की या कराराच्या बदल्यात ट्रम्प यांना युक्रेनच्या युद्ध प्रयत्नांचे समर्थन करण्यास प्रवृत्त करेल आणि संभाव्यतः कॉंग्रेसमधील रिपब्लिकनकडून मदतीच्या नवीन फेरीसाठी पाठिंबा मिळेल अशी कीव्हला आशा होती.
ट्रम्प यांना सध्या खनिज करारावर फेरविचार करण्यात रस नाही, असे व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी संध्याकाळी रॉयटर्सला सांगितले.
झेलेन्स्की यांना युद्ध हाताळण्यात आलेल्या अपयशावर टीका करत त्यांना ‘हुकूमशहा’ म्हणत आणि त्यांना खनिज कराराबाबत सहमत होण्याचे आवाहन करत असताना ट्रम्प अलीकडच्या काही आठवड्यांत झेलेन्स्कींसोबत अनेकवहान मोठ्या वादात गुंतले आहेत.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)