इस्रायली गोळीबारात दोन पॅलेस्टिनी किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाल्याचे पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या वेस्ट बँकमध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
इस्रायली सैन्याने या मुलांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी केलेली नाही. दोन संशयितांनी स्थानिक समुदायाच्या दिशेने काही स्फोटके फेकली, ज्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला. त्यामुळे सैनिकांनी थेट गोळीबार करून त्याला प्रत्युत्तर दिले.
लष्कराने दिलेल्या निवेदनानुसार त्या हल्लेखोरांची ओळख पटली आहे.
पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की वेस्ट बँकजवळील जेरिको शहराच्या अकाबत जाबेर निर्वासित छावणीच्या पश्चिमेस 16 आणि 17 वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाला.
पॅलेस्टिनी माध्यमांनी सांगितले की, वैद्यकीय पथकांना या जखमी किशोरवयीन मुलांपैकी एकापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात आले तर दुसऱ्याचा रविवारी जेरुसलेममधील रुग्णालयात मृत्यू झाला. यातील एका किशोरवयीन मुलाच्या डोक्यात आणि दुसऱ्याच्या छातीत गोळी लागली होती, असे पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
भविष्यात गाझासह स्वतंत्र देशाचा गाभा म्हणून पॅलेस्टिनींना हव्या असलेल्या वेस्ट बँकमध्ये गेल्या वर्षी गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून हिंसाचारात वाढ झाली आहे. इस्रायली सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात राबवलेल्या कारवाईत आतापर्यंत हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे.
त्याआधी इस्रायली सैन्याने शनिवारी वेस्ट बँकच्या व्याप्त भागातून किमान 20 पॅलेस्टिनींना ताब्यात घेतले. डिटेनी अफेअर्स कमिशन आणि पॅलेस्टिनी प्रिजनर सोसायटीच्या संयुक्त निवेदनानुसार या नवीन अटकेमुळे 7 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायली सैन्याने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनींची एकूण संख्या 8 हजार 975 झाली आहे.
हे अटकसत्र प्रामुख्याने जेनिन, नब्लस, कल्किल्या, बेथलहेम, हेब्रोन आणि जेरुसलेम या शहरांमध्ये राबवले गेले. या अटक मोहिमांदरम्यान इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच त्यांची घरे आणि मालमत्तेचे नुकसान केले, असेही त्या निवेदनात म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेतलेल्या प्रदेशात इस्रायली सैन्याच्या गोळीबारात किमान 519 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि सुमारे 5,000 जण जखमी झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात इस्रायलवर “नरसंहार” केल्याचा आरोप आहे. त्यामुळे न्यायालयाने आपल्या ताज्या निकालात तेल अवीवला दक्षिण गाझामधील रफाह या शहरातील आपले कार्य त्वरित थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या ठिकाणी दहा लाखांहून अधिक विस्थापित पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला होता.
आराधना जोशी
(रॉयटर्स)