अमेरिकेने 25% आयात कर लादण्याची धमकी दिल्यामुळे, मेक्सिकोतील टकीला उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक वर्षांपासून मद्य उत्पादनाच्या व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांना टॅरिफ वाढीच्या धमकीमुळे अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
हॅलिस्को राज्यातील 100% महिला स्टाफ असलेल्या, डिस्टिलरी “आझटेका वाईन्स अँड स्पिरिट्स” या कंपनीच्या मालकीण- मेल्ली बॅराजास यांनी सांगितले की, ”त्यांच्या उद्योगाला हंगामी कामापासून ते मोठ्या प्रमाणात सोर्सिंग केल्या जाणाऱ्या घटकांपर्यंत सर्व गोष्टींचे नियोजन, काही महिने आधी करावे लागते. मात्र आता त्यांची पुरवठा साखळी पूर्णपणे खंडित झाली आहे.
“आम्ही याची प्रार्थना आणि प्रतिक्षा करत आहोत की, अमेरिका जो काही निर्णय घेईल तो विचारपूर्वक घेईल,” अशा भावना बॅराजास यांनी रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केल्या.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे सांगितले की, ते मेक्सिको आणि कॅनडावर 25% टॅरिफ लावण्याचा विचार करत आहेत, त्यांनी स्थलांतरितांचा प्रवाह आणि फेंटॅनिलचा प्रवाह थांबवण्यासाठी पुरेसे काम केले नाही असा, आरोप ट्रम्प यांनी केला आहे. मात्र 3 फेब्रुवारीला, मेक्सिको आणि कॅनडा या दोन्ही देशांनी त्यांच्या सीमा अधिक मजबूत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, ट्रम्प यांनी टॅरिफ वाढीच्या निर्णयाला 30 दिवसांचा विराम दिला.
Tequila – हे मद्य काटेरी ॲव्हेव्ह वनस्पतीपासून बनवले जाते आणि मॅर्गरिटा सारख्या कॉकटेलमध्ये ते प्रामुख्याने वापरले जाते. जगभरात टकिलाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होते आहे. 2023 मध्ये, टकिला हे व्होडका नंतर अमेरिकेतील दुसरे सर्वाधिक विकले जाणारे मद्य बनले, ज्याने व्हिस्कीलाही मागे टाकले.
2024 च्या पहिल्या 9 महिन्यात, अमेरिकेने 3.8 अब्ज डॉलर्सच्या टकीलाची आयात केली, अशी माहिती यूएस डिस्टिल्ड स्पिरिट्स काऊन्सिलने दिली. ही आयात त्याच्या गेल्यावर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी जास्त आहे आणि व्हिस्की, जिन, रम, ब्रँडी आणि व्होडकाच्या एकत्रित आयातीपेक्षाही जास्त आहे.
फ्रेंच शॅम्पेन किंवा इटालियन पार्मेसान चीज प्रमाणेच, ‘टकीला’ किंवा ‘मेक्स्कल’ या मद्य प्रकारांचे उत्पादन केवळ मेक्सिकोमध्येच होते. त्यामुळे अतिरिक्त टॅरिफ आकारल्याने अमेरिकन ग्राहकांसाठी त्याच्या किंमती वाढतील आणि परिणामत: विक्रीमध्ये घसरण होईल, अशी चिंता टकीला उत्पादकांना सतावत आहे.
उत्तर अमेरिकेतील मद्य व्यापार संघटनेच्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त टॅरिफ्स रोजगारांवर धोका आणू शकतात आणि कोविड-19 महामारीनंतर अजूनही सावरत असलेल्या हॉस्पिटॅलिटी उद्योगांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
‘अमेरिकन ग्राहक, टकीलावर टॅरिफ लावल्यास इतर पेये निवडण्याची शक्यता आहे’, अशी बॅराजास यांनी व्यक्त केली. ‘तसेच जर्मनी, स्पेन आणि रशिया सारखे देश जरी टकीलाच्या खरेदीत रस दाखवत असले, तरी ही प्रक्रिया संथ गतीने पुढे जाणारी आहे, त्यामुळे नुकसान निश्चीत आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
“टॅरिफ वाढीच्या या अनिश्चिततेमुळे, संपूर्ण उत्पादन प्रणालीवर आणि गेल्या अनेक वर्षांपासून स्थिरस्थावर झालेल्या आमच्या बिझनेस चेनवर विपरित परिणाम होतो आहे,” अशी प्रतिक्रिया बॅराजास यांनी दिली.
– सूर्या गंगाधरन
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)