रशियाचे अध्यक्ष पुतीन उत्तर कोरियाला भेट का देणार?

0
रशियाचे

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुढील आठवड्यात उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन याच्या भेटीसाठी प्योंगयांगला भेट देणार असल्याचे दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शीतयुद्धाच्या काळापासून दोन्ही देशांमधील संबंध  कसे मजबूत झाले आहेत?

त्यांच्या संबंधांमागचा इतिहास

युक्रेनमधील युद्धामुळे रशियाला पाश्चिमात्य देशांनी एकटे पाडलेले  असताना, उत्तर कोरियाशी त्याची जवळीक वाढत असल्याचे विश्लेषक मानतात. उत्तर कोरियाच्या बाजूने विचार केला तर रशियाशी त्यांचे असलेले संबंध सोव्हिएत युनियनचा जगात ज्यावेळी दबदबा होता त्याकाळात जितके मैत्रीपूर्ण होते तितके नंतर कधीच नव्हते. पण आता मॉस्कोला असणारी मित्रांची गरज लक्षात घेता उत्तर कोरिया त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे.

शीतयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोव्हिएत युनियनच्या पाठिंब्याने कम्युनिस्ट उत्तर कोरियाची स्थापना झाली. उत्तर कोरियाने नंतर 1950-1953 च्या कोरियन युद्धात चीन आणि सोव्हिएत युनियनने केलेल्या व्यापक मदतीच्या जोरावर दक्षिण कोरिया आणि त्याच्या अमेरिका तसंच संयुक्त राष्ट्रांच्या सहयोगींशी युद्ध केले.

उत्तर कोरिया अनेक दशके सोव्हिएतच्या मदतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होता. त्यामुळे 1990च्या दशकात सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर उत्तर कोरियात दुष्काळ निर्माण झाला.

प्योंगयांगच्या नेत्यांनी अनेकदा एकमेकांमध्ये ताळमेळ राखण्यासाठी चीन आणि रशियाचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. 2011 मध्ये सत्तेवर आलेल्या किमचे सुरुवातीला रशिया आणि चीनशी तुलनेने चांगले संबंध होते. मात्र उत्तर कोरियाने केलेल्या आण्विक चाचण्यांवरून अमेरिकेबरोबरच त्यांनीही कठोर निर्बंध लादल्याने या देशांबरोबरचे संबंध बिघडले.

2006 मध्ये उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यास सुरुवात केल्यापासून रशियाने आणखी नवीन निर्बंधांना विरोध करण्यासाठी, अमेरिकेचे निर्बंध रोखणे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद या विषयावर प्रथमच सार्वजनिकरित्या विभाजित करण्यासाठी चीनमध्ये सामील झाले आहे.

मार्चमध्ये, रशियाने उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या दीर्घकालीन निर्बंधांच्या अंमलबजावणीवर देखरेख करणाऱ्या तज्ञांच्या पॅनेलचे वार्षिक नूतनीकरण रोखले.

रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यात संवाद कसा आहे?

2017 मध्ये उत्तर कोरियाने केलेल्या सर्वात अलीकडील आण्विक चाचणीनंतर, रशियाशी संबंध सुधारावेत यासाठी किमनेृ पावले उचलली आणि ते 2019 मध्ये रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात प्रथमच पुतीन यांना भेटले.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, पुतीन यांनी रशियाच्या अति पूर्वेकडील वोस्तोचनी अंतराळ प्रक्षेपण केंद्रात किमचे स्वागत केले. सहकार्य आणि पाठिंब्याच्या इतर अटींसह उत्तर कोरियाला आपण उपग्रह तयार करण्यात मदत करण्याचे आश्वासनही त्यावेळी दिले.

सुरळीत होत चाललेले संबंध आणखी दृढ करण्यासाठी रशियाचे तत्कालीन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी जुलै 2023 मध्ये प्योंगयांगला भेट दिली आणि उत्तर कोरियाच्या बंदी घातलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश असलेल्या शस्त्र प्रदर्शनाचाही दौरा केला. नंतर ते किमच्या बाजूला उभे राहिले फोटो बघायला मिळाले. लष्करी संचलनादरम्यान क्षेपणास्त्रे पुढे सरकत असताना सर्गेई शोइगू यांनी त्यांना सलामही केला.

गेल्या वर्षी किम आणि पुतीन यांची भेट झाल्यापासून वनीकरण, शेतीपासून प्राणीसंग्रहालय आणि संस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर या दोन्ही देशांमधील शिष्टमंडळांचे आदानप्रदान सुरू आहे.

