मीम्स, कार्टून्सद्वारे जपानी पंतप्रधानांवरचा राग चीनच्या सोशल मीडियावर व्यक्त

0
जपानच्या पंतप्रधान साने ताकाची यांच्यावरील मीम्स, कार्टून्स, टोमणे आणि ट्रोलिंगचा सोशल मीडियावर पूर आल्याने भारतीय सोशल मीडिया सातत्याने पाहणाऱ्यांना अस्वस्थ करणारी एक गोष्ट आढळेल. जून 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर भारताच्या संदर्भातही हीच गोष्ट करण्यात आली होती.

 

ताकाची यांची चूक म्हणजे क्रॉस-स्ट्रेट सुरक्षेत, म्हणजेच तैवानच्या सुरक्षेत जपानी सहभाग वाढवण्याचे आवाहन करणे आणि चीनसाठी ते स्वीकारणे अर्थातच शक्य नाही. राजनैतिक पातळीवर, टोकियोच्या राजदूतांना बीजिंग येथील परराष्ट्र मंत्रालयात बोलावून देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये अशा ” भयंकर हस्तक्षेपा” विरुद्ध इशारा देण्यात आला होता.

पण खरी कारवाई सोशल मीडियावर झाली जिथे चीनच्या राज्य यंत्रणेने डिजिटल प्रचार यंत्रणा सुरू केली: ज्यात अपमान, टोमणे आणि थट्टा करणाऱ्या मीम्ससह, दुसऱ्या महायुद्धातील जपानी लष्करी गणवेशात असलेल्या ताकाची यांना जपानच्या लष्करी इतिहासाभोवतीचा प्रचार घडवून आणण्याचा चीनचा हेतू स्पष्ट झाला.

 

हा एक संकेत होता: नॅरेटीव्ह तयार झाले होते आणि जनतेने त्याचे अनुसरण करणे अपेक्षित होते. चिनी तरुण सोशल मीडियावर जगतात. त्यांना राष्ट्रवाद आणि मनोरंजन यांचे मिश्रण असणारा कंटेंट कसा द्यायचा हे देशाला अचूकपणे माहिती आहे. मीम्स, छोटे व्हिडिओ आणि चपखलपणे करण्यात आलेला अपमान कोणत्याही अधिकृत विधानापेक्षा वेगाने प्रवास करतात. ज्यामुळे डिजिटल आक्रमकतेचे वातावरण तयार होते आणि ते लवकरच वास्तविक जगाच्या सूचक कृतीत मिसळून जाते.

राष्ट्रवादी असणाऱ्या  “लिटिल पिंक्स” वापरकर्त्यांना जपानविरोधी व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहित केले गेले, तर प्रमुख प्रचारकांनी त्यात तेल ओतले. चीनचे सर्वात जास्त ओळख असणारे राष्ट्रवादी भाष्यकार हू झिजिन यांनी 12 नोव्हेंबर रोजी एक्सवर (पूर्वी ट्विटर) जाऊन ताकाची यांच्यावर राजनैतिक वाद “भडकवल्याचा” आरोप केला आणि जपानला चिनी राजदूतांना देशाबाहेर काढण्याविरुद्ध इशारा दिला. त्यांच्या या ट्विटमध्ये टोकियो आक्रमक आणि बीजिंग नाखूश प्रतिसादकर्ता म्हणून दाखवण्यात आले.

हू झिजिन एक्स ची पोस्ट दाखवणारी प्रतिमा.

चीनने आपल्या नागरिकांना जपानचा प्रवास टाळण्याचे आवाहन करणारा सल्ला जारी केला आहे, ज्यामध्ये ताकाची यांच्या वक्तव्यांना “चुकीचे” संबोधत त्यांनी नागरिकांमधील देवाणघेवाणीचे वातावरण बिघडवले आहे असा दावा केला आहे. आर्थिक परिणाम तात्काळ झाला: जपानशी संबंधित पर्यटन शेअर्समध्ये घसरण झाली आणि विश्लेषकांनी इशारा दिला की या मतभेदामुळे जपानच्या जीडीपीमध्ये 0.36 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.

