मिशिगनमध्ये कारखान्यातील कामगाराविरोधात ट्रम्प यांचे आक्षेपार्ह वर्तन

0
डोनाल्ड ट्रम्प

मंगळवारी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मिशिगनमधील एका ऑटोमोबाईल प्लांटमध्ये गेले असता, जेफ्री एपस्टीन संबंधी वादाच्या हाताळणीवरून त्यांच्यावर टीका करणाऱ्या फोर्ड कारखान्यातील एका कामगाराला, त्यांनी मधले बोट दाखवत शिवीगाळ केल्याचे, ऑनलाईन प्रसारित होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.

मनोरंजन साइट ‘TMZ’ ने हा व्हिडिओ सर्वप्रथम प्रसिद्ध केला असून, व्हाईट हाऊसने त्याच्या सत्यतेवर आक्षेप घेतलेला नाही.

व्हाईट हाऊसचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग यांनी रॉयटर्सला ईमेलद्वारे सांगितले की, “एक वेडा माणूस रागाच्या भरात बेधुंद होऊन शिवीगाळ करत ओरडत होता आणि राष्ट्राध्यक्षांनी त्याला योग्य आणि स्पष्ट प्रतिसाद दिला”.

‘पीडोफाइल प्रोटेक्टर’

व्हिडिओनुसार, ट्रम्प डियरबॉर्न येथील ‘फोर्ड F-150’ असेंब्ली सुविधेची पाहणी करण्यासाठी गेले होते. ते उंचावरील एका मार्गिकेतून जात असताना, प्लँटमधील एका कामगार जोरात ‘पीडोफाइल प्रोटेक्टर’ (बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांचा रक्षक) असे ओरडला. ट्रम्प त्या व्यक्तीकडे वळले आणि त्यांनी प्रत्युत्तरादाखल शिवीगाळ केली आणि तिथून जात असताना, त्याला मधले बोट दाखवत हातवारे केले.

फोर्डच्या इतर कर्मचाऱ्यांनी यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थनार्थ जयघोष केला, तसेच पाहणी दरम्यान ट्रम्प यांनी कामगारांसोबत फोटो काढले आणि हस्तांदोलनही केले.

फोर्डचे कार्यकारी अध्यक्ष बिल फोर्ड यांनी, नंतर एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना “ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आणि त्याबद्दल खेद व्यक्त केला.”

“ट्रम्प यांच्या एका तासाच्या दौऱ्यातील, ही फक्त सहा सेकंदांची घटना होती, बाकी दौरा उत्तम पार पडला, मला वाटते की ट्रम्प यांनी खरोखर दौऱ्याचा आनंद घेतला आणि आम्हालाही आनंद झाला,” असे ते म्हणाले.

ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी जाहीर टीका, संघर्ष किंवा आपला मुद्दा पटवून देण्यासाठी शिवीगाळ केली आहे.

जेफ्री एपस्टीन प्रकरणावरून निशाणा

2019 मध्ये, तुरुंगात आत्महत्या केलेल्या जेफ्री एपस्टीन, या लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराशी संबंधित संवेदनशील फेडरल रेकॉर्ड्स हाताळल्याबाबत, ट्रम्प यांना सातत्याने टीकेचा सामना करावा लागला आहे. ट्रम्प यांच्या अनेक निष्ठावान समर्थकांचा असा विश्वास आहे की, सरकार अशी कागदपत्रे लपवून ठेवत आहेत, ज्यामुळे त्यांच्या या दिवंगत फायनान्सरचे शक्तिशाली सार्वजनिक व्यक्तींशी असलेले संबंध उघड होऊ शकतात. दरम्यान, मुलींवरील अत्याचार आणि त्यांच्या तस्करीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे ट्रम्प यांनी वारंवार सांगितले असून, त्यांच्यावर कोणत्याही चुकीच्या कृत्याचा आरोप झालेला नाही.

ट्रम्प यांची मिशिगनमधील भेट, ही त्यांच्या प्रशासनाचा अमेरिकन उत्पादनाला असलेल्या पाठिंबा दर्शवण्याच्या प्रयत्नाचा भाग होती, जो 2026 च्या निवडणूक वर्षातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मिशिगन हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य मानले जाते आणि देशांतर्गत नोकऱ्या आणि उद्योग हे कायमच ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणाचे केंद्र राहिले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीन अमेरिकेसाठी आपली बाजारपेठ खुली करू शकतो; ट्रम्प यांचे सूचक संकेत
Next articleजयपूरमध्ये प्रथमच नागरी भागात लष्कर दिन परेडचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here