चीनचे परराष्ट्रमंत्री Wang Yi भारत दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंधांना चालना

0

भारत आणि चीनमधील द्विपक्षीय तणाव कमी करण्याच्या हेतूने एक महत्त्वपूर्ण राजनैतिक पाऊल टाकत, चीनचे परराष्ट्रमंत्री Wang Yi हे, 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान, भारत दौऱ्यावर येणार आहेत. हा दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महिन्याच्या शेवटी चीनमध्ये होणाऱ्या ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)’ परिषदेला होणाऱ्या संभाव्य भेटीच्या पार्श्वभूमीवर होत आहे.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निमंत्रणावरून, वांग यी भारत भेटीसाठी येत असून,  ते भारत-चीन सीमावादावरच्या 24व्या विशेष प्रतिनिधी (SR) स्तरावरील चर्चेत चीनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. यावेळी NSA अजित डोवाल आणि वांग यी यांच्यात LAC वरील तणाव सोडवण्यासाठी पर्यायांवर सविस्तर चर्चा होईल.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वांग यी यांच्या या दौऱ्यात त्यांची भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशीही स्वतंत्र बैठक होणार आहे. या बैठकीत सीमेवरील तणाव निवळवणे, विश्वास पुनर्स्थापित करणे आणि द्विपक्षीय नात्यांतील स्थैर्य यावर भर दिला जाणार आहे.

2020 मधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारत-चीन संबंध तणावपूर्ण राहिले आहेत.

संवेदनशील राजनैतिक पुनर्संचयनाचा प्रयत्न

गलवान घटनेनंतर विशेष प्रतिनिधी स्तरावर बैठक होण्याची ही दुसरीच वेळ आहे. काही सीमावर्ती भागांमधून अंशतः माघार घेण्यात आली असली, तरी महत्त्वाचे वादग्रस्त मुद्दे अद्यापही प्रलंबित आहेत. दोन्ही देशांच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वावर उच्चस्तरीय चर्चेसाठी आधारभूत वातावरण तयार करण्याचा दबाव आहे.

पंतप्रधान मोदी यांची, या सात वर्षांतली चीनमधील पहिली भेट होण्याची शक्यता असून, ते बीजिंगमध्ये होणाऱ्या SCO परिषदेदरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊ शकतात. वांग यी यांचा दौरा या बैठकीसाठी पूर्वतयारी व योग्य संदेशवहन सुनिश्चित करण्याचा एक प्रयत्न मानला जातो.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सांगितले की, “दोन्ही देश “विविध स्तरांवर संवाद ठेवत आहेत” आणि नेत्यांमध्ये झालेल्या “महत्त्वाच्या सहमतीवर कृती करणे आवश्यक आहे.” त्यांनी भारत-चीन संबंधांना “अपरंपार शक्यता असलेले” संबोधले आणि खोल सहकार्य हाच योग्य मार्ग असल्याचे स्पष्ट केले.

धोरणात्मक गणिते आणि अपेक्षा

राजनैतिक विश्लेषकांचे मत आहे की, दोन्ही देशांनी पूर्णपणे नवे संबंध उभारण्याऐवजी, हळूहळू राजकीय संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. या चर्चेमध्ये LAC वरील तनाव कमी करण्याचे उपाय, स्पष्ट संवाद यंत्रणा आणि विश्वास निर्माण करणारे उपाय यावर भर दिला जाईल.

इंडो-पॅसिफिकमधील वाढते तणाव, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महासत्तांमधील स्पर्धा या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन आपापल्या प्रादेशिक हितसंबंधांचे संरक्षण करत असताना परस्पर संबंधांचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहेत.

वांग यी यांचा दौरा हा केवळ एक औपचारिकता नसून, दोन्ही देशांसाठी राजनैतिक समन्वय, सामंजस्य निर्माण आणि सीमावादावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील संभाव्य भेटीच्या पार्श्वभूमीवर हा संवाद विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारतीय नौदलातील लढाऊ विमानांबाबतचा पेच, ‘आत्मनिर्भरतेसाठी’ अडथळा
Next articleभारत-अमेरिका संबंध बिघडत असताना, भारत-चीन संबंध सुधारतील का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here