
तेलंगणातील एका भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यात दरोड्याच्या संशयास्पद प्रयत्नादरम्यान अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. 27 वर्षीय या विद्यार्थ्याचे नाव प्रवीण कुमार गम्पा असे आहे. गम्पाच्या निवासस्थानाजवळ हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गम्पा विस्कॉन्सिन विद्यापीठात डेटा सायन्समध्ये एमएस करत होता.
“तो एका स्थानिक दुकानात अर्धवेळ काम करत होता आणि दोन महिन्यांत त्याचे शिक्षण पूर्ण होणार होते,” असे प्रवीण कुमारची बहीण जी. गायत्री हिने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
प्रवीण कुमार गम्पाचे वडील गम्पा राघवुलु यांनी सांगितले की, त्यांना पहाटे 2 वाजून 5 मिनिटांनी व्हॉटसअपवर फोन आला. मात्र तो फोन ते घेऊ शकले नाहीत त्यामुळे आपल्या मुलाला परत फोन करण्यास सांगणारा व्हॉईस मेसेज त्यांनी पाठवला.
‘आम्हाला त्या व्हॉईस मेसेजलाही रिप्लाय मिळाला नाही. जेव्हा आम्ही त्याला मोबाईलवर फोन केला, तेव्हा कोणीतरी अनोळखी व्यक्तीने उत्तर दिले आणि सांगितले की त्यांना माझ्या मुलाचा फोन सापडला आहे,” असे राघवुलु यांनी वृत्तपत्राला सांगितले.
“त्यानंतर त्यांनी त्याची जन्मतारीख विचारली, हे काहीतरी विचित्र घडतंय असं वाटत होते,” ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, प्रवीणच्या मित्रांनी त्यांना घटना घडल्याचे कळवले.
राघवुलु म्हणाले, “त्याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला.” जी. गायत्री म्हणाली की, या घटनेमुळे कुटुंब ‘उद्ध्वस्त’ झाले आहे. तिने सांगितले की कुटुंब गोळीबाराबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी धडपडत आहे.
भारतीय दूतावासाची प्रतिक्रिया
शिकागोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने प्रवीण कुमारच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
“विस्कॉन्सिन-मिलवॉकी विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थी प्रवीण कुमार गम्पा यांच्या अकाली निधनामुळे आम्हाला दुःख झाले आहे. वाणिज्य दूतावास प्रवीणच्या कुटुंबाच्या आणि विद्यापीठाच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. आम्ही मनापासून व्यक्त केलेले शोकसंदेश आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आहेत,” असे वाणिज्य दूतावासाने एक्स वर लिहिले.
गेल्या वर्षी अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या अनेक हल्ल्यांच्या बातम्या आल्या.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुटसह)