“All Eyes On Rafah” वर इस्रायलचा पलटवार “त्यावेळी तुमचे डोळे कुठे होते?”

0
All Eyes
इन्स्टावर सध्या व्हायरल झालेला फोटो

“All Eyes On Rafah”  हा फोटो जगभरातील ख्यातनाम व्यक्ती, खेळाडू आणि इतर लाखो सोशल मीडिया वापरकर्ते  शेअर  करत आहेत. युद्धग्रस्त गाझामधील दक्षिणेकडील रफाह शहरावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. हमासचा सर्वनाश करण्यासाठी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात रफाह येथील निर्वासित छावणीत मुलांसह किमान 45 नागरिक मारले गेले. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गदारोळ निर्माण झाला आहे. याशिवाय गाझामधील युद्धावरून इस्रायलला जागतिक स्तरावर एकटे पडल्याची भावना अधिक तीव्रपणे दिसून आली आहे.

इस्रायलने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टला प्रत्युत्तर देताना 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याबद्दल पोस्ट का केले नाही असे लोकांना विचारणारे  एक चित्र शेअर केले आहे. हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये सुमारे 1 हजार 160 लोकांचा मृत्यू झाला. यात बहुतांश नागरिक होते. दहशतवाद्यांनी सुमारे 250 ओलिसांना ताब्यात घेतले. त्यापैकी डझनभरांना नोव्हेंबरमध्ये आठवडाभर चाललेल्या युद्धविरामादरम्यान सोडण्यात आले. इस्रायलचा असा विश्वास आहे की 99 ओलिस अजूनही दहशतवाद्यांच्या हातात जिवंत आहेत तर 31 ओलिसांचा मृत्यू झाला आहे.

हमासच्या गाझा येथील आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हमासचा सर्वनाश करण्यासाठी इस्रायलने आखलेल्या लष्करी मोहिमेत किमान 31हजार 112 लोक मारले गेले आहेत.

याचा जागतिक स्तरावर निषेध झाल्यानंतर, इस्रायलने रफाह छावणीला लक्ष्य केल्याचे नाकारले. रॉकेटने हमासच्या शस्त्रागारावर हल्ला केल्याने लागलेल्या आगीमुळे नुकसान झाल्याचे इस्रायलने सांगितले.

एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टमध्ये, बेंजामिन नेतान्याहू सरकारने “7 ऑक्टोबर रोजी तुमचे डोळे कुठे होते” या मजकुरासह एक चित्र शेअर केले. या चित्रात एका बाळासमोर हमासचा दहशतवादी उभा असलेला दाखवण्यात आला आहे.

सुमारे 45 दशलक्ष वापरकर्त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या “All Eyes On Rafah” व्हायरल झाल्यानंतर काही तासांनी इस्रायलने त्याला प्रत्युत्तर दिले. हमासच्या विरोधात इस्रायलच्या लष्करी मोहिमेदरम्यान तिथून पळून गेलेल्या लाखो पॅलेस्टिनींचृया, डोंगरांनी आच्छादलेल्या वाळवंटातील भूप्रदेशात लांबपर्यंत पसरलेल्या तंबूंच्या दाट रांगा या फोटोत दर्शविल्या आहेत.

प्रियांका चोप्रा जोनास, आलिया भट्ट, करीना कपूर खान, माधुरी दीक्षित नेने, वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू या काही भारतीय सेलिब्रिटींनी “All Eyes On Rafah” हा फोटो पोस्ट केला आहे.

आराधना जोशी
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleदेशांतर्गत निर्मित सहाव्या बार्जचे नौदलाकडे हस्तांतर
Next article‘रेड फ्लॅग-२४’साठी भारतीय हवाईदलाची तुकडी अमेरिकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here