ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे मेक्सिकोतील हजारोंनी नोकऱ्या गमावल्या

0
टेक्सासमधील एल पासोच्या सीमेपलीकडे असलेल्या सियुडाड जुआरेझमध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे हजारो कारखान्यातील नोकऱ्यांवर परिणाम झाला असून मोठ्या प्रमाणात कामगार कपात करावी लागली आहे. प्रभावित झालेल्यांमध्ये फॅबियोला गॅलिसिया यांचाही समावेश आहे, ज्यांनी 11 वर्षे उत्पादन कामगार ते व्यवस्थापक म्हणून डेकोरेटिव्ह रिबन प्लांटमध्ये काम केले आणि त्यानंतर त्यांची नोकरीच संपुष्टात आली.

जूनमध्ये, त्यांची शिफ्ट आठवड्यातून फक्त तीन दिवसांवर आणण्यात आली. त्यानंतर ऑगस्टमध्ये, डिझाईन ग्रुप अमेरिकाजच्या प्रतिनिधीने, ज्याने गेल्या महिन्यात दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज केला होता, त्यांनी सियुडाड जुआरेझ येथील कारखाना बंद केला, ज्यामुळे गॅलिसिया आणि इतर सुमारे 300 कामगारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली.

कोर्टात दाखल केलेल्या अर्जात, कंपनीने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे आपल्या अडचणींना अंशतः जबाबदार धरले. गॅलिसिया म्हणाल्या की कंपनीच्या एका प्रतिनिधीने ट्रम्प यांनाही दोष दिला. “त्यांनी आम्हाला सांगितले की टॅरिफमुळे कंपनीवर परिणाम झाला आहे,” गॅलिसिया म्हणाल्या, ज्यांचे पती देखील कंपनीत काम करत होते आणि त्यांनाही कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

डिझाईन ग्रुप अमेरिकाजने टाळेबंदीबद्दल प्रतिक्रिया द्यावी यासाठी केलेल्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही.

असेंब्ली प्लांट्समोर संकटांची मालिका

सियुदाद जुआरेझमधील असेंब्ली प्लांट्स, जे जगभरातून बहुतेक करमुक्त कच्चा माल आयात करतात आणि तयार झालेले उत्पादन अमेरिकेत निर्यात करतात, आता मोठ्या संकटात आहेत. ट्रम्प यांच्या जागतिक व्यापार युद्धामुळे वाढत्या वेतन आणि मेक्सिकोच्या सत्ताधारी डाव्या मोरेना पक्षाच्या सुधारणांबद्दल गुंतवणूकदारांच्या चिंतेसह आधीच अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या उद्योगांसमोरचे संकट वाढले आहे.

मॅक्विलाडोरास म्हणून ओळखले जाणारे, सियुदाद जुआरेझमधील सुमारे 60 टक्के नोकऱ्या या प्लांट्सना मिळतात. दशकांपासून मेक्सिकोमधील सर्वात महत्त्वाच्या उत्पादन केंद्रांपैकी एक असलेल्या या शहराच्या औद्योगिक क्षेत्राला अलिकडच्या वर्षांत फायदा झाला कारण मोठ्या संख्येने बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चिनी उत्पादित उत्पादनांवर अमेरिकेच्या कर टाळण्यासाठी मेक्सिकोमध्ये कामकाज हलवले आहे.

पण टॅरिफ वाढीनंतर, अनेक प्लांट्स आता कामगारांची कपात करत आहेत तर काही काही प्लांट्स पूर्णपणे बंद पडत आहेत.

जून 2023 ते जून 2025 दरम्यान, जुआरेझ नगरपालिकेने 64 हजारांहून अधिक कारखान्यांमधून नोकरकपात झाल्याचे सांगितले. ज्यात वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत जवळपास 14 हजार नोकऱ्यांचा समावेश आहे, असे मेक्सिकोच्या राष्ट्रीय सांख्यिकी आणि भूगोल संस्थेने म्हटले आहे.

मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्याने मेक्सिकोच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने अधोरेखित होतात, जी अमेरिकेसोबत मुक्त व्यापारावर अवलंबून आहे.

ट्रम्प यांच्याकडून सातत्याने लागू होणाऱ्या टॅरिफमध्ये कंपन्या टिकून राहण्यासाठी संघर्ष करत असल्याने 2025 साठी अंदाजित जीडीपी वाढ एक टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे.

मॅक्विला असोसिएशन इंडेक्स जुआरेझच्या उपाध्यक्ष मारिया टेरेसा डेलगाडो म्हणाल्या की उद्योग क्षेत्र “संकटात” आहे. टॅरिफ व्यतिरिक्त, त्यांनी आणि इतर सहा व्यावसायिक तज्ज्ञांनी जुआरेझमधील नोकऱ्यांवरील गंडांतराला‌ इतरही घटक कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

‘चेरी ऑन टॉप’

त्यांनी सांगितले की, किमान वेतनात संघराज्याने अनिवार्य केलेल्या वाढीमुळे कारखान्यांच्या नफ्यात घट झाली आहे. मेक्सिकोच्या उत्तरेकडील प्रदेशातील किमान वेतन 2019 पासून 22 पेसो प्रति तास (1.17 अमेरिकन डॉलर) वरून ‌52.48 पेसो (2.80 अमेरिकन डॉलर्स) पर्यंत वाढले.

त्यानंतर, 2023 मध्ये, मेक्सिकोच्या माजी राष्ट्रपतींनी एक मोठी न्यायालयीन सुधारणा प्रस्तावित केली – नियुक्त न्यायाधीशांच्या जागी निवडून आलेल्या न्यायाधीशांची नियुक्ती करणे, ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आणि न्यायालयीन स्वातंत्र्याला धोका निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकीला अडथळा निर्माण झाला. या वर्षी ही सुधारणा लागू करण्यात आली.

परंतु ट्रम्प यांचे व्यापार युद्ध हा यातील महत्त्वाचा टप्पा होता, असे डेलगाडो म्हणाले. मेक्सिकन निर्यातीपैकी बहुतेक निर्यात अमेरिकेत टॅरिफमुक्त होत असताना, ऑटोमोटिव्ह उद्योग आणि स्टील, ॲल्युमिनियम आणि काही कापड यासारख्या उत्पादनांवर उच्च शुल्क आहे.

“ट्रम्पचे शुल्क हे चेरी ऑन द टॉप असे होते,”  अशी प्रतिक्रिया डेलगाडो यांनी टाळेबंदीबद्दल दिली.

2025 च्या पहिल्या तिमाहीत मेक्सिकोमध्ये थेट परकीय गुंतवणूक गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 21 टक्क्यांनी कमी झाली. चिहुआहुआ राज्यात, जिथे सियुडाड जुआरेझ आहे, उत्पादन क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक 56 टक्क्यांनी कमी झाली, ती 800 दशलक्ष डॉलर्सवरून 348  दशलक्ष डॉलर्सवर आली.

“अनिश्चिततेच्या वातावरणाचा व्यवसाय परिणाम होत आहे,” असे चिहुआहुआचे नवोन्मेष आणि आर्थिक विकास सचिव उलिसेस अलेजांद्रो फर्नांडिस म्हणाले. “व्यापार धोरणाचे काय होईल याबद्दल स्पष्टता येईपर्यंत कंपन्या निर्णय घेण्यास आणि नवीन गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करत आहेत.”

सियुदाद जुआरेझमधून कंपन्यांचे स्थलांतरण

काही कंपन्या आधीच सियुदाद जुआरेझमधून बाहेर पडत आहेत कारण त्या कमी कामगार खर्च असलेल्या देशांमध्ये जात आहेत किंवा टॅरिफ टाळण्यासाठी अमेरिकेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला, ऑटोमोटिव्ह पार्ट्स-निर्माता लिअर कॉर्पने सियुदाद जुआरेझमधून काही उत्पादन लाइन्स होंडुरासमध्ये स्थलांतरित करण्याची घोषणा केली, ज्याचे वर्णन मेक्सिकोच्या उत्तर सीमावर्ती प्रदेशात मागणी आणि वाढत्या वेतनाच्या दरम्यान खर्च कमी करण्यासाठी एक व्यापक धोरण म्हणून केले गेले.

फ्रेंच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक लॅक्रोइक्स या वर्षाच्या अखेरीस सियुदाद जुआरेझमधील त्यांचे कामकाज बंद करण्याची योजना आखत आहे. कंपनीने उत्तर अमेरिकेतून बाहेर पडण्यामागे व्यवसायात सतत होणारे नुकसान आणि व्यापार अनिश्चितता ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले.

प्रादेशिक व्यवसाय युती बॉर्डर ब्लॉक ट्रेडचे अध्यक्ष थोर सलायांडिया म्हणाले की त्यांना सियुदाद जुआरेझमधील त्यांच्या हार्डवेअर कारखान्यातील कर्मचारी कमी करावे लागले आहेत जे नखे तयार करतात. त्यांच्याकडे आता 20 कर्मचारी आहेत, तर 2023 मध्ये सुमारे 90 कर्मचारी होते, असे ते म्हणाले.

“ग्राहकही आपला खर्च कमी करत आहेत. एके दिवशी ते ऑर्डर देतात, दुसऱ्या दिवशी देत ​​नाहीत,” अशी परिस्थितीची जाणीव त्यांनी करून दिली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleव्हिएतनामला 80 वर्षे पूर्ण; भव्य परेड, 13,500 हून अधिक कैद्यांची सुटका
Next articleDefence and Maritime Security High on Agenda as Singapore PM Begins India Visit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here