दलाई लामा यांच्या वारसाहक्कावरील चीनच्या प्रभावाला अमेरिकेचा विरोध

0
चीनच्या

दलाई लामा यांची आज अमेरिकन खासदारांच्या एका गटाने धरमशाला येथे भेट घेतली. या निर्वासित तिबेटी आध्यात्मिक नेत्याच्या उत्तराधिकारी निवडीवर चीनच्या प्रभावाला आपला विरोध असल्याचे खासदारांनी यावेळी जाहीर केले.

खासदारांची भेट आणि वक्तव्य

टेक्सासमधील रिपब्लिकन प्रतिनिधी आणि परराष्ट्र व्यवहार सभागृह समितीचे अध्यक्ष मायकेल मॅककॉल यांच्या नेतृत्वाखालील द्विदलीय गटाने दलाई लामा यांची उत्तर भारतातील धर्मशाला येथील त्यांच्या मठात भेट घेतली. दलाई लामा आणि त्यांचे अनुयायी एक दिवस अत्यंत शांततामय मार्गाने तिबेटला परततील अशी आशा मॅककॉल यांनी व्यक्त केली. दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीमध्ये हस्तक्षेप करण्याच्या चीनच्या प्रयत्नांवर त्यांनी टीका करत अमेरिका हा प्रभाव रोखेल अशी ग्वाही दिली.

अमेरिकेचे कायदेविषयक प्रयत्न

तिबेटी नेत्यांशी 2010 पासून रखडलेल्या चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिका चीनवर दबाव आणेल, असे खासदारांनी यावेळी  सूचित केले. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन लवकरच स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा असलेल्या विधेयकाचा हा एक भाग आहे. ‘तिबेट-चीन विवाद कायद्यावरील ठरावाला प्रोत्साहन देणे’ किंवा ‘तिबेटचा निराकरण कायदा’ या शीर्षकाच्या विधेयकाचा उद्देश तिबेटच्या मुद्द्यासंदर्भात अमेरिकेची असणारी ठाम भूमिका चीनपर्यंत पोहोचवणे हा आहे.

ऐतिहासिक संदर्भ

तिबेटमधील चिनी राजवटीविरुद्धच्या अयशस्वी उठावानंतर दलाई लामा 1959 मध्ये भारतात पळून आले. वयाच्या 88व्या वर्षी आरोग्याच्या अनेक समस्यांवरील  वैद्यकीय उपचारासाठी दलाई लामा अमेरिकेला जाणार आहेत. मात्र त्यांचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्न वादग्रस्तच राहिला आहे. चीनचा असा आग्रह आहे की निवडलेल्या उत्तराधिकाऱ्याला मान्यता देण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे. हा दावा तो चीनच्या सम्राटांमार्फत करत असतो. मात्र तिबेटी परंपरेनुसार दलाई लामा यांचा पुनर्जन्म होत असतो. सध्याचे दलाई लामा यांच्या मते त्यांचा उत्तराधिकारी भारतात मिळू शकेल.

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आणि चीनचा प्रतिसाद

अमेरिकन शिष्टमंडळात सभागृहाच्या माजी अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांचाही समावेश होता. त्यांनीच तिबेट कायद्याचे महत्त्व अधोरेखित केले. पेलोसीने जोर दिला की या विधेयकामुळे चीनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. हे विधेयक तिबेटसंदर्भात अमेरिकेची स्पष्ट भूमिका दर्शवणारे आहे.

दलाई लामा यांचा फुटीरतावादी म्हणून निषेध करणाऱ्या चीनने खासदारांनी धरमशालेला दिलेल्या भेटीबद्दल आणि प्रस्तावित कायद्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. चिनी अधिकाऱ्यांनी अमेरिकन खासदारांना ‘दलाई गटा’शी असा संपर्क करणे टाळा असे आवाहन केले असून बायडेन यांना प्रस्तावित विधेयकावर स्वाक्षरी न करण्याचे आवाहन केले आहे. चीनच्या आक्षेपांनंतरही दलाई लामा यांनी यापूर्वी केलेल्या अमेरिकेच्या विविध दौऱ्यांमध्ये राष्ट्राध्यक्षांसह अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. मात्र, बायडेन यांनी 2021 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून दलाई लामा यांची भेट घेतलेली नाही. दलाई लामा यांच्या आगामी अमेरिका दौऱ्यादरम्यान अशा काही बैठका होतील का हे अद्यापही अस्पष्ट आहे.

रेशम
(रॉयटर्स इनपुट्सह)


Spread the love
Previous articleBig Indian Splash At EuroSatory Defence Exhibition
Next articlePutin Visits North Korea, Strengthen Strategic Ties

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here