अमेरिका–चीनमध्ये नौदल चर्चा; दक्षिण चीन समुद्र आणि तैवान तणावांवर भर

0
चीन

चीनच्या नौदलाने शनिवारी जाहीर केले की, या आठवड्यात अमेरिका आणि चीनमध्ये सागरी सुरक्षेबाबत “मनमोकळ्या आणि लाभदायक” चर्चा पार पडल्या, ज्यामुळे अनेक महिन्यांच्या व्यापार तणावानंतर दोन्ही महासत्तांमधील लष्कर-ते-लष्कर संवाद हळूहळू पूर्ववत होत असल्याचे दिसून येते.

पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीच्या (अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर केलेल्या पोस्टनुसार, 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान हवाई येथे, कार्य-पातळीवरील बैठका घेण्यात आल्या.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभानंतर, लष्करी मुद्द्यांवर आधारित अशा कार्य-पातळीवरील बैठका, याआधी एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात अमेरिकेचे आणि चीनचे लष्करी अधिकारी सहभागी झाले होते. वर्षातून दोनदा होणाऱ्या या महत्वपूर्ण चर्चांना ‘मिलिटरी मॅरिटाइम कन्सल्टेटिव्ह ॲग्रीमेंट’ (MMCA) कार्य गट म्हणून ओळखले जाते.

चीनच्या नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “दोन्ही बाजूंनी मुक्त आणि फायदेशीर देवाणघेवाण झाली. प्रामुख्याने चीन आणि अमेरिकेमधील सध्याच्या सागरी आणि हवाई सुरक्षा परिस्थितीवर यावेळी विचार विनिमय केला.”

अमेरिकेच्या मोहिमांवर चीनचा आक्षेप

चीनने आपल्या निवेदनात, अमेरिकेच्या ‘नेव्हिगेशन फ्रीडम ऑपरेशन्स’वरही टीका केली. या मोहिमा तैवान सामुद्रधुनी आणि दक्षिण चीन समुद्रात वारंवार केल्या जातात, जे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आहेत परंतु याद्वारे त्यावर चीन स्वतःचा हक्क सांगतो.

अमेरिकेच्या लष्कराद्वारे होणाऱ्या सागरी आणि हवाई मार्गावरील हालचालींचा संदर्भ देत, चीनच्या नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “चीन कोणत्याही अतिक्रमणाला आणि चिथावणीला ठामपणे विरोध करतो.”

निवेदनात त्यांनी असेही नमूद केले आहे की, “दोन्ही देशांच्या लष्करांदरम्यान झालेल्या नौदल आणि हवाई भेटींच्या विशिष्ट घटनांवरही चर्चा करण्यात आली, ज्यामुळे चीन आणि अमेरिकेचे अग्रभागी कार्यरत नौदल आणि हवाई दल अधिक व्यावसायिक आणि सुरक्षितपणे संवाद साधू शकतील.”

विस्तृत प्रादेशिक चिंता

मागील महिन्यात चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून, यांच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ, यांनी दक्षिण चीन समुद्र आणि तैवानच्या आसपास चीनच्या हालचालींबद्दल चिंता व्यक्त केली होती.

चीन, लोकशाही पद्धतीने शासित असलेल्या तैवानच्या (ज्यावर तो स्वतःचा हक्क सांगतो) आसपास हवाई, नौदल आणि तटरक्षक दलाची तैनाती सातत्याने वाढवत आहे. दरम्यान, तैवानचे सरकार बेटावरील चीनचा सार्वभौमत्वाचा दावा फेटाळून लावते.

पेंटागॉन चीनच्या लष्करी आधुनिकीकरण आणि प्रादेशिक भूमिकेबद्दल संवाद सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. ते चीनच्या आण्विक शस्त्रास्त्रांच्या वाढीव साठ्याबाबत अधिक पारदर्शकता आणि लष्करी कमांडर्ससोबत अधिक ‘थिएटर-लेव्हलवर’ चर्चा करण्याची मागणी करत आहे.

या कार्य गटाची पुढील बैठक 2026 मध्ये होईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleयुकेने भारतीयांसाठी कायमस्वरूपी वास्तव्याचे नियम अधिक कठोर केले
Next articleचीनच्या लाईव्हस्ट्रीमिंग स्वप्नाचे गडद, बेकायदेशीर वास्तव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here