तैवान ते आर्थिक विकास, जुन्याच संकल्पनांची जिनपिंग यांच्याकडून पुनरावृत्ती

0
तैवान

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या 2026 च्या नववर्षाच्या भाषणाचा उपयोग तैवानवर जोरदार टीका करण्यासाठी केला. मुख्य भूभागासोबतचे पुनर्मिलन हा एक ”न  थांबवता येणारा कल” आहे, असे ते म्हणाले आणि यावर जोर दिला की, “सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंचे लोक रक्ताच्या नात्यांनी जोडलेले आहेत, जे पाण्यापेक्षाही घट्ट आहे.”

जर हेच खरे होते, तर त्यांच्या सैन्याने त्या छोट्या बेटाभोवती म्हणजेच तैवानभोवती दोन दिवस नौदलाचा आणि फायरिंगचा सराव का केला? तब्बल 200 लढाऊ विमानांच्या मदतीने भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या मोहिमा राबवल्या, याशिवाय तैवानने किनारपट्टीजवळ चीनकडून 27 क्षेपणास्त्रे डागल्याची नोंद केली.

राष्ट्राध्यक्षांचे भाषण राज्य माध्यमांवरून देशभरात थेट प्रक्षेपित करण्यात आले. कदाचित आपला मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी, गेल्या सप्टेंबरमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनिमित्त झालेल्या चीनच्या राष्ट्रीय दिनाच्या संचलनाची छायाचित्रे त्यात दाखवण्यात आली. या संचलनात अण्वस्त्र क्षेपणास्त्रांसह अत्याधुनिक लष्करी उपकरणांचे प्रदर्शन करण्यात आले होते.

वाढ आणि जागतिक स्थिरतेची आश्वासने

ते म्हणाले की, जग ‘परस्परांशी जोडलेल्या अशांतता आणि परिवर्तना’च्या काळातून जात आहे, ज्यात व्यापार युद्धाची एक अप्रत्यक्ष आठवण होती, आणि त्यांनी वचन दिले की चीन ‘इतिहासाच्या योग्य बाजूने’ उभा राहील आणि शांतता, विकास तसेच जागतिक सहकार्य वाढवण्यासाठी इतर देशांसोबत काम करेल.

कम्युनिस्ट पक्षाचे मुख्य सैद्धांतिक नियतकालिक असलेल्या ‘किउशी’मधील एका लेखात शी यांनी म्हटले की, जागतिक स्पर्धेत चीनने ‘सामरिक पुढाकार’ सुरक्षित केला पाहिजे. येणारी वर्षे देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाची असतील असा इशारा देत, त्यांनी लोकांना ‘आत्मविश्वास कायम ठेवण्याचे, गती साधण्याचे आणि उच्च-गुणवत्तेच्या विकासाकडे स्थिरपणे वाटचाल करण्याचे’ आवाहन केले.

जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आत्मविश्वास

शी जिनपिंग म्हणाले की, चीन 2025 सालातील सुमारे 5 टक्के वाढीचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे आणि देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) जवळपास 20 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. यामुळे 2026 ते 2030 या कालावधीसाठी असलेल्या 15 व्या पंचवार्षिक योजनेसाठी एक भक्कम पाया तयार होईल.

ते म्हणाले की, वाढीचा दर निरोगी आणि वाजवी पातळीवर ठेवण्यासाठी आणि सामाजिक स्थिरता राखण्यासाठी सरकार “अधिक सक्रिय स्थूल आर्थिक धोरणांचा” अवलंब करेल.

तंत्रज्ञान हा देखील भाषणाचा एक प्रमुख विषय होता. शी म्हणाले की, चीन जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, चिप विकास, एरोस्पेस आणि लष्करी तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमधील प्रगतीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, या प्रगतीमुळे चीनची वैज्ञानिक आणि तांत्रिक शक्ती नवीन उंचीवर पोहोचली आहे.

एकंदरीत, शी जिनपिंग यांच