युक्रेनला शस्त्र पुरवठा करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय, अनेक गोष्टी गुलदस्त्यातच

0
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला शस्त्रास्त्रे देण्याबाबतची आपली भूमिका बदलली आहे. युरोपियन मित्र राष्ट्रांना त्यांची विद्यमान शस्त्रे कीवला दान करण्यास प्रोत्साहित करणारी आणि त्याचबरोबर अमेरिकन बनावटीची शस्त्रास्त्रे खरेदी करता येतील अशा योजनेला आता ते पाठिंबा देत आहेत.

आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे – कीव ज्या पॅट्रियट क्षेपणास्त्र बॅटरीजची आतुरतेने मागणी करत आहे त्यांच्यासह त्यांच्या मौल्यवान प्रणाली प्रत्यक्षात कोण सोडेल यावर सहमती.

“आम्ही टॉप-ऑफ-द-लाइन (अत्युच्च दर्जाची) शस्त्रे बनवणार असून आणि ती नाटोला पाठवली जातील,” असे ट्रम्प यांनी सोमवारी ओव्हल ऑफिसमध्ये सांगितले.

यातील पॅट्रियट क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली “पुढील काही दिवसांत” युक्रेनमध्ये पोहोचतील, असे ट्रम्प म्हणाले. मात्र युक्रेनला देण्यात येणाऱ्या अमेरिकेच्या पाठिंब्याला MAGA (Make America Great Again) चळवळीतील काही उच्चपदस्थ व्यक्तींकडून विरोध होत आहे.

अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांमध्ये जास्त मागणी असलेल्या महागड्या पॅट्रियट प्रणाली – युक्रेनच्या शहरांना लक्ष्य करणाऱ्या रशियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यात प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, युरोपियन मित्र राष्ट्रांसोबत प्रस्तावित व्यवस्थेअंतर्गत अमेरिकेने अतिरिक्त आधुनिक शस्त्रे पाठवण्याची तयारी दर्शविली आहे. तर दुसरीकडे युक्रेनने मॉस्कोवर हल्ला करण्यापासून स्वतःला  परावृत्त करावे असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

चर्चेशी परिचित असलेल्या दोन सूत्रांनुसार, ट्रम्प आणि नाटो सरचिटणीस मार्क रुट यांनी अलिकडच्या काळात आखलेल्या या योजनेचे युक्रेन आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडून सकारात्मक पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे.

कीव आणि इतर नेत्यांनी ट्रम्प यांच्याकडून झालेला हा  एक मोठा बदल साजरा केला आहे. कारण अलिकडच्या आठवड्यांपर्यंत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबद्दल ट्रम्प यांची कौतुकास्पद वक्तव्ये प्रसिद्ध होत होती.

परंतु या घोषणेनंतर, ट्रम्प यांनी एक चौकट सादर केली आहे जी खरंतर ती एक स्पष्ट योजना नाही. युक्रेनसाठी कोणताही पाठिंबा किती भौतिक असेल हे अमेरिका आणि युरोपमधील 10 अधिकाऱ्यांच्या मते, कोणती साधनसामुग्री कोण पुरवते हे पुढील वाटाघाटींवर अवलंबून असेल.

“नेहमीप्रमाणे, या गोष्टींबद्दल, अजूनही अनेक गुंतागुंतीचे मुद्दे तपशीलात शिल्लक आहेत,”  असे वॉशिंग्टनमधील एका उत्तर युरोपीय राजदूताने सांगितले.

मुख्य प्रश्न असा आहे की पॅट्रियट बॅटरी कोण आणि केव्हा देणार आहेत?

पॅट्रियटला प्राधान्य देणार?

सोमवारी ट्रम्प यांच्यासोबतच्या ओव्हल ऑफिसच्या बैठकीत उपस्थित असणाऱ्या रुट यांनी सहा नाटो देशांचा उल्लेख केला – फिनलंड, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड्स आणि कॅनडा – जे शस्त्रास्त्र खरेदी योजनेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत.

“माझे स्पष्ट मत आहे की कोणालाही आगाऊ अचूक तपशीलांची माहिती देण्यात आलेली नाही आणि मला असेही वाटते की प्रशासनात ते आता प्रत्यक्षात याचा अर्थ काय आहे हे ठरवू लागले आहेत,” असे एका युरोपियन राजदूताने सांगितले.

संपूर्ण प्रचार मोहिमेदरम्यान, ट्रम्प म्हणाले होते की ते युरोपियन देशांना त्यांच्या संरक्षणावर अधिक खर्च करण्यास भाग पाडतील. याचे  MAGA ला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले होते. “तुम्हाला पैसे द्यावे लागतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले होते. “जर ते पैसे देणार नसतील तर आम्ही संरक्षण करणार नाही, ठीक आहे?”

व्होल्कर म्हणाले की युक्रेनला शेवटी 12 ते 13 पॅट्रियट बॅटरी मिळू शकतात परंतु त्या सर्व युक्रेनच्या पोहोचवण्यासाठी आणखी एक वर्ष लागू शकते.

“जर्मनी, नॉर्वे, डेन्मार्क, नेदरलँड्स, स्वीडन, युनायटेड किंग्डम, कॅनडा आणि फिनलंडसह अनेक युरोपीय देशांनी आधीच या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे,” असे नाटोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. “या संदर्भातील तपशीलांवर अजूनही चर्चा सुरू आहे.”

व्हाईट हाऊसने टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही, तसेच वॉशिंग्टनमधील युक्रेनियन किंवा रशियन दूतावासांनीही प्रतिसाद दिला नाही.

