हिंसक दंगलीनंतर ट्रम्प यांची इराणला धमकी

0
ट्रम्प

जर सुरक्षा दलांनी इराणमधील आंदोलकांवर गोळीबार केला, तर अमेरिका त्यांच्या मदतीला धावून येईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दिला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून, यामुळे इराणी अधिकाऱ्यांसमोर गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात मोठे अंतर्गत आव्हान उभे राहिले आहे.

“आम्ही सज्ज आहोत आणि कारवाईसाठी तयार आहोत,” असे त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले. अमेरिकेने जूनमध्ये इराणी आण्विक सुविधांवर हल्ला केला होता तसेच तेहरानच्या आण्विक कार्यक्रमाला तसेच लष्करी नेतृत्वाला लक्ष्य करणाऱ्या इस्रायली हवाई मोहिमेतही अमेरिका सहभागी झाले होते.

इराणचे वरिष्ठ अधिकारी अली लारीजानी यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला उत्तर देताना इशारा दिला की, इराणच्या देशांतर्गत बाबींमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप म्हणजे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्यासारखे असेल. इराण लेबनॉन, इराक आणि येमेन येथील बंडखोर गटांना पाठिंबा देतो.

ही वक्तव्ये अशा वेळी आली आहेत, जेव्हा पश्चिम इराणमधील एका स्थानिक अधिकाऱ्याने – जिथे अनेक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे- सरकारी माध्यमांना सांगितले की, कोणतीही अशांतता किंवा बेकायदेशीर जमाव “निर्णायकपणे आणि कोणतीही दयामाया न दाखवता” हाताळला जाईल, ज्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता वाढली आहे.

सर्वात मोठी निदर्शने

या आठवड्यात वाढत्या महागाईविरोधात झालेली निदर्शने संपूर्ण इराणमध्ये पसरली आहेत, याशिवाय पश्चिम प्रांतांमध्ये निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये प्राणघातक संघर्ष झाले आहेत.

सरकारी माध्यमांनी आणि मानवाधिकार गटांनी बुधवारपासून किमान सहा जणांच्या मृत्यूची नोंद केली आहे, ज्यात एका व्यक्तीचा समावेश आहे, जो रिव्होल्यूशनरी गार्ड्सशी संलग्न असलेल्या बासिज निमलष्करी दलाचा सदस्य होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या काही दशकांत इराणमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणातील  अशांततेचा सामना करावा लागला आहे. अनेकदा कठोर सुरक्षा उपाययोजना व मोठ्या प्रमाणावरील अटकेद्वारे निदर्शने दडपली गेली आहेत. परंतु आता आर्थिक समस्यांमुळे अधिकारीही अधिक असुरक्षित होऊ शकतात.

या आठवड्यात झालेली निदर्शने ही गेल्या तीन वर्षांत झालेली सर्वात मोठी निदर्शने आहेत. 2022 च्या अखेरीस ताब्यात असलेल्या एका तरुणीच्या मृत्यूनंतर देशभरात झालेल्या निदर्शनांमुळे इराणमधील कामकाज अनेक आठवडे ठप्प झाले होते, याशिवाय मानवाधिकार गटांनी शेकडो लोक मारले गेल्याचे वृत्त दिले होते.

रॉयटर्सने सत्यता तपासून घेतलेल्या व्हिडिओमध्ये, रात्रीच्या वेळी एका जळत्या पोलीस ठाण्यासमोर डझनभर लोक जमलेले दिसत होते, त्यावेळी अधूनमधून गोळीबाराचे आवाज येत होते आणि लोक अधिकाऱ्यांच्यासमोर “निर्लज्ज, निर्लज्ज” असे ओरडत होते.

इराणच्या बलुच अल्पसंख्याक समुदायाचे प्राबल्य असलेल्या झाहेदान या दक्षिणेकडील शहरात, आंदोलकांनी “हुकूमशहाला मृत्यू” यासह इतर घोषणा दिल्याची माहिती हेंगाव या मानवाधिकार वृत्तगटाने दिली.

हेंगावने आतापर्यंत या आंदोलनाच्या संदर्भात 29 जणांना अटक केल्याची नोंद केली आहे, त्यापैकी बहुतेकजणांची अटक पश्चिम भागात झाली असून, त्यात इराणच्या कुर्दिश अल्पसंख्याक समुदायातील 14 सदस्यांचा समावेश आहे.

सरकारी दूरचित्रवाणीने पश्चिम भागातील आणखी एक शहर, केरमानशाह येथे, पेट्रोल बॉम्ब आणि गावठी पिस्तूल बनवल्याच्या आरोपावरून अनेकांना अटक केल्याचे वृत्त दिले आहे.

इराणच्या अधिकृत किंवा निम-अधिकृत माध्यमांनी मान्य केलेले मृत्यू लोरदेगान आणि कुहदाश्त या पश्चिम भागातील लहान शहरांमध्ये झाले आहेत. हेंगावने असेही वृत्त दिले आहे की, मध्य इराणमधील फार्स प्रांतात एका व्यक्तीची हत्या झाली, मात्र सरकारी वृत्त संकेतस्थळांनी हे वृत्त नाकारले आहे.

अध्यक्षांनी चूक मान्य केली

ताज्या अशांततेदरम्यान, मानवाधिकार गटांनी सुरक्षा दलांकडून निदर्शकांवर गोळीबार केल्याचा आरोप केला असला तरी निवडून आलेले अध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी समेटाची भूमिका घेत वाढत्या महागाईच्या संकटावर आंदोलकांच्या नेत्यांशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले आहे,

गुरुवारी, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कारवाईची धमकी देण्यापूर्वी बोलताना, पेझेशकियान यांनी अधिकाऱ्यांच्या चुकांमुळेच हे संकट ओढवले असल्याचे मान्य केले.

“दोष आमचाच आहे… दोष देण्यासाठी अमेरिका किंवा इतर कोणालाही शोधू नका. आपण योग्य प्रकारे सेवा दिली पाहिजे जेणेकरून लोक आपल्यावर समाधानी राहतील… या समस्यांवर तोडगा आपल्यालाच शोधावा लागेल,” असे ते म्हणाले.

पेझेशकियान यांचे सरकार आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांच्या एका उपायामुळे, म्हणजेच काही चलन विनिमयावरील निर्बंध हटवल्यामुळे, अनधिकृत बाजारात इराणच्या रियालच्या मूल्यात मोठी घसरण झाली आहे.

पाश्चात्य निर्बंधांनी ग्रासलेल्या अर्थव्यवस्थेत, घसरत्या चलनामुळे महागाई आणखी वाढली आहे, जी मार्चपासून अधिकृत अंदाजानुसारही 36 टक्क्यांच्या वर राहिली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यांमुळे अधिकाऱ्यांवरील दबाव वाढला आहे, तसेच तेहरानचा जवळचा मित्र असलेल्या सीरियाच्या बशर अल-असद यांना सत्तेवरून हटवणे आणि इराणच्या मुख्य प्रादेशिक भागीदार असलेल्या लेबनॉनच्या हिजबुल्लाहवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळेही हा दबाव वाढला आहे.

इराण इराकमधील अशा गटांना पाठिंबा देत आहे, ज्यांनी यापूर्वी देशातील अमेरिकन सैन्यावर रॉकेट हल्ले केले आहेत, तसेच उत्तर येमेनच्या मोठ्या भागावर नियंत्रण असलेल्या हौती गटालाही तो पाठिंबा देत आहे.

इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे वरिष्ठ सल्लागार लारीजानी म्हणाले, “अमेरिकन लोकांना हे माहित असले पाहिजे की ट्रम्प यांनीच या घाणेरड्या कृत्याची सुरुवात केली. त्यांनी आपल्या सैनिकांची काळजी घेतली पाहिजे.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleतैवान ते आर्थिक विकास, जुन्याच संकल्पनांची जिनपिंग यांच्याकडून पुनरावृत्ती
Next articleबांगलादेशमध्ये निवडणुकीची लगबग; लवकरच प्रचाराच्या तोफा धडाडणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here