इटलीतील एका इंधन डेपोमध्ये (Fuel Depot) सोमवारी झालेल्या भीषण स्फोटात दोन जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान स्फोटाच्यावेळी डेपोमध्ये उपस्थित तीन जण सध्या बेपत्ता आहेत. फ्लॉरेन्स शहराजवळ असलेला हा डेपो, इटालियन ऊर्जा कंपनी Eni च्या मालकीचा असल्याचे समजते.
टस्कनच्या उत्तरेकडील सीमेवर असलेल्या कॅलेन्झानोमध्ये स्थित एका इंधन डेपोत हा स्फोट झाला. जिथे सर्वाधिक प्रमाणात मालवाहू ट्रक इंधन भरण्यासाठी येतात. ‘सुदैवाने जवळपासच्या अन्य इंधन डेपोंवर याचा परिणाम न झाल्यामुळे खूप मोठी हानी टळली,’ असं इटलीचे राजकीय नेते Eugenio Giani यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
युजेनियो गियानी या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर एका पोस्ट करत म्हणाले, की ‘आज घडलेला अपघात ही एक शोकांतिका आहे, या दुखा:त सर्व टस्कनीवासी एकवटले आहेत.’
दरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी तिघांची प्रकृती खूप चिंताजनक आहे. याप्रकरणी इटलीच्या प्रादेशिक नागरी संरक्षण मंत्री मोनिया मोन्नी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘प्राथमिक निष्कर्षांनुसार, हा स्फोट इंधनाच्या बाष्पीकरणामुळे झाला असून बाष्पीकरणाचा ढग फुटल्यामुळे याठिकाणी आग लागली आणि जवळची एक इमारत कोसळली. दरम्यान आसपासच्या रहिवाशांना घरातून बाहेर न पडण्याचा आणि गरज भासल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा देण्यात आला. अंदाजे तासाभरात आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.’’
दरम्यान टस्कनीच्या पर्यावरण संरक्षण एजन्सीने सांगितल्याप्रमाणे, या स्फोटामुळे इंधन डेपो वगळता अन्य कुठलेही सार्वजनिक नुकसान झाले नाही. तसेच यामुळे कुठल्याही प्रकारचे आरोग्यविषयक धोके उद्भवणार नाहीत. यासोबतच यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा दूषित होण्याची शक्यता नसल्याचे सांगत, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वस्त केले.
रिपोर्टनुसार, कॅलेन्झानोमधील सदर डेपो हा सुमारे 1 लाख 80 हजार चौरस मीटर क्षेत्रफळात पसरला आहे. तसेच हा डेपो टस्कन किनारपट्टीवरील एनी रिफायनरीशी जोडलेला आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनच्या मिळून एकूण 24 टाक्यांचा समावेश आहे.
जवळच असलेल्या प्राटो शहरातील वकिलांनी सांगितल्यानुसार, ‘अपघाताची सखोल चौकशी सुरु करण्यात आली असून, पोलीस, फॉरेन्सिक डॉक्टर आणि तांत्रिक सल्लागार आपले रिपोर्ट्स लकरच सादर करतील.
कामगार संघटनांकडून सखोल चौकशीची मागणी
CISL चे प्रमुख, Luigi Sbarra यांच्या म्हणण्यानुसार, ” असे अपघात टाळण्यासाठी लहान आणि मोठ्या सर्व कंपन्यांनी अपघात प्रतिबंधक नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच देखभाल, सुरक्षा तपासणी आणि कर्मचारी प्रशिक्षण यावर अधिक गुंतवणूक केली पाहिजे.”
राज्य एजन्सी इनेलच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी इटलीमध्ये 5 लाख 90 हजारांहून अधिक कामगार अशा प्रकारच्या घटनांमध्ये जखमी झाले होते. ज्यात सुमारे 1 हजार 147 लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. दरम्यान 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या कामगारांच्या राष्ट्रीय संपामधील मागण्यांपैकी ‘कामाच्या ठिकाणी उच्च दर्जाची सुरक्षितता प्रणाली हवी’ ही एक प्रमुख मागणी होती.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे