ट्रम्प यांच्याकडून मोदींचे दिलखुलास स्वागत; भेटीतील ठळक मुद्द्यांवर एक नजर

0

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली. जानेवारी महिन्यात ट्रम्प यांनी कार्यालयीन पदभार स्विकारल्यानंतर, दोन्ही नेत्यांमधील ही पहिली औपचारिक भेट होती.
दोन्ही मोठ्या नेत्यांचा सहभाग असलेल्या या हाय-प्रोफाईल चर्चेमध्ये- द्विपक्षीय राजकीय संबंध मजबूत करणे, व्यापार वाढवणे, अलीकडील टॅरिफ संबंधित चिंता सोडवणे आणि चीनचा वाढता जागतिक प्रभाव यांसारख्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले.
वाढत्या व्यापार तणावांच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनाच्या परस्पर शुल्क लागू करण्याच्या वचनबद्धतेची पुनरावृत्ती केली. भारतासह उच्च शुल्क दर असलेल्या राष्ट्रांकडून आयातीवर समान शुल्क लागू केले जाईल.
“भारत आमच्याकडून जे काही खरेदी करतो, आम्ही केवळ त्यावरच शुल्क आकारु; परस्पर शुल्क आकारण्याचा हा योग्य मार्ग आहे,” असे ट्रम्प यांनी सांगितले.
तरीसुद्धा, दोन्ही नेत्यांनी परस्पर आर्थिक सहकार्यात वाढ करण्याबद्दल आशावाद व्यक्त केला.
संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना, मोदी यांनी भारत-अमेरिका संबंधांच्या महत्त्वावर जोर दिला. ते म्हणाले की, “जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या दोन्ही देशांच्या भागीदारीची स्थापना विश्वास, सामायिक मूल्ये आणि प्रगतीसाठी सामायिक दृष्टिकोन यावर केली गेली आहे.”
ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या भावना व्यक्त करत, मोदी यांना “उत्कृष्ट नेता” असे संबोधले आणि दोन्ही देशांसाठी फायदेशीर असलेल्या भविष्यकालीन व्यापार करारांबद्दल विश्वास व्यक्त केला.
भेटीचे काही महत्वपूर्ण परिणाम:
ऊर्जा भागीदारी: मोदी आणि ट्रम्प यांनी यावेळी एक ऐतिहासिक करार केला, ज्यामुळे अमेरिकेची भारतासाठी प्रमुख तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठादार म्हणून स्थिती निश्चित झाली.
व्यापार आणि शुल्क: ट्रम्प यांनी परस्पर शुल्कावर त्यांचा ठाम दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट केला, व्यापार शुल्कांमध्ये समानता राखण्याची आवश्यकता असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला आणि भारतावर विशेष लक्ष केंद्रित केले.
न्यायालयीन सौदा: अमेरिकेने 26/11 च्या मुंबई हल्ल्यामधील मुख्य आरोपी- ताहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली, ज्यामुळे सुरक्षेच्या संदर्भातील अमेरिकेचे सहकार्य अधोरेखित झाले.
धोरणात्मक सहकार्य: मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वाल्ट्झ, गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबर्ड आणि उद्योगपती विवेक रामस्वामी यांच्याशी देखील चर्चा केली, ज्यामुळे द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत झाले.
चीन आणि जागतिक सुरक्षा: दोन्ही नेत्यांनी Indo-Pacific प्रदेशात चीनच्या वाढत्या प्रभावाला आणि त्याच्या आक्रामक व्यापार धोरणांना तोंड देण्यासाठी आवश्यक रणनीतींवर चर्चा केली.
विकासाचा दृषटिकोन: मोदी यांनी अमेरिकेच्या “मेक अमेरिका ग्रेट अगेन” (MAGA) आणि भारताच्या “विकसित भारत 2047” या उपक्रमातील सहकार्याची महत्त्वपूर्णता अधोरेखित केली आणि आर्थिक समृद्धीसाठी “MEGA” भागीदारीला प्रोत्साहनही दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आमचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि मला विश्वास आहे की आमची व्यापार भागीदारी भविष्यात आणखी मजबूत होईल. आम्ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर असलेले अनेक करार करण्याच्या विचारात आहोत,” असे मत ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केले.
