युक्रेनचा दावा: रशियाची ३५ क्षेपणास्त्रे आणि ४६ ड्रोन पाडले
दि. ०१ जून: रशियाच्या लष्करीदलांनी शनिवारी केलेल्या हवाईहल्ल्यात युक्रेनच्या पाच प्रांतातील वीज उत्पादन केंद्रांचे आणि उर्जा विषय पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, रशियाकडून डागण्यात आलेल्या ५३ क्षेपणास्त्रांपैकी ३५ आणि ४७ ड्रोनपैकी ४६ ड्रोन युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाडल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास युक्रेनची वीज निर्मिती केंद्रे आणि उर्जा सुविधांना लक्ष्य करून रशियाच्या लष्करीदलांनी एका पाठोपाठ एक हवाईहल्ले केले. हे हल्ले क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या मदतीने करण्यात आले. या हवाईहल्ल्यात युक्रेनच्या पूर्व दोनेत्स्क, आग्नेय दिशेला असलेल्या झापोरीझ्झ्हिया आणि द्निप्रोपेत्रोव्स्क, मध्य प्रांतातील क्य्रोवोह्रड आणि पश्चिम प्रांतातील इवानो-फ्रान्कोव्स्क या भागातील वीज निर्मिती केंद्रे आणि उर्जा विषयक पायाभूत सुविधांना रशियाच्या हवाईहल्ल्यात लक्ष्य करण्यात आले, असे युक्रेनच्या नॅशनल ग्रीडच्या नियंत्रक असलेल्या युक्रेनेर्जो या संस्थेने सांगितले. ‘शनिवारी सकाळी रशियाच्या हवाईहल्ल्याने युक्रेनच्या वीज निर्मिती केंद्रांना लक्ष्य केले. मार्च महिन्यापासून युक्रेनच्या वीज केंद्रांना लक्ष्य करून रशियाकडून करण्यात आलेला हा सहावा मोठा आणि क्षेपणास्त्रे व ड्रोनचा वापर करून करण्यात आलेला हल्ला आहे. या हल्ल्यात रशियाकडून ५३ क्षेपणास्त्रे आणि ४७ ड्रोन डागण्यात आली. मात्र, त्यापैकी अनुक्रमे ३५ क्षेपणास्त्रे आणि ४६ ड्रोन युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेकडून पाडण्यात आली, असे ‘युक्रेनेर्जो’ आणि युक्रेनच्या हवाईदलाकडून सांगण्यात आले आहे.
रशियाने या वर्षीच्या मार्च महिन्यापासूनच युक्रेनच्या वीज निर्मिती केंद्रांना आणि उर्जा विषयक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या केंद्रांवर रशियाकडून मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक करण्यात येत आहे. या मुळे युक्रेनच्या औष्णिक आणि जलविद्युत प्रकल्पांचे आणि वीज केंद्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी युक्रेनमध्ये विजेचे संकट उभे राहिले असून, नागरिकांना ‘ब्लॅक आऊट’चा सामना करावा लागत आहे. या संकटामुळे युक्रेनला विजेची मोठ्याप्रमाणात आयात करावी लागत आहे. गेल्या तीन महिन्यात युक्रेनची वीज आयात विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. रशियाने केलेल्या हवाईहल्ल्यात दोन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले असून, तेथील उपकरणेही उद्ध्वस्थ झाली आहेत, असे युक्रेनच्या वीज निर्मिती क्षेत्रातील खासगी कंपनी ‘डीटीईके’ने म्हटले आहे. या हल्ल्यामुळे ठिकठिकाणी लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले असून, आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाची धावपळ चालू आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)