जर्मनीच्या पूर्वेकडील शहर मॅग्डेबर्ग येथील एका ख्रिसमस मार्केटमध्ये, भरधाव चारचाकी घुसल्यामुळे भीषण अपघात झाला. अचानक घुसलेल्या कारच्या धडकेमध्ये एका लहान मुलासह 2 जण ठार झाले आणि 68 जण जखमी झाले.
सॅक्सनी ॲनहॉल्ट राज्याचे प्रीमियर, रेनर हॅसेलॉफ यांनी एन-टीव्ही चॅनेलला दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्यांपैकी एक लहान मुलगा होता. सरकारी अधिकारी आणि शहर सरकारच्या वेबसाइटनुसार, या अपघातात जखमी झालेल्या 68 लोकांपैकी 15 जण अत्यावस्थेत आहेत.
मॅग्डेबर्ग ही सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याची राजधानी आहे, ज्याची लोकसंख्या सुमारे 2 लाख 40,000 इतकी आहे.
या घटनेविषयी बोलताना प्रादेशिक सरकारचे प्रवक्ते- मॅथियास शुप्पे आणि मॅग्डेबर्ग शहराचे प्रवक्ते मायकेल रीफ म्हणाले की, ‘हा अपघात नसून कोणीतरी मुद्दाम घडवून आणलेला घातपात आहे, अशी शंका आम्हाला आहे.’
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी क्रिसमस मार्केटमध्ये गाडी घुसवणाऱ्या सौदी अरेबियातील एका डॉक्टरला, जर्मन पोलिसांनी अटक केली आहे.
सॅक्सोनी-अनहॉल्टचे गृहमंत्री, तमारा झिस्चांग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेला 50 वर्षीय डॉक्टर हा सौदी अरेबियाचा असून, 2006 मध्ये तो पहिल्यांदा जर्मनीत आला होता.
याप्रकरणी चांसलर OIaf Scholz यांनी X (ट्विटर) वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की “ अपघातातील पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या सात्वंनपर भावना व्यक्त करतो. आम्ही त्या सर्वांच्या आणि मॅग्डेबर्गमधील नागरिकांच्या पाठीशी कायम उभे आहोत.”
‘बिल्ड’ (Bild) या स्थानिक वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या व्हिडिओमध्ये, ख्रिसमस मार्केट परिसरात झालेल्या अपघातातील जखमींना तिथले स्थानिक लोक मदत करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.
घटनास्थळावरु थेट प्रसारणादरम्यान एमडीआर वृत्तसंस्थेचा रिपोर्टर म्हणाला, की “माझ्या अंदाजानुसार येथे किमान 20 रुग्णवाहिका आहेत, बऱ्याच अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत आणि याशिवाय पोलिस हेलिकॉप्टर आकाशात मदतीसाठी घिरट्या घालत आहेत.” घटनास्थळी बरेच सशस्त्र पोलीस असल्याचेही या वार्ताहराने नमूद केले.
प्रत्यक्षदर्शींनी एमडीआरला सांगितले की, ‘एक कार अतिशय वेगात थेट ख्रिसमस मार्केटमध्ये घुसली आणि लोकांना उडवत सुसाट टाऊन हॉलच्या दिशेने गेली.’
“विशेषत: ख्रिसमसच्या दिवसांत, सध्याच्या आनंदी वातावरणात अशाप्रकारची भयंकर घटना घडणे खेदजनक आहे, ” असे मत सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्य सरकारचे प्रमुख रेनर- हॅसेलॉफ यांनी एमडीआर वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले.
पत्रकारांशी हॅसेलॉफ म्हणाले, की ते स्वत: मॅग्डेबर्गच्या दिशेने निघाले असून, घटनास्थळी भेट देणार आहेत.
शहरातील पोलीस आणि स्थानिक सरकारचे प्रवक्ते यांनी सदर घटनेबाबत त्वरित टिप्पणी देणे टाळले.
आठ वर्षांपूर्वी, अनीस आमरी नावाच्या एका ट्रकचालकाने, जो एक अपयशी ट्युनिशियनचा आश्रयार्थी होता, तसेच ज्याचे इस्लामिक कनेक्शन देखील होते, त्याने अशाचप्रकारे बर्लिनमधील एका गर्दीने भरलेल्या ख्रिसमस मार्केटमध्ये ट्रक घातला होता. ज्यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला होता तर इतर अनेक जण जखमी झाले होते.
(रॉयटर्स)