चीनच्या आर्थिक धोरणांबाबत चिंता व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले की, “आपल्याला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की आपला व्यापार सुरळीत राहील. चीनने जागतिक व्यापार प्रणालीचे बऱ्याच काळापासून शोषण केले आहे मात्र इथून पुढे आम्ही ते चालू देणार नाही. आम्ही भारतासह आमच्या अन्य मित्र देशांसोबत, चीनच्या अन्यायकारक पद्धतींचा विरोध करण्यासाठी काम करत आहोत.”
बैठकीतील आणखी एक ठळक मुद्दा म्हणजे, भारताचे अमेरिकेहून तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीमध्ये लक्षणीय वाढ करण्याचे वचन, ज्यामुळे त्याच्या ऊर्जा स्रोतांची विविधता आणखी वाढवली जाईल. ट्रम्प यांनी या कराराचे “क्रांतिकारी विकास” म्हणून कौतुक केले आणि भारताच्या या सुधारित धोरणांमुळे अमेरिकेच्या आण्विक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे अमेरिकन व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण होतील, असेही ट्रम्प म्हणाले.
दरम्यान मोदींनी स्पष्ट केले की, “ऊर्जा सुरक्षा भारताच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि हा करार स्थिर आणि विश्वासार्ह पुरवठा सुनिश्चित करतो. आम्ही अमेरिकेसोबत आपल्या ऊर्जा संबंधांना बळकट करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि अशा तंत्रज्ञानाच्या प्रगतीला सामोरे जाऊ इच्छित आहोत, जे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल,” असेही ते म्हणाले.
बैठकीत महत्त्वाच्या सुरक्षा बाबींवर देखील चर्चा झाली, ज्यात ट्रम्प यांनी ताहव्वुर राणा याच्या त्वरित भारतात प्रत्यार्पणाची घोषणा केली. हा निर्णय दोन देशांमधील कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर सहकार्याच्या बळकटीकरणाचे प्रतिक म्हणून सादर केला गेला.
त्याचप्रमाणे, मोदी यांनी उच्च अमेरिकन अधिकारी, ज्यात NSA मायकेल वाल्ट्झ आणि DNI तुलसी गॅबर्ड यांच्याशी चर्चा केली, ज्यामध्ये सामरिक आणि संरक्षण संबंधित मुद्द्यांवर विचारविनिमय झाला.
“आम्ही या वर्षी भारतातील लष्करी विक्री वाढवू आणि दोघेही एकत्र येऊन दहशतवादाशी लढू,” असे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले.
चीन हा या चर्चेचा एक प्रमुख विषय होता. विशेषतः इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सुरक्षा संदर्भात. ट्रम्प यांनी चीनच्या प्रभावाला प्रतिकार करण्यासाठी मजबूत भागीदारी आवश्यक असल्याचे नमूद केले, “दक्षिण चीन समुद्रातील चीनचा आक्रमक विस्तार आणि त्याच्या आर्थिक धोरणांमुळे जागतिक समुदायाकडून एकजुटीने प्रतिसादाची आवश्यकता आहे. अमेरिका आणि भारत या प्रदेशात स्थिरता राखण्यासाठी एकत्र काम करत राहतील,” असे त्यांनी सांगितले.
मोदी या चिंतेला दुजोरा देत म्हणाले, की “भारत मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक संबंधांसाठी वचनबद्ध आहे. आम्ही अमेरिका आणि अन्य समान विचारधारा असलेल्या राष्ट्रांबसोबत एकत्रितपणे काम करू, जेणेकरून या प्रदेशात शांती, स्थिरता आणि समृद्धी सुनिश्चित केली जाईल.”
अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना, “Our Journey Together” हे त्यांचे पुस्तक भेट म्हणून दिले आणि मोदींना 2020 मधील त्यांच्या ताज महाल भेटीचा एक फोटोही दाखवला.
मोदींची ही वॉशिंग्टन येथील भेट, त्यांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर पार पडली, जिथे त्यांनी फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नागरी आण्विक ऊर्जा यासारख्या क्षेत्रांवर चर्चा केली. तर, वॉशिंग्टन येथे भारत-अमेरिका संबंधांतील गती कायम ठेवण्याच्या महत्त्वावर जोर देत मोदींनी सांगितले, की ‘हा दौरा भूतकाळातील यशावर आधारित पुढे जाण्याची आणि भविष्यातील सहकार्य वाढवण्याची संधी आहे.'”
दोन्ही नेत्यांनी, 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली आणि मजबूत आर्थिक, तंत्रिक आणि सामायिक संबंध निर्माण करण्यावर भर दिला. ज्यामुळे व्यापाराच्या विद्यमान आव्हानांनंतर देखील भारत-अमेरिका संबंधांसाठी सकारात्मक दिशा निश्चित केली गेली.

 


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here