विमानातील तांत्रिक बिघाडामुळे लिबियन लष्कर प्रमुखांचा अपघाती मृत्यू: तुर्की

0
लिबियन

मंगळवारी, तुर्कीची राजधानी अंकारा येथून रवाना झालेल्या विमानाचा अपघात झाला; ज्यामध्ये लिबियन लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांचा मृत्यू झाल्याची माहिती, लिबियाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त सरकारच्या पंतप्रधानांनी दिली. या विमानातून आणखी चारजण प्रवास करत होते, असेही त्यांनी सांगितले.

“तुर्कीतील अंकारा शहराच्या अधिकृत दौऱ्यावरून परतत असताना, ही दुःखद आणि वेदनादायी घटना घडली असून, राष्ट्रासाठी, लष्करी संस्थेसाठी आणि सर्व जनतेसाठी ही खूप मोठी हानी आहे,” असे लिबियाचे पंतप्रधान अब्दुलहमीद दबेबाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

तुर्कीचे स्पष्टीकरण

तुर्कीच्या दळणवळण प्रमुखांनी बुधवारी सांगितले की, लिबियाच्या लष्करी प्रमुखांना घेऊन जाणाऱ्या खासगी जेटमध्ये ‘इलेक्ट्रिकल बिघाड’ झाल्याची माहिती आधीच देण्यात आली होती आणि ते अंकाराजवळ कोसळण्याच्या काही वेळ आधी आपत्कालीन लँडिंगची विनंती करण्यात आली होती.

बुरहानत्तीन दुरान यांनी त्यांच्या निवेदनात सांगितले की, डसॉल्ट फाल्कन 50 या विमानाने मंगळवारी 17.17(GMT) वाजता अंकारा येथील एसेनबोगा विमानतळावरून त्रिपोलीसाठी उड्डाण केले, त्यानंतर 17.33 (GMT) वाजता त्यांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (ATC) इलेक्ट्रिकल बिघाडामुळे उद्भवलेल्या आणीबाणीबद्दल माहिती दिली होती.

लिबियन आणि तुर्की अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या अपघातात चालक दलाच्या तीन सदस्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने विमानाला पुन्हा एसेनबोगा विमानतळाच्या दिशेने वळवले आणि तात्काळ आपत्कालीन उपाययोजना सुरू करण्यात आल्या, परंतु लँडिंगसाठी खाली उतरत असताना 17.36 (GMT) वाजता विमान रडारवरून गायब झाले आणि त्याचा संपर्क पूर्णपणे तुटला, असे त्यांनी सांगितले.

तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकया यांनी म्हणण्यानुसार, अपघातानंतर या विमानाचे अवशेष परिसरातील केसिककावाक गावाजवळ सापडले.

तपासकार्य सुरू

तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने, हद्दाद यांच्या या भेटीची घोषणा यापूर्वीच केली होती आणि त्यांनी तुर्कीचे संरक्षण मंत्री यासर गुलर तसेच तुर्कीचे समकक्ष सेलुक बायराक्तारोग्लू यांच्यासह, इतर तुर्की लष्करी कमांडर्सची भेट घेतल्याचे सांगितले होते.

तुर्कीच्या गृह मंत्रालयाने राबवलेल्या मोहिमेअंतर्गत, शोध आणि बचाव पथके अपघातस्थळी पोहोचली असून, सर्व संबंधित प्राधिकरणांच्या सहभागासह अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे, असे दुरान यांनी सांगितले.

लिबियाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारने म्हटले आहे की, मृतांमध्ये देशाचे लष्कर प्रमुख मोहम्मद अली अहमद अल-हद्दाय यांच्यासह, त्यांच्या ताफ्यातील चार सदस्यांचा समावेश आहे.

लिबियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे विमान भाडे तत्वावर घेण्यात आले होते आणि माल्टामध्ये त्याची नोंदणी करण्यात आली होती. तपासाचा भाग म्हणून, विमानाची मालकी आणि त्यांच्या तांत्रिक पार्श्वभूमीची तपासणी केली जाईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleडिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘टोन्बो इमेजिंग’ IPO जाहीर करण्याच्या तयारीत
Next articleमॉस्कोमधील बॉम्बस्फोटात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह एका संशयिताचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here