काल रात्रभर सुरू असलेल्या हल्ल्यात रशियाने प्रक्षेपित केलेली चारपैकी दोन क्षेपणास्त्रे आणि चारही ड्रोन पाडल्याचे युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे. रशियाने प्रक्षेपित केलेली केएच-59 क्षेपणास्त्रे तसेच दोन इस्कंदर-एम बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे युक्रेनच्या हवाई संरक्षण दलांनी पाडल्याचे अहवालात म्हटले आहे. इस्कंदर क्षेपणास्त्रे ईशान्य खार्किव प्रदेशाला लक्ष्य करत प्रक्षेपित करण्यात आली होती असे लष्कराने सांगितले. गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह यांच्या कार्यालयाने मात्र या हल्ल्याबाबतचा कोणताही अहवाल अद्याप दिलेला नाही.
दनिप्रोपेट्रोव्स्कचे गव्हर्नर सेरही लिसाक यांनी सांगितले की, हवाई संरक्षण दलाने मध्य युक्रेनमधील त्यांच्या प्रदेशात आलेले क्षेपणास्त्र नष्ट केले आहे. तिथे रात्रभर अनेक वेळा रशियाकडून हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये एक 12 वर्षांचा मुलगा जखमी झाला असून दोन घरांचे नुकसान झाल्याचे राज्यपालांनी सांगितले. किरोव्होराडचे गव्हर्नर आंद्री रायकोविच म्हणाले की, हवाई संरक्षण दलाने केलेल्या कारवाईमुळे मध्य युक्रेनमध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही.
दुसऱ्या एका घटनेत गुरुवारी रशियन सैन्याने डोनेट्स्कच्या पूर्व युक्रेनियन प्रदेशातील कोस्तियांटिनिवका शहरावर गोळीबार केल्याने किमान दोन जणांचा मृत्यू झाला, असे प्रादेशिक गव्हर्नरने सांगितले. शहरातील निवासी भागात सकाळी हल्ले झाल्याचे वादिम फिलाश्किनने सोशल मिडियावर सांगितले. डोनेट्स्क प्रदेशातील युक्रेनच्या ताब्यात असलेल्या भागांमध्ये नियमितपणे रशियन तोफगोळे आणि हवाई हल्ले होत आहेत. रशियन सैन्याने या प्रदेशातील अनेक विभागांवर नियंत्रण मिळवले आहे, त्यामुळे इतर चार युक्रेनियन प्रदेशांसह हा पण आपलाच स्वतःचा प्रदेश असल्याचा रशियाचा दावा आहे.
रशियाने पोक्रोव्स्कच्या पूर्वेकडील रसद केंद्राच्या दिशेला असलेल्या भागांना धोरणात्मक पद्धतीने लक्ष्य केले आहे. त्यामुळे डोनेट्स्क या प्रदेशातदेखील मोठ्या प्रमाणात युद्ध होत आहे. बुधवारी डोनेट्स्क येथे रशियाने केलेल्या गोळीबारात किमान चार जणांचा मृत्यू झाला. रशियाच्या कुर्स्क प्रदेशात युक्रेनच्या सैन्याशी रशियन सैन्याने लढा दिल्यानंतर गुरुवारी गोळीबार करण्यात आला. युक्रेनच्या सैन्याने तीन दिवसांपूर्वी सीमा ओलांडत रशियात प्रवेश केला. मॉस्कोच्या म्हणण्यानुसार रशियाला युक्रेनसोबतच्या लढाईत आघाडीवर असणारे साधने इतरत्र वळविण्यास भाग पाडण्याचा तो एक प्रयत्न होता.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)