युक्रेनकडून रशियाच्या कुर्स्क प्रदेशात नव्याने आक्रमण सुरु झाले असल्याची माहिती, रशियाने रविवारी दिली. कुर्स्क पश्चिम रशियाचा एक भाग आहे, जिथून रशियन सैन्याने गेल्यावर्षी ऑगस्टपासून युक्रेनियन सैन्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली होती.
युक्रेनियन सैन्याने 6 ऑगस्ट रोजी, अचानक घुसखोरी करून रशियाची सीमा ओलांडली आणि तेथील काही भूभागावर ताबा मिळवला. कीवला संभाव्य शांतता चर्चेत महत्त्वाची सौदेबाजी करता यावी, हा त्यांचा यामागील मुख्य उद्देश असल्याचे समजते.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांचे सैन्य युक्रेनच्या सैन्याला मारहाण करत होते, परंतु रशियन लष्करी ब्लॉगर्सच्या काही अहवालांवरून असे सूचित होते की, रशियावर प्रचंड दबाव आला होता.
युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाचे प्रमुख- आंद्री येरमाक यांनी टेलिग्रामवर याबाबत पोस्ट केले आहे की, कुर्स्ककडून यानिमित्तीने एक “चांगली बातमी” मिळाली असून, “रशियाला तेच मिळते आहे ज्याचे ते पात्र आहेत.”
”युक्रेनकडून रशियन सैन्यावर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत”, असे वक्तव्य युक्रेनच्या अधिकृत सेंटर ‘अगेन्स्ट डिसइन्फॉर्मेशन’चे प्रमुख- अँड्री कोवालेन्को यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.
दुसरीकडे, रशियाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की ‘युक्रेनने बर्डिन गावाजवळ सुमारे 0600 GMT वर दोन टाक्या, एक माइन क्लिअरिंग वाहन आणि पॅराट्रूप्ससह 12 बख्तरबंद लढाऊ वाहनांसह हल्ला चढवला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या प्रतिहल्ल्यात, रशियन सैन्याचे उत्तर गटाचे तोफखाने आणि हवाईदलाने युक्रेनियन सशस्त्र दलाच्या आक्रमण गटाचा पराभव केला.’
‘युक्रेनचे दोन हल्ले रशियाने यशस्वीरित्या परतवून लावल्याचे’ही या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, रॉयटर्स जमिनीवरील परिस्थितीची स्वतंत्रपणे पडताळणी करू शकले नाहीत.
युक्रेनमधील मॉस्कोच्या युद्धाचे समर्थन करणाऱ्या मात्र अनेकदा अपयश आणि अडथळ्यांबद्दल गंभीरपणे अहवाल देणाऱ्या रशियाच्या, वॉर ब्लॉगर्सच्या अहवालात असे बऱ्याचदा दिसून आले आहे की, युक्रेनियन सैन्याच्या हल्ल्यामुळे तात्पुरते का होईना पण रशियन सैन्याने संरक्षणात्मक पवित्रा घेतला आहे.
“शत्रूचा जोरदार दबाव असूनही, आमच्या युनिट्सने वीरतापूर्वक भूमिका धारण केली आहे,” असे ऑपरेशननंतरच्या पहिल्या तासात, ऑपरेशनल रिपोर्ट्स वाहिनीने सांगितले.
आणखी एक प्रभावशाली ब्लॉगर- युरी पोडोलियाक म्हणाले की, ‘रशियन युनिट्सने सुरुवातीच्या “चुका” नंतर, हळूहळू परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि राजधानी कुर्स्ककडे जाणाऱ्या महामार्गाच्या उत्तरेकडील युक्रेनियन सैन्याला यशस्वीपणे वेढा घातला.’
कुर्स्कचे कार्यवाहक गव्हर्नर अलेक्झांडर खिंश्टेइन, यांनी लोकांना फक्त अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवण्यास सांगितले असून, विस्थापित झालेल्या रहिवाशांना सुरक्षा नसलेल्या क्षेत्रांत परत न येण्याचा इशारा दिला आहे.
तथापि, युक्रेनने कुर्स्क आक्रमणासाठी त्यांची सर्वात प्रभावी युनिट्स काही प्रमाणात वापरल्याने, त्यांच्या स्वतःच्या प्रदेशांच्या संरक्षण क्षमतेत कमकुवतपणा आला आहे. रशियन सैन्यने ऑगस्टपासून 2022 नंतरच्या त्यांच्या सर्वात वेगाने प्रगती केली आहे.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)