व्हाईट हाऊसजवळील चकमकीत, U.S. यंत्रणेकडून सशस्त्र व्यक्तीवर गोळीबार

0
व्हाईट
9 मार्च 2025 रोजी, व्हाईट हाऊसबाहेर झालेल्या चकमकीनंतर, बंदूकधारी व्यक्तीवर गोळीबार केलेल्या ठिकाणी पोलीस तपास सुरू आहे. सौजन्य: रॉयटर्स/किया जॉन्सन

व्हाईट हाऊसजवळ रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने एका सशस्त्र व्यक्तीवर गोळीबार केला, ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती एजन्सीने आपल्या एका निवेदनाद्वारे दिली आहे.

ज्यावेळी हा प्रकार घडला, त्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित नव्हते. वीकेंड निमित्त ते आपल्या फ्लोरिडा येथील निवासस्थानी गेले होते.

आत्महत्येचा उद्देश

गुप्तचर सेवा अधिकाऱ्यांना, शनिवारी काही स्थानिक अधिकाऱ्यांकडून एक टिप मिळाली होती, ज्यामध्ये सांगितले होते की “एक आत्महत्या करु इच्छिणारी व्यक्ती, इंडियानाकडून वॉशिंग्टनच्या दिशेने येत आहे आणि त्या व्यक्तीची कार व्हाइट हाऊसपासून एक ब्लॉक अंतरावर सध्या उभी आहे.”

“मध्यरात्रीच्या सुमारास, गुप्तचक सेवा सदस्यांना 17व्या आणि F स्ट्रीट्स, NWजवळ त्या व्यक्तीचा पार्क केलेले वाहन सापडले,” असे वक्तव्यात म्हटले आहे.

सुरक्षारक्षकांनी मिळालेल्या वर्णनाशी साधर्म्य साधणारी एक व्यक्ती, त्यांच्यासमोर चालत असलेली पाहिली.

“जसे अधिकारी त्या व्यक्तीजवळ पोहोचले, तसे त्याने अधिकाऱ्यांच्या दिशेने शस्त्र उगारले आणि संघर्ष सुरु झाला, ज्यादरम्यान आम्ही त्याच्यावर केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला,” असे सुरक्षारक्षकांनी सांगितले.

रुग्णालयात भरती

सदर व्यक्तीला त्वरित स्थानिक रुग्णालयात नेले गेले मात्र त्याच्या स्थितीविषी काही ठोस सांगता येणार नाही, असे एजन्सीच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच या चकमकीत गुप्तचर सेवा कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही, असेही त्यात नमूद केले आहे.

याबाबत वॉशिंग्टन मेट्रोपोलिटन पोलिसांनी सांगितले की, ‘त्यांच्या आंतरिक व्यवहार विभागाचे तपासकर्मी या घटनेचा सखोल तपास करत आहेत, पण याविषयी अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले.’

गेल्या काही वर्षांमध्ये, व्हाइट हाऊसच्या परिसरात किंवा त्याच्या आसपास सशस्त्र व्यक्तींच्या गोळीबाराच्या अनेक घटनांची नोंद झाली आहे, ज्यात 2016 मध्ये व्हाइट हाऊसच्या सुरक्षा गेटवर हँडगन दाखवणाऱ्या व्यक्तीची घटना देखील समाविष्ट आहे.

2023 मध्ये, 20 वर्षीय भारतीय इमिग्रंट साई वर्षित कंदुला, याने भाड्याचा ट्रक वापरुन व्हाइट हाऊसच्या सुरक्षा भिंती तोडण्याचा प्रयत्न केला होता, जो अखेर अपयशी ठरला.

जुलै महिन्यात एका बंदूकधारकाने, पेनसिल्व्हानियातील बटलरमधील रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला होता, ज्यामुळे त्यांच्या कानाला जखम झाली. गुप्तचर सेवेच्या पुनरावलोकनाने असे म्हटले की, कम्युनिकेशन गॅप्स आणि सतर्कतेचा अभाव, अशाप्रकारच्या घटनांना कारणीभूत आहेत.

(रॉयटर्स आणि आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleभारतीय खाजगी क्षेत्राने बनवलेले पहिले LCA Mk1A रिअर फ्यूसलेज वितरित
Next articleChina’s Declining Arms Imports Highlight Surge in Military Self-Reliance: SIPRI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here