चीनच्या अनुपस्थितीमुळे रशियाला एकटे पडण्याच्या मोहिमेला खीळ
दि. १५ जून: युक्रेनशी पुकारलेले युद्ध थांबवावे या साठी रशियावर दबाव टाकण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या युक्रेन शिखर परिषदेसाठी जागतिक नेत्यांनी हजेरी लावली आहे. मात्र, रशियाचा जवळचा मित्र मानल्या जाणाऱ्या चीनची या परिषदेतील अनुपस्थिती रशियाला एकटे पडण्याच्या युक्रेनच्या प्रयत्नांना खीळ पोहोचविणारी असल्याचे मत आंतराष्ट्रीय संबंध विषयक तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
रशियाने आक्रमण केल्यानंतर २०२२च्या शेवटी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी जागतिक समुदायाचा पाठींबा मिळवण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरु केले होते. त्यांनी या शिखर परिषदेची कल्पना जागतिक समुदायासमोर मांडली होती. त्यानुसार स्वित्झर्लंडमधील बुएर्गेन्स्तोक या रिसोर्टवर जागतिक नेत्यांचे या परिषदेसाठी आगमन झाले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेले युद्ध दुसऱ्या महायुद्धानंतरचा युरोपातील सर्वांत मोठा रक्तरंजित संघर्ष मनाला जात आहे. लवकरच या युद्धला तीन वर्षे पूर्ण होतील. मात्र, हे युद्ध नजीकच्या भविष्यात थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या युद्धामुळे रशियाला फटका बसला असला, तरी युक्रेनची मात्र पार वाताहत झाली आहे. म्हणूनच या समस्येतून तोडगा काढण्यासाठी झेलेन्स्की यांनी जागतिक नेत्यांना या शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. ही परिषद आज, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस होणार आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कामाला हॅरीस, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, तसेच जर्मनी, इटली, ब्रिटन, कॅनडा, जपान या देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तर, रशियाशी सौहार्दाचे संबंध असणारे भारत, तुर्किये आणि हंगेरी हे देशही या परिषदेसाठी उपस्थित आहेत. मात्र, या परिषदेत चीनची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली आहे. चीनच्या अनुपस्थितीमुळे रशियाला जागतिक स्तरावर एकटे पाडून युद्ध थांबविण्यास भाग पाडण्याच्या युक्रेनच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. तसेच, गाझामध्ये सुरु असलेला इस्त्राईल हमास संघर्षही युक्रेनवरून जागतिक समुदायांचे लक्ष्य हटविण्यास कारणीभूत ठरला आहे.
I arrived in Switzerland for the Global Peace Summit. There will be two days of active work with countries from all parts of the world, with different nations that are nonetheless united by a common goal of bringing a just and lasting peace in Ukraine closer.
The Peace Summit… pic.twitter.com/DhS54e1Xk0
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) June 14, 2024
रशियाने केलेल्या आक्रमणामुळे उद्भवलेल्या अन्नसुरक्षा, आण्विक सुरक्षा आणि नौकानयनाचे स्वातंत्र्य या अधिक मोठ्या प्रश्नांवर या परिषदेत चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यानंतर होणाऱ्या संयुक्त घोषणापत्रात रशियाला आक्रमक म्हणून घोषित करण्यात येईल, असे परिषदेतील सूत्रांनी सांगितले. रशियाने पूर्वीच ‘निरुपयोगी’ या शब्दांत या परिषदेची संभावना केली आहे. तर, चीन आणि ब्राझीलने अशा स्वरुपाची स्वतंत्र परिषद आयोजित करण्याचे ठरविले आहे. रशियानेही या परिषदेला मान्यता दिल्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये सूर असलेल्या युक्रेन शिखर परिषदेच्या यशाबाबत शंका व्यक्त होत आहे. ‘ही परिषद युक्रेनच्या राजनयाच्या (डिप्लोमसी) मर्यादा उघड करणारी आहे,’ असे मत संयुक्त राष्ट्राच्या इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपचे संचालक रिचर्ड गोवन यांनी व्यक्त केले. मात्र, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या घोषणापत्राचे रक्षण करण्याची आठवण या निमित्ताने जागतिक समुदायाला करून देण्याची संधी युक्रेनला मिळाली, हे काही कमी नाही, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी शुक्रवारी युक्रेनसमोर शांतता प्रस्ताव ठेवला आहे. ‘युक्रेनने ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याचा हट्ट सोडला आणि रशियाने दावा सांगितलेले चार प्रदेशांवरील दावा सोडला, तर रशियाकडून तातडीने युद्ध थांबविण्यात येईल,’ असे पुतीन यांनी म्हटले होते. मात्र, युक्रेनकडून हा प्रस्ताव तातडीने फेटाळण्यात आला आहे. रशियाच्या फौजा या युद्धात वरचढ आहेत या आत्मविश्वासामुळेच ओउतीन यांच्याकडून अशा स्वरूपाचा प्रस्ताव देण्यात आल्याचे मत तज्ज्ञाकडून व्यक्त होत आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’’सह)