भारतात टॅरिफ संघर्षामुळे, अमेरिकन उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

0

अमेरिकेने भारतावर लादलेल्या अतिरिक्त शुल्काच्या पार्श्वभूमीवर, McDonald’s आणि Coca-Cola पासून ते Amazon आणि Apple पर्यंत, अनेक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारताच्या बहिष्काराला सामोरे जावे लागत आहे, कारण व्यापारी नेते आणि मोदी समर्थक शुल्क आकारणीविरोधात अमेरिकन उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत.

भारत, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, जो अमेरिकन ब्रँड्ससाठी एक महत्त्वाची बाजारपेठ देखील आहे. आंतरराष्ट्रीय लेबल्सकडे आकर्षित असलेल्या भारतातील श्रीमंत वर्गातील ग्राहकांना टार्गेट करत, हे ब्रँड इथे झपाट्याने विस्तारले आहेत.

उदाहरणार्थ, भारतात Meta च्या WhatsApp चे सर्वाधिक वापरकर्ते आहेत, तर Domino’s या प्रसिद्ध पिझ्झा ब्रँडचे अन्य कुठल्या देशापेक्षा भारतात सर्वात जास्त आउटलेट्स आहेत. सोबतच Pepsi आणि Coca-Cola सारख्या शीतपेयांनाही भारतात प्रचंड मागणी आहे. इतकंच नाही तर, जेव्हा आपल्याकडे एखादे नवीन Apple स्टोअर उघडते किंवा Starbucks कॅफे एखादी सवलत जाहीर करते, तेव्हा लोक अक्षरश: रांगा लावतात.

अद्याप या ब्रँड्सच्या विक्रीवर तत्काळ परिणाम झाल्याचे संकेत नसले, तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 50% शुल्क लावल्याच्या घोषणेनंतर, सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षात काही ठिकाणी- ‘स्थानिक उत्पादने खरेदी करा, अमेरिकन उत्पादने टाळा’ ही मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे भारतीय निर्यातदार अडचणीत आले असून, दिल्ली-वॉशिंग्टन संबंधांनाही तडा गेला आहे.

McDonald’s, Coca-Cola, Amazon आणि Apple यांनी रॉयटर्सने विचारलेल्या प्रश्नांना, अद्याप उत्तर दिलेले नाही.

Wow Skin Science या भारतीय कंपनीचे सहसंस्थापक मनिष चौधरी यांनी, LinkedIn वर एक व्हिडीओ मेसेज शेअर करून, शेतकरी आणि स्टार्टअप्सना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. “मेड इन इंडिया” उत्पादनांना जगभरातली क्रेझ बनवण्याचे आणि दक्षिण कोरियाकडून याबाबत धडे घेण्याचे, त्यांनी आवाहन केले.

“आपण हजारो किलोमीटर दूर असलेल्या देशाची उत्पादने विकत घेतो. आपण अशा ब्रँड्सवर पैसे खर्च करतो, जे आपले नाहीत आणि या उलट आपल्या देशातील उत्पादकांना मात्र त्यांच्या स्वतःच्याच देशात ओळख मिळवण्यासाठी झगडावे लागते याचा आपण विचार केला पाहिजे,” असे चौधरी यांनी सांगितले.

DriveU चे सीईओ रहम शास्त्री यांनी लिहिले की, “भारताकडे स्वतःचे Twitter, Google, YouTube, WhatsApp, FB असले पाहिजे, जसे चीनकडे आहे.”

प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, Starbucks सारख्या परदेशी ब्रँड्सना, काही भारतीय कंपन्या स्वदेशी बाजारात जोरदार स्पर्धा देतात, परंतु जागतिक पातळीवर हे साध्य करुन दाखवणे, हे खरे आव्हान आहे.

भारतीय IT सेवा कंपन्या, मात्र जागतिक अर्थव्यवस्थेत चांगल्या स्थिरावल्या आहेत. TCS आणि Infosys सारख्या कंपन्या जगभरातील ग्राहकांना सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरवतात.

रविवारी, पंतप्रधान मोदींनी बेंगळुरूमधील एका कार्यक्रमात “आत्मनिर्भरतेसाठी” विशेष आवाहन करताना सांगितले की, “भारतीय टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्या संपूर्ण जगासाठी उत्पादने तयार करत आहेत, पण आता भारताच्या गरजांना प्रथम प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.”

“माझ्या McPuff ला यात ओढू नका”

अमेरिकन उत्पादनांविरोधात निदर्शने सुरु असतानाही, दुसरीकडे Tesla कंपनीने भारतात नवी दिल्ली येथे, आपले दुसरे शोरूम उघडले. सोमवारीच्या या शोरूमच्या उद्घाटनाला भारतीय वाणिज्य मंत्रालय आणि अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.

पंतप्रधान मोदी, यांच्या भारतीय जनता पक्षाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचाने, रविवारी देशभरात छोटे जाहीर मोर्चे काढून अमेरिकन ब्रँड्सवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.

“लोक आता भारतीय उत्पादनांकडे वळत आहेत, हा देशभक्तीचा संदेश आहे, अर्थातच याचे अपेक्षित फळ मिळण्यास थोडा वेळ लागेल,” असे या मंचाच्या सह-संयोजिका अश्विनी महाजन यांनी रॉयटर्सला सांगितले. 

त्यांनी रॉयटर्ससोबत शेअर केलेला एक चार्ट, सध्या WhatsApp वर फिरतो जात आहे, ज्यामध्ये अंघोळीचा साबण, टूथपेस्ट आणि थंड पेये यांचे भारतीय पर्याय दिलेले आहेत.

सोशल मीडियावर, या मंचाच्या एका मोहिमेअंतर्गत “परदेशी खाद्य साखळ्यांवर बहिष्कार” असे शीर्षक असलेले ग्राफिक फिरवले जात आहे, ज्यात McDonald’s आणि इतर रेस्टॉरंट ब्रँड्सचे लोगो आहेत.

लखनऊमधील एका McDonald’s मध्ये जेवण करत असलेले, 37 वर्षीय राजत गुप्ता म्हणाले की, “मला टॅरिफविरोधी निदर्शनांचा काही फरक पडत नाही, 49 रुपयांची (अंदाजे $0.55 डॉलर्सची) कॉफी त्यांना चांगली वाटते.”

“टॅरिफ्स म्हणजे राजनैतिक बाब, त्यामुळे माझ्या McPuff किंवा कॉफीला यामध्ये ओढू नका,” असे त्यांनी सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleपाकिस्तानस्थित BLA परदेशी दहशतवादी संघटना म्हणून अमेरिकेकडून घोषित
Next articleगाझा सिटी हल्ले इस्रायलने लांबणीवर टाकले, युद्धबंदीच्या आशा वाढल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here