‘आम्ही तयार आहोत’

अलिकडच्या आठवड्यांपासून ट्रम्प यांचे मॉस्कोबद्दलचे वक्तृत्व वेगाने कठोर होत चालले आहे, असे दोन अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, पुतीन हे चांगल्या हेतूने वाटाघाटी करत नाहीत असा त्यांचा दृढ विश्वास वाढत असल्याचे दिसून आले आहे.

“एका विशिष्ट टप्प्यावर, तुम्हाला माहिती आहेच की, शेवटी चर्चा ही केवळ बोलण्रापुरती उरत नाही. ती कृतीत आणावी लागते. त्याचे परिणाम असावे लागतात,” असे ट्रम्प यांनी सोमवारी रुट यांच्याशी झालेल्या भेटीत सांगितले.

क्रेमलिन जवळच्या तीन रशियन सूत्रांनी सांगितले की पुतीन पश्चिमेकडून येणाऱ्या दबावाखाली युद्ध थांबवणार नाहीत आणि त्यांचा असा विश्वास आहे की रशिया – जो पश्चिमेने लादलेल्या सर्वात कठोर निर्बंधांपासून अद्याप तग धरून आहे – पुढील आर्थिक अडचणीही सहन करू शकतो. त्यांचा रोख ट्रम्प यांनी सोमवारी रशियन तेल खरेदीदारांवर अमेरिकेने शुल्क लादण्याची जी धमकी दिली होती त्याकडे होता.

“आम्ही सहभागी होण्यास तयार आहोत,” असे डॅनिश परराष्ट्र मंत्री लार्स लोके रासमुसेन यांनी मंगळवारी ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियन मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी पत्रकारांना सांगितले.

एका अधिकाऱ्याने जर्मनी, ग्रीस, नेदरलँड्स आणि स्पेन हे देश कीवमध्ये पॅट्रियट बॅटरी पाठवण्यासाठी चांगला पर्याय असल्याचे सांगितले, कारण त्यांच्याकडे अनेक बॅटरीज आहेत किंवा त्यांना तोंड द्यावे लागणारे धोके तुलनेने कमी आहेत.

ग्रीस आणि स्पेनसह काही देशांकडून अजूनही मित्र राष्ट्रांनी त्यांच्या काही पॅट्रियट सिस्टम युक्रेनला देण्याच्या आवाहनाला विरोध होत आहे, कारण ते त्यांच्या स्वतःच्या देशांचे आणि संपूर्ण नाटोचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहेत असा युक्तिवाद केला आहे.

युक्रेनला पाठवण्यात येणाऱ्या अतिरिक्त शस्त्रांचे श्रेय घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे युरोपमध्ये काही प्रमाणात वाद निर्माण झाला आहे.

युरोपियन समर्थन

“जर आपण या शस्त्रांसाठी पैसे दिले तर ते एकप्रकारे आमचे समर्थन आहे,” असे ब्रुसेल्स बैठकीनंतर बोलताना युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कॅलास म्हणाल्या. त्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

“तर हा युरोपियन पाठिंबा आहे आणि आम्ही युक्रेनला शक्य तितकी मदत करत आहोत… जर तुम्ही शस्त्रे देण्याचे वचन दिले, पण दुसरे कोणीतरी त्यासाठी पैसे देणार आहे असे म्हटले तर ते खरोखर तुम्ही दिलेले नाही, नाही का?”

ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की 17 पॅट्रियट असलेला एक देश आहे, त्यापैकी काही थेट युक्रेनला जातील.

या आकडेवारीमुळे युरोपियन मित्र राष्ट्रांमध्ये आणि कॅपिटल हिलमध्ये व्यापक गोंधळ निर्माण झाला आहे – ज्यापैकी अनेकांना अजूनही अचूक माहिती देण्यात आलेली नाही असा दावा अमेरिकन आणि युरोपियन अधिकाऱ्यांनी केला आहे.

अमेरिकेशिवाय इतर कोणत्याही नाटो सदस्याकडे इतक्या संख्येने पॅट्रियट सिस्टीम नाहीत, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ट्रम्प कदाचित लाँचर्स किंवा क्षेपणास्त्रांसारख्या विशिष्ट पॅट्रियट घटकांचा संदर्भ देत असावेत असा अंदाज बांधला जात आहे.

सोमवारी पेंटागॉनला भेट देणारे जर्मन संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस म्हणाले की, जर्मनी येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यात अमेरिकेसोबत युक्रेनला पॅट्रियट बॅटरी पाठवण्याबाबत चर्चा करतील. परंतु कोणतीही पॅट्रियट सिस्टीम अनेक महिने कीवमध्ये पोहोचणार नाही, असे त्यांनी सांगितले, त्यामुळे रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या उन्हाळ्याच्या महिन्यांपर्यंत कोणतीही शस्त्रे मिळण्यास विलंब होण्याचीच शक्यता आहे.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की ट्रम्प थेट वाटाघाटींमध्ये गुंतले आहेत, अर्थात आतापर्यंतच्या चर्चा “धूसर” होत्या.

“आतापर्यंत अनेक देशांनी, ‘आम्ही मदत करू शकतो,'” असे सांगितले असले आहे असे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

“आतापर्यंत, याचा नेमका अर्थ काय ते आम्हालाही माहित नाही.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articlePutin, Unfazed By Trump, Could Try To Take More Of Ukraine
Next articleIndia Joins Massive Multinational Military Drill in Australia as China Watches Closely

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here