इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाचा सर्वोच्च नेता आणि गटाच्या इतर सदस्यांना लक्ष्य करत अमेरिकी सैन्याने सोमालियामध्ये हवाई हल्ले केले, त्यामध्ये अनेकजण ठार झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.’ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, “गुहांमध्ये (सोमालियाच्या) लपून बसलेले हे दहशतवादी अमेरिका आणि आमच्या मित्र राष्ट्रांना धमकावत होते.”
“या हल्ल्यांमध्ये ते राहत असलेल्या गुहा उद्ध्वस्त झाल्या असून नागरिकांना कोणत्याही प्रकारे हानी न पोहोचवता अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले”.
सोमालियातील गोलिस पर्वतांमध्ये हे हल्ले करण्यात आले आणि प्रारंभिक माहितीनुसार यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे, असे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितले. यात कोणत्याही नागरिकाला दुखापत झालेली नाही, असे ते म्हणाले.
सोमालियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने सांगितले की राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांना या हवाई हल्ल्यांची माहिती देण्यात आली होती. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी “दहशतवादाविरोधातील आमच्या सामायिक लढाईत अमेरिकेच्या अखंड पाठिंब्याबद्दल” मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.
“अध्यक्ष महोदय, दहशतवादविरोधी प्रयत्नांमधील तुमचे धाडसी आणि निर्णायक नेतृत्व सोमालियासाठी अत्यंत मूल्यवान आणि स्वागतार्ह आहे.”
उत्तर सोमालियातील पुंटलँड राज्याच्या माहितीमंत्र्यांनी सांगितले की, अमेरिकेने गोलीस पर्वतरांगेचा भाग असलेल्या मिस्काड पर्वतरांगांवर काल हल्ला केला आणि इस्लामिक स्टेटच्या तळांना लक्ष्य केले.”
अंधार असल्याने मृतांची संख्या अद्याप कळू शकलेली नाही. पण आघाडीवर असलेल्या आमच्या सैन्याला स्फोटांचा आवाज ऐकू येत होते,” असे मंत्री मोहम्मद ऐदीद दिरिर यांनी पत्रकारांना सांगितले.
हेग्सेथ म्हणाले की, सोमालियातील हल्ल्यांमुळे इस्लामिक स्टेटची अमेरिका, त्याचे मित्रपक्ष आणि निष्पाप नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या हल्ल्यांचा कट रचण्याची आणि ते घडवून आणण्याची क्षमता कमी झाली आहे.
“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भक्कम सीमा-संरक्षण आणि इतर अनेक मोहिमा राबवत असलो तरी, अमेरिका आणि आमच्या मित्र राष्ट्रांना धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी अमेरिका नेहमीच तयार आहे, असा स्पष्ट संकेत यातून मिळतो,” असे ते एका निवेदनात म्हणाले.
रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक अशा दोन्ही प्रशासनाखाली अमेरिकेने सोमालियात वर्षानुवर्षे वेळोवेळी गरज पडेल तसे हवाई हल्ले केले आहेत. अर्थात बायडेन राजवटीत अमेरिका सोमालियामध्ये विशेष सक्रिय नव्हती हे पण लक्षात घ्यायला हवे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)