दरम्यान, चीनच्या तटरक्षक दलाच्या जहाजांनी सेनकाकू बेटांभोवती (चीनमध्ये दियाओयू बेटे म्हणून ओळखले जाणारे) वादग्रस्त जल हद्दीतून “हक्काची अंमलबजावणी करणारा गस्त”  प्रवास केला, ज्याकडे टोकियोने तणावात झालेली वाढ म्हणून पाहिले. तैवानवरील चिनी हल्ला जपानसाठी “अस्तित्वाच्या दृष्टीने धोका” ठरू शकतो या संसदीय वक्तव्यानंतर ही गस्त घालण्यात आली, ज्यामुळे टोकियोला तैवानच्या प्रश्नावर दशकांपासूनच्या “धोरणात्मक अस्पष्टतेपासून” परत एकदा दूर नेले.

टोकियोमधील एका चिनी नागरिकाने एका जिल्ह्यात राष्ट्रीय ध्वज फडकवत स्वतःचे  चित्रीकरण केले, थेट प्रक्षेपणाद्वारे इथे “ईशान्य चिनी लोक प्रथम आले” अशी बढाई मारली आणि त्या पोस्टमध्ये जपानच्या दूतावासाला टॅग केले. या प्रकारामुळे त्याचे  काहीकाळ कौतुक झाले, तर काहींनी त्याचा स्टंट प्रसिद्धीसाठी केलेला प्रकार म्हणून दुर्लक्षित केला.

या वादाला सुरुवात झाल्यापासून, जपानशी संबंधित विषय जवळजवळ दररोज वेइबोच्या (चीनमधील एक्ससारखा सोशल प्लॅटफॉर्म) ट्रेंडिंग यादीत वर्चस्व गाजवत आहेत. परराष्ट्र धोरण, लष्करी तणाव आणि ऐतिहासिक तक्रारी यांचाही चर्चांमध्ये समावेश होता, ज्यामुळे संशय आणि शत्रुत्वाचे अत्यंत स्फोटक वातावरण निर्माण झाले आहे.

ताकाची यांच्या वक्तव्यांना अनुसरून जपान “युद्धभूमी बनत आहे,” “सैन्यवादाचे पुनरुज्जीवन” किंवा ते “त्याचा पराभव विसरत आहे” अशा नॅरेटीव्हजचा समावेश होता.

काही नागरिकांनी या ऑनलाइन प्रकाराला नाट्यमय पद्धतीने  अत्यंत टोकापर्यंत नेले. हेनानमध्ये, एका माणसाने त्याच्या अंगणात फावडे घेऊन विडंबनात्मक “सैन्य परेड” आयोजित केली तर त्याची पत्नी त्यांच्या मुलाला घेऊन गेली. त्याने व्हिडिओला कॅप्शन दिले (खाली व्हिडिओचे कॅप्चर), “मी ऐकले आहे की साने ताकाची त्रास देऊ इच्छित आहे, परंतु त्यांना आधी माझा सामना करावा लागेल.”

या प्रकारांचा अभ्यास केला तर बीजिंगने गेल्या काही वर्षांत सुधारणा केलेल्या पद्धतीचा उलगडा होतो. जेव्हा जेव्हा भू-राजकीय तणाव वाढतो तेव्हा चीन त्याच्या ऑनलाइन परिसंस्थेला दबावाचे साधन बनवतो. सरकारी माध्यमे नेमका कोणता सूर आळवायचा ते निश्चित करतात, influencers तेच संदेश पोहोचवतात, अल्गोरिदम या प्रकाराला खतपाणी घालतात आणि राष्ट्रवादाची कथा पुढे नेतात.

THAAD वरून दक्षिण कोरियाशी, कोविड चौकशीदरम्यान ऑस्ट्रेलियाशी आणि दक्षिण चीन समुद्रात फिलीपिन्सशी झालेल्या वादांमध्ये असाच दृष्टिकोन दिसून आला. प्रत्येक वेळी, बीजिंगने दुसऱ्या देशाला कोंडीत पकडण्यासाठी प्रचार, राष्ट्रवाद आणि आर्थिक संकेत यांचे मिश्रण केले.

रेशम

+ posts
Previous articleभारतात जारी करण्यात आले 80 लाखांहून अधिक ई-पासपोर्ट
Next articleजगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या पुनर्प्रारंभाला जपान देणार मंजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here