अमेरिका, फ्रेंच व ब्रिटीश नौदलाची लाल समुद्रात कारवाई

0

हौती बंडखोरांच्या २८ ‘ड्रोन’चा समाचार

दि. १० मार्च: लाल समुद्रात व्यापारी तसेच नौदलाच्या जहाजांवर हल्ले करून, त्यावरील नाविकांना इजा पोहोचवणाऱ्या हौती बंडखोरांवर कारवाई करीत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटिश नौदलाने त्यांच्याकडील २८ ड्रोन उद्ध्वस्त केल्याची माहिती अमेरिकी सैन्याच्या ‘सेन्ट्रल कमांड’कडून  (सेंटकॉम)  देण्यात रविवारी जारी करण्यात आली. हौती बंडखोर पॅलेस्टाईन समर्थक मानले जातात.

इस्त्राईल व हमास या दहशतवादी संघटनेत गाझापट्टी येथे सुरू असलेल्या युद्धात इस्त्रायली संरक्षण दलांकडून ‘हमास’च्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे सुरू आहे. गाझापट्टीतील सर्वसामान्य लोकांनाही इस्त्राईलच्या कारवाईचा फटका बसत आहे, असा आरोप हौती बंडखोरांकडून करण्यात येत आहे. इस्त्राईल विरोधात लढत असलेल्या ‘हमास’ला पाठिंबा देण्यासाठी हौती बंडखोरांकडून लाल समुद्र व एडनच्या आखतात व्यापारी आणि नौदलांच्या जहाजांवर हल्ले करण्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे व ड्रोनमार्फत हल्ले करून त्यांचे नुकसान केले जात आहे. या हल्ल्यात आर्थिक नुकसानाबरोबरच जीवितहानी सुद्धा होत असल्यामुळे अमेरिका व मित्रदेशांनी हौती बंडखोरांचा उपद्रव असलेल्या सागरी क्षेत्रात संयुक्त गस्त सुरू केली आहे.

दरम्यान, ब्रिटिश नौदलाच्या एचएमएस रिचमंड या फ्रीगेटने शुक्रवारी हौतींची दोन ड्रोन पाडली असून, त्यांच्यावर कारवाई सुरु आहे, अशी माहिती ब्रिटनचे संरक्षणमंत्री ग्रँट शाप्प्स यांनी दिली. या भागातील नाविक मार्गांची सुरक्षा ठेवण्यासाठी व मुक्त व खुल्या सागरी वाहतुकीसाठी ब्रिटन व मित्रदेश हौती दहशतवाद्यांवरील कारवाई सुरूच ठेवणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी हौती दहशतवाद्यांच्या ड्रोनवर कारवाई केल्याचे फ्रान्सकडून सांगण्यात आले. हौतीच्या कारवायांत वाढ झाल्याने युरोप आणि आशिया यांच्यात होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक सुएझ कालव्याऐवजी आफ्रिकेच्या दक्षिणेला वळसा घालून होत आहे, मात्र यामुळे वाहतूक खर्चात प्रचंड वाढ होत असल्यामुळे हा मार्ग व्यवहार्य नाही. त्यामुळेच अमेरिका व इतर देशांनी हौतींवर कारवाई सुरु केली आहे.

दरम्यान, लाल समुद्र व एडनच्या आखतात अनेक अमेरिकी युद्धनौकांवर ड्रोनच्या माध्यमातून आत्तापर्यंत ३७ हल्ले केल्याचा दावा हौती बंडखोरांकडून करण्यात आला आहे. अमेरिकेने मात्र हा दावा फेटाळून लावताना, ‘असे कोणतेही हल्ले झाले नसून अमेरिकी नौदलाचे या कथित हल्ल्यांत कसलेही नुकसान झाले नाही,’ असे स्पष्ट केले आहे.

विनय चाटी  


Spread the love
Previous articleपॅसिफिक बेटांच्या मदतीस अमेरिकी काँग्रेसची मंजुरी
Next articleचीनचाही आत्मनिर्भरतेवर भर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here