युक्रेनसाठी अमेरिका 275 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे लष्करी मदत पॅकेज तयार करीत आहे. यात 155 मिमी तोफांसाठी आवश्यक असणारे गोळे, हवेत अचूक मारा करणारी शस्त्रे आणि जमिनीवरील वाहनांचा समावेश आहे. अमेरिकेच्या तीन अधिकाऱ्यांनी गुरुवारी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली.
रशियाच्या सैन्याने ईशान्येकडील खार्कीव्ह शहरावर कित्येक महिन्यांपासून सातत्याने हल्ला सुरू ठेवला आहे. 10 मे रोजी खार्कीव्हच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये उत्तरेकडे जमिनीवरून हल्ला केला, कीवच्या म्हणण्यानुसार हा प्रदेश सध्या दोन प्रकारच्या हल्ल्यांमध्ये अडकला आहे.
शस्त्रास्त्रांची ही नेमकी मदत कशी असेल हे शुक्रवारी जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. या मदतीसाठी प्रेसिडेन्शियल ड्रॉडाउन अथॉरिटीचा वापर होऊ शकतो.
आणीबाणीच्या विशिष्ट काळात कॉंग्रेसच्या मान्यतेशिवाय अमेरिकेच्या स्टॉकमधून वस्तू आणि सेवा हस्तांतरित करण्यास राष्ट्राध्यक्षांना ही मदत देण्याचा अधिकार असतो.
या विषयावर सार्वजनिकपणे चर्चा करणे योग्य नसल्याने या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्सला ही माहिती दिली. $95 अब्ज मदतीच्या विधेयकांचा एक भाग म्हणून, काँग्रेसने युक्रेनला $60.8 अब्ज किमतीच्या विविध प्रकारच्या मदतीला अधिकृत मान्यता दिली, ज्यात $8 अब्ज किमतीच्या अध्यक्षीय प्राधिकरण वस्तूंचा समावेश आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 95 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या परदेशी मदत पॅकेजवर स्वाक्षऱ्या केल्या. यात युक्रेनसाठी सुमारे 61 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा समावेश आहे. अमेरिकेने पेंटागॉनच्या साठ्यातून सुमारे 1.7 अब्ज अमेरिकन डॉलर्सची शस्त्रे पाठवण्याची घोषणा केली असून टप्याटप्याने ती युक्रेनला पाठवण्यास सुरुवात केली आहे.
या पॅकेजमध्ये प्रामुख्याने शस्त्रास्त्रे पुरवठ्याचा समावेश आहे. याशिवाय युद्धभूमीतून अपघातग्रस्त रणगाडे आणि इतर जड शस्त्रास्त्रे माघारी घेऊन येण्यासाठी करण्यासाठी तयार केलेल्या वाहनांचा देखील समावेश आहे. याचा अर्थ यानंतरच्या काळातही रशियाकडून होणारे हल्ले आणि शस्त्रास्त्रांचे नुकसान सुरूच राहणार आहे हे अमेरिकेने गृहीत धरले आहे.
पूरक खर्चाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर लॉकहीड मार्टिन, जनरल डायनॅमिक्स आणि नॉर्थ्रॉप ग्रुमॅनसारख्या सरकारी कंत्राटे मिळवणाऱ्या इतर प्रमुख कंपन्यांसह आरटीएक्सच्या ऑर्डर बॅकलॉगमध्ये वाढ होईल अशी लष्करी विश्लेषकांची अपेक्षा आहे.
आराधना जोशी
(रॉयटर्स)