भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौकांची रशियामध्ये उभारणी सुरू, वर्षअखेरीस कार्यान्वित होण्याची शक्यता

0
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौकांची रशियामध्ये उभारणी केली जात असून वर्षअखेरीस त्या कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे या नौकांच्या उभारणीला उशीर झाला आहे.

भारतीय नौदलात सामील झाल्यानंतर यातील पहिली युद्धनौका आयएनएस तुशील तर दुसरी आयएनएस तमाल या नावाने ओळखल्या जातील. स्टेल्थ फ्रिगेट्स तुशिल वर्गाच्या युद्धनौकांचा एक भाग म्हणून बांधल्या जात आहेत, ज्यात तलवार वर्गाच्या सहा युद्धनौकांचा समावेश आहे.
साहित्य संचालनालय प्रमुखांच्या कर्मचाऱ्यांसह भारतीय नौदलाच्या एका पथकाने नुकतीच रशियातील शिपयार्डला भेट देऊन या कामाची पाहणी केली. या कामाने आता चांगली गती घेतली असून पहिल्या युद्धनौकेच्या आवश्यक त्या सागरी चाचण्यां रशियन नौदलाकडून घेण्यास सुरूवात झाली आहे.

या दोनही युद्धनौका यावर्षी अनुक्रमे ऑगस्ट आणि डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याचे भारतीय नौदलाकडून सांगण्यात येत आहे.

रशिया युक्रेन युद्धाचा या नौकाबांधणीवर मोठा परिणाम झाला आहे, कारण रशियन बंदरात उभारण्यात येणाऱ्या या युद्धनौकांमध्ये युक्रेनियन इंजिन्स वापरली जाणार आहेत. या युद्धनौकांवर ही इंजिन्स बसवण्यासाठी भारतीय शिपयार्डच्या कर्मचाऱ्यांना रशियात पाठवण्यात आले आहे.
पहिल्या युद्धनौकेच्या सागरी चाचण्या रशियन समुद्रात सुरू असून स्वीकृती चाचण्यांसाठी ती भारतीय नौदलाकडे लवकरच सुपूर्द करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी भारतीय नौदल अधिकारी लवकरच तिथे पोहोचणार आहेत.

याव्यतिरिक्त भारतात गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून (जीएसएल)  रशियाच्या मदतीने बांधण्यात येत असलेल्या नौकाबांधणीच्या मालिकेत आणखी दोन युद्धनौकांचे काम सुरू आहे. येत्या काही काळात गोवा शिपयार्डने तयार केलेली पहिली युद्धनौका आवश्यक त्या चाचण्यांसाठी पाण्यात उतरवली जाईल. या युद्धनौका 2026 च्या मध्यापर्यंत नौदलाकडे सुपूर्द केल्या जाण्याची शक्यता आहे. याशिवाय जीएसएलने आपल्या सुविधांचा विस्तार केला असून युद्धनौकांसाठी आवश्यक त्या सुविधांचा पुरवठा होईल याची खात्री करून घेतली आहे.

रशिया आणि भारत यांच्यातील शिपयार्डमध्ये युद्धनौका बांधण्याचा प्रकल्प मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असताना मंजूर झाला होता.

कोविड -19 मुळे जवळपास सर्वच लष्करी कार्यक्रमांना पुरवठा साखळीच्या समस्या भेडसावत असल्यामुळे या प्रकल्पाच्या कामालाही उशीर झाला. रशियामध्ये बांधल्या जाणाऱ्या या शेवटच्या दोन परदेशी युद्धनौका असणार आहेत. कारण भारतीय नौदलाकडून स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेला पाठिंबा दिला जात असून भारतीय शिपयार्ड आणि इथल्या कामगारांना अशा संधी मिळाव्यात यासाठी नौदलाचे नेतृत्व आग्रही आहे.

आराधना जोशी

(एएनआयकडून मिळालेल्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleझापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर पुन्हा ड्रोन हल्ला
Next articleएक्सवरील काही खाती ब्लॉक करण्यास नकार दिल्याने ब्राझीलच्या न्यायाधीशांकडून मस्क यांची चौकशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here