युक्रेनच्या युद्धाचा या संबंधांवर काय परिणाम झाला आहे?

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर पूर्ण तयारीनिशी आक्रमण केल्यानंतर उत्तर कोरियाने रशियाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. रशियन-दावा करत असलेल्या युक्रेनियन प्रदेशांच्या स्वातंत्र्याला मान्यता देणारा हा एकमेव देश होता. याशिवाय युक्रेनच्या काही भागांचे रशियातील विलीनीकरणाला उत्तर कोरियाने पाठिंबा दर्शविला.
अमेरिका आणि इतर देशांनी उत्तर कोरियाने युक्रेनविरुद्धच्या वापरासाठी रशियाला शस्त्रे हस्तांतरित केल्याचा आरोप केला आहे.

2 जानेवारी रोजी युक्रेनच्या खार्किव शहरात कोसळलेल्या क्षेपणास्त्राचे अवशेष हे उत्तर कोरियाच्या ह्वासोंग-11 मालिकेतील बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे होते, असे संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध निरीक्षकांनी सुरक्षा परिषदेच्या समितीला सांगितले असल्याचा अहवाल रॉयटर्सने पाहिला आहे.

रशिया आणि उत्तर कोरिया या दोघांनीही हे आरोप फेटाळले आहेत. मात्र गेल्याच वर्षी त्यांनी लष्करी संबंध अधिक दृढ करण्याचे एकमेकांना वचन दिले.

उत्तर कोरियासोबत संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्याबाबत मॉस्को चर्चा करत असल्याचे शोइगु यांई गेल्या वर्षी रशियन माध्यमांना सांगितले.

“का नाही, ते आमचे शेजारी आहेत. एक जुनी रशियन म्हण आहेः तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांची निवड करू शकत नाही आणि म्हणून तुमच्या शेजाऱ्यांसोबत शांतता आणि सलोख्याने राहणे चांगले,” हे त्यांचे विधान इंटरफॅक्स वृत्तसंस्थेने उद्धृत केले.

आर्थिक संबंध कसे आहेत?

कोविड महामारीच्या काळात रेल्वे प्रवास कमी झाल्यानंतर 2022 मध्ये रशिया आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये प्रथमच रेल्वे प्रवास पुन्हा सुरू करण्यात आला. या पहिल्याच प्रवासातील ट्रेनद्वारे एक विलक्षण वेगळीच मालवाहतूक केली गेली : उत्तम जातीचे 30 घोडे.

त्यानंतर थोड्याच काळाने, रशियाने उत्तर कोरियाला तेल निर्यात पुन्हा सुरू केली, यूएनच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की 2020 नंतर अशा प्रकारची पहिलीच मालवाहतूक नोंदवली गेली.

उत्तर कोरियाचा बहुतांश व्यापार चीनमधून होतो, परंतु रशिया हा देखील महत्त्वाचा भागीदार आहे, विशेषतः तेलासाठी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उत्तर कोरियावरील तेल निर्यातीसाठी संयुक्त राष्ट्रांनी घातलेले निर्बंध मोडण्याचे रशियाने नाकारले आहे. मात्र रशियन टँकर्सनी उत्तर कोरियाला तेल निर्यातीवरील निर्बंध टाळण्यास मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अशा व्यवस्थांवर बंदी घालणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावांनंतरही, रशियन अधिकाऱ्यांनी 20 हजार ते 50 हजार उत्तर कोरियाच्या कामगारांना रोजगार देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या “राजकीय व्यवस्थेवर कसे काम करता येईल यावर” उघडपणे चर्चा केली आहे.

रशियाने कब्जा केलेल्या युक्रेनच्या व्याप्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी उत्तर कोरियाच्या कामगारांना रशियाला बोलावून घेण्याच्या शक्यतेवर रशियन अधिकारी आणि नेत्यांनीही चर्चा केली आहे. सतत निगराणीखाली राहणारे आणि संघर्षमय जीवन जगण्यासाठी क्वचितच पुरेसे उत्पन्न मिळत असलेले उत्तर कोरियाचे बरेच लोक या पर्यायाची निवड करू शकतात.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्स इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleचीनच्या चिथावणीखोर धोरणामुळे दक्षिण चीन समुद्रात ‘अपघाती संघर्षा’चा धोका
Next articleकुवेत अग्निकांडातील मृतांचे पार्थिव भारतात पोहोचले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here