सीरियातील बंडखोरांच्या हालचालींमध्ये दिवसागणीक वाढ होताना दिसत आहेत. Syria मधील बंडखोरांनी शुक्रवारी सरकारी सैन्याविरूद्ध अचानक हल्लाबोल केल्यामुळे, मध्य सीरियाच्या ‘होम्स’ शहरातील हजारो लोकांनी घाबरुन तिथून पलायन केल्याचे, रहिवासी आणि युद्ध देखरेख गटाचे म्हणणे आहे. बंडखोरांनी उत्तर सीरियातील ‘अलेप्पो’ आणि मध्य सीरियातील ‘हामा’ ही दोन प्रमुख शहरे याआधी काबीज केली आहेत. साधारण १४ वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात संपूर्ण सीरियातून निदर्शनांना आणि बंडखोरीला सुरुवात झाली होती.
बंडखोरांच्या या अचानक झालेल्या घुसखोरीमुळे, होम्स शहरातील हजारो नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी गुरुवारी रात्री पासूनच पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशाकडे धाव घेतल्याची माहिती ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स’ (Syrian Observatory for Human Rights) ने दिली आहे. सीरियातील पश्चिम किनारपट्टीकडचा बहुतांश प्रदेश हा तिथल्या सरकारचा गड मानला जातो. किनारी भागातील एका रहिवाशाने सांगितल्याप्रमाणे, ‘बंडखोरांच्या अचानक झालेल्या घुसखोरीमुळे आणि त्यांच्या वेगवान हालचालींमुळे होम्स शहरातील लोक बिथरले आहेत आणि त्यामुळेच चे मोठ्याप्रमाणावर इथे पोहचत आहेत.’
लेबनॉनचे वाहतूक मंत्री अली हमीह यांच्या म्हणण्यानुसार, ‘शुक्रवारी सकाळी लेबनॉन आणि सीरिया दरम्यानच्या दोन सीमांलगत इस्रायली हवाई हल्ले झाले.’ या Air Strike मुळे लेबनॉनसह अरिदा येथील सीमा सेवा बंद झाल्याचे सांगत, सीरियन स्टेट न्यूज एजन्सी (SANA) यांनी हमीह यांच्या विधानाची पुष्टी केली आहे.
‘’लेबनीज सीमेवर सीरियाच्या बाजूने शस्त्रे हस्तांतरण केंद्र आणि पायाभूत सुविधांवर आम्ही संपूर्ण रात्र हल्ला करत होतो’’, अशी कबुली इस्रायली सैन्याने दिली असून, हे मार्ग लेबनीज सशस्त्र गट हिजबुल्लाहने शस्त्रे तस्करीसाठी वापरले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
सीरियच्या लष्करी अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या रात्री बंडखोरांना रोखण्यासाठी मुख्य M5 महामार्गावरील रुस्तान पूल देखील नष्ट केला गेला. जो होम्सचा मुख्य मार्ग आहे. या पुलावर एकूण ८ एअर स्ट्राईक केले गेले. याशिवाय सरकारी सैन्याने शहराच्या आसपासच्या भागांवरही सुरक्षेच्या दृष्टीने आपले लक्ष केंद्रित केले होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी ‘हयात तहरीर अल-शाम’ या इस्लामी गटाच्या नेतृत्वाखाली होम्स शहर, सीरयाची राजधानी असलेले दमास्कस शहर आणि किनारपट्टीलगत असदच्या मध्यभागाला जोडणारे क्रॉसरोड शहर, काबीज करणार असल्याचा खुला इशारा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर एका बंडखोर ऑपरेशन रूमने, होम्स शहराच्या रहिवाशांना एका ऑनलाइन पोस्टद्वारे आवाहन केल्याचे समजते. या पोस्टमध्ये त्यांनी होम्सवासियांना ‘आता तुमची वेळ आली आहे’, असा संदेश दिला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे