तहव्वुर राणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

0
राणाची
2008 मध्ये भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तहव्वुर राणा हा दोषी आहे (छायाचित्र सौजन्यः एक्स आणि आयबीएनएस फाइलमधील व्हिडिओग्रॅब)

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अरोपी तहव्वुर राणा याची भारतात त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली आहे, असे माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.

पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन नागरिक असलेल्या राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सहयोगी न्यायाधीशांकडे आणि नवव्या सर्किटच्या सर्किट जस्टिसकडे “स्थगितीसाठी आपत्कालीन अर्ज” दाखल केला होता.

आपण पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने भारतात आपला छळ केला जाईल, असा दावा राणाने याचिकेत केला होता.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार राणाच्या अर्जात म्हटले आहे की, “या प्रकरणात माझा छळ होण्याची शक्यता आणखी जास्त आहे, कारण याचिकाकर्त्याला मुंबई हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने तीव्र धोका आहे.”

धार्मिक अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत ह्युमन राईट्स वॉचच्या अहवालाचा हवाला देत, भारत सरकार अधिकाधिक निरंकुश होत असल्याचा आरोपही त्याने केला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्याच्या याचिकेत विशेषतः नमूद केले आहे की “जर स्थगिती दिली गेली नाही, तर कोणताही फेरविचार होणार नाही आणि अमेरिकन न्यायालये आपली अधिकारक्षेत्र गमावतील आणि याचिकाकर्त्याचा लवकरच मृत्यू होईल.”

63 वर्षीय राणाने असा युक्तिवाद केला होता की आपल्या प्रत्यार्पणामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होईल. याचिकेत त्याने आपल्या गंभीर वैद्यकीय परिस्थितीचा उल्लेख केला आहे. त्यानुसार त्याला पोटाचा विकार असून सोबत पार्किन्सन आजार आणि मूत्राशयाचा कर्करोग होण्याचे संकेत मिळाले असल्याचे नमूद केले आहे.

पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा सहकारी म्हणून ओळख असलेल्या राणावर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मदत केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात  166 लोकांचा मृत्यू झाला.

सरकारी साक्षीदार बनलेल्या हेडलीने अमेरिकेच्या न्यायालयात साक्ष दिली की राणाने त्याला 2007 ते 2008 दरम्यान मुंबईतील प्रमुख लक्ष्यांची हेरगिरी करण्यास मदत केली.

2011 मध्ये अमेरिकेत राणाला ’26/11′  हल्ल्यांमध्ये थेट सहभाग असल्याच्या आरोपातून मुक्त करण्यात आले असले तरी, लष्कर-ए-तोयबाला आर्थिक पाठबळ देणे आणि डेन्मार्कमधील दहशतवादी कटाला मदत करणे याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले होते.

26/11 झालेला दहशतवादी हल्ला

2008मध्ये मुंबईत झालेला हल्ला जगभरात 26/11 म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तान स्थित इस्लामिक दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या 10 सदस्यांनी संपूर्ण मुंबईला चार दिवस वेठीला धरत 12 ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट घडवून आणले.

 

हे हल्ले बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी सुरू झाले आणि 29 नोव्हेंबर 2008 पर्यंत सुरू राहिले. नऊ दहशतवाद्यांसह किमान 174 लोक मारले गेले आणि 300 हून अधिक जखमी झाले. या हल्ल्यांचा जागतिक स्तरावर निषेध करण्यात आला.

दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई चबाड हाऊस, द ओबेरॉय ट्रायडेंट, द ताज पॅलेस अँड टॉवर, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, द नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारत –  सेंट झेवियर कॉलेजची मागील गल्ली अशा आठ ठिकाणी हे हल्ले झाले.

 

तर मुंबईच्या माझगाव बंदर परिसरात स्फोट झाला तर विलेपार्ले येथे एका टॅक्सीचा स्फोट झाला.

28 नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत ताज हॉटेल वगळता मुंबईत इतर सर्व ठिकाणी मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांनी शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित केली होती.

29 नोव्हेंबर रोजी नॅशनल सिक्युरिटी गार्डने (एनएसजी) उर्वरित दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो हाती घेतले. यामुळे ताज हॉटेलमधील शेवटच्या उर्वरित दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि हल्ले संपुष्टात आले.

टीम स्ट्रॅटन्यूज

(आयबीएनएसच्या इनपुट्सह)

 

 

+ posts
Previous articleChina’s Defence Budget Over Three Times That Of India
Next articleHamas: Trump’s Threats Spur Netanyahu To Evade Gaza Ceasefire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here