भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” उपक्रमाचा एक भाग म्हणून, भारतीय नौदलाच्या जहाजांद्वारे अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडातील परदेशी बंदरांना भेट देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
भारतीय नौदलाच्या जहाजांच्या मोहिमांद्वारे 15 ऑगस्ट 2022 रोजी जगभरातील बंदरावर विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. हा कार्यक्रम सहा खंड, तीन महासागर आणि सहा वेगवेगळ्या टाइमझोनमध्ये आयोजित केला जाणार आहे.
आशियामध्ये मस्कत (ओमान) व सिंगापूर येथे आयएनएस चेन्नई, आयएनएस बेतवा व आयएनएस शरयू; आफ्रिका खंडात मोम्बासा (केनिया) येथे आयएनएस त्रिखंड; पर्थ (ऑस्ट्रेलिया) येथे आयएनएस सुमेधा; उत्तर अमेरिकेतील सॅन दिएगो (यूएसए) येथे आयएनएस सातपुडा; दक्षिण अमेरिकेच्या रियो दि जानेरो (ब्राझिल) येथे आयएनएस तरकश आणि युरोपमधील लंडन (यूके) येथे आयएनएस तरंगिणी या नौका भेट देणार आहेत.
यातील सर्वात लक्षणीय कार्यक्रम म्हणजे अनिवासी भारतीय आणि स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत या जहाजांच्या डेकवर तिरंगा ध्वज फडकवून ध्वजवंदन करण्यात येणार आहे. इतर नियोजित कार्यक्रमांमध्ये यजमान देशाच्या वरिष्ठ नेतृत्वाला भारतीय नौदलाने दिलेली अधिकृत मानवंदना, संबंधित दूतावासातील ध्वजारोहण समारंभात भारतीय नौदलाचा /र क्षकांचा सहभाग, प्रमुख सार्वजनिक ठिकाणी / सभागृहात बँड परफॉर्मन्स, भेट देणाऱ्यांसाठी खुले जहाज, शाळकरी मुलांची सहल / अनिवासी भारतीय, डेकवरील स्वागतकक्ष आणि भारतीय दूतावासांनी आयोजित केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश आहे.
यूके भेटीदरम्यान भारतीय नौदलाच्या तरंगिणी जहाजावरील कर्मचारीवर्ग दोन जागतिक महायुद्धांमध्ये सर्वोच्च समर्पण करणाऱ्या भारतीय सैनिकांना लंडनमधील कॉमनवेल्थ मेमोरियल गेट्स येथे श्रद्धांजली अर्पण करतील. तसेच, भारतीय नौदलाचे कर्मचारी/ प्रतिनिधीमंडळ सिंगापूर येथील क्रांजी युद्ध स्मारक आणि भारतीय लष्करी स्मारक येथे पुष्पचक्र देखील अर्पण करतील. केनियातील मोंबासा येथील भेटीदरम्यान भारतीय नौदलाचे जवान तैता तावेता प्रदेशातील युद्धभूमीवर उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाच्या उद्घाटन समारंभात भाग घेणार आहेत.
पहिल्या जागतिक युद्धादरम्यान पूर्व आफ्रिका मोहिमेमध्ये सहभागी होऊन भारतीय सैनिकांनी या युद्धभूमीवर लढा दिला आणि प्राणार्पण केले होते. या आदरांजली कार्यक्रमांमध्ये युद्धभूमीला भेटी देणे, फिरते प्रदर्शन तसेच भारतीय सैनिकांनी पहिल्या जागतिक महायुद्धात तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे ठळकपणे सादरीकरण करणाऱ्या फोर्ट जिझस येथील ध्वनी-प्रकाश कार्यक्रमाचा समावेश आहे.
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे हे 75वे वर्ष म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हे भारताच्या सागरी पराक्रमाचे पुनरावलोकन आणि पुनरुच्चार करण्याचे पर्व आहे. या दृष्टीने, भारतीय नौदलाने, गेले वर्षभर, देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. वर्ष 2021-22मध्ये महत्त्वाच्या 75 भारतीय बंदरांना जहाजांनी दिलेल्या स्मरणार्थ भेटी, स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त राष्ट्रपतींनी घेतलेला नौदलाचा आढावा, लोकायन 2022 (नौकानयन अभ्यास), स्मारक म्हणून नौदलाने मुंबईत उभारलेला राष्ट्रध्वज, भारताच्या सर्व किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये समाज संवाद कार्यक्रमांचे आयोजन, विविध शहरांमध्ये फ्रीडम रन कार्यक्रमाचे आयोजन, नौकानयन शर्यती, गिर्यारोहण/ सायकलिंग मोहिमा, रक्तदान शिबिरे, किनारपट्टी स्वच्छता मोहिमा, चर्चासत्रे / भारताच्या समृद्ध सागरी वारशाची माहिती सांगणारे कार्यक्रम तसेच विविध शौर्य पारितोषिक विजेते आणि 1947मध्ये अथवा त्यापूर्वी जन्मलेले ज्येष्ठ युद्धसेनानी यांचे गौरव समारंभ या प्रमुख कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.