युक्रेनने शुक्रवारी स्थानिक पातळीवर तयार केलेल्या नवीन “रॉकेट-ड्रोन” चे प्रक्षेपण केले. हे ड्रोन 700 किमीपर्यंतच्या लक्ष्याचा भेद करू शकतात. पाश्चिमात्य मित्रराष्ट्रांनी युक्रेनला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांच्या दुप्पट पल्ल्यावर मारा करणारी ही ड्रोन्स आहेत.
“पेक्लो” नावाचे हे मानवरहित ड्रोन – ज्याचा युक्रेनियन भाषेतील अर्थ आहे नरक – कीवने अनावरण केलेले या प्रकारचे दुसरे “रॉकेट ड्रोन” आहे. 33 महिन्यांपूर्वी आक्रमण केलेल्या रशियात अतिशय आतपर्यंत हल्ला करण्याची क्षमता यातून वाढवण्याचा युक्रेन प्रयत्न करत आहे.
ही ड्रोन्स ताशी 700 किमी वेगाने जाऊ शकतात, असे युक्रेनियन राज्य शस्त्रास्त्र उत्पादक युक्रोबोरोनप्रॉमच्या प्रतिनिधीने एका समारंभात पत्रकारांना सांगितले. याच समारंभात ही ड्रोन्स अधिकृतपणे सशस्त्र दलांकडे सोपवण्यात आली.
अर्थात या ड्रोन्सबाबत इतर कोणतेही तपशील देण्यात आले नाहीत. याशिवाय ड्रोन कोणत्या श्रेणीचे आहे किंवा त्याच्या नेमक्या वेगाचा कोणताही पुरावा यावेळी देण्यात आला नाही. अशी माहिती उघड केली तर रशिया त्याचा फायदा उचलेल या भीतीने युक्रेनने आपल्या शस्त्रास्त्र उद्योगाचे अतिशय मर्यादित तपशील जाहीर केले आहेत.
युक्रेनच्या शस्त्रास्त्र उत्पादन मंत्र्याने नोव्हेंबरमध्ये सांगितले की “रॉकेट-ड्रोन” कडे क्रूझ क्षेपणास्त्रासारखे काहीतरी म्हणून पाहिले जाऊ शकते, जे सहसा आवाजाच्या वेगापेक्षा कमी वेगाने, त्याच्या लक्ष्याच्या निर्देशित मार्गावर खाली उडते.
ड्रोन एक मीटरपेक्षा जास्त लांब असून त्याच्या दोन्ही बाजूंना लहान पंख आणि शेपटीच्या बाजूने दोन पंख आहेत. अमेरिकेने पुरवलेल्या एटीएसीएमएस क्षेपणास्त्रांची घोषित श्रेणी 300 किमी एवढीच आहे.
रशियाने संपूर्ण युक्रेनमध्ये लष्करी आणि पायाभूत सुविधांच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी हजारो लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स यांचा वापर केला आहे.
कीवने प्रतिहल्ला करण्याची क्षमता एकवटली असली तरी गेल्या महिन्यापर्यंत त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियाच्या आत खोलवर असलेल्या लक्ष्यांवर त्यांच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास परवानगी देण्याच्या आवाहनाला विरोध केला.
युक्रेनने रशियाच्या आत एक हजार किमीपर्यंतच्या लक्ष्यांवर स्फोटकांनी भरलेले प्रोपेलर ड्रोन प्रक्षेपित करून संपूर्ण युद्धात लांब पल्ल्याच्या हल्ल्यातील अंतर संतुलित करण्याचा प्रयत्न केला आहे.
शुक्रवारी झालेल्या समारंभासाठी राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की उपस्थित होते. गेल्याच महिन्यात युक्रेन चार वेगवेगळ्या क्षेपणास्त्रे विकसित करत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
मात्र यशस्वी प्रक्षेपण होऊनही, क्षेपणास्त्र कार्यक्रम जागतिक पुरवठा साखळी समस्यांमुळे असुरळीत असल्याचे युक्रेनच्या शस्त्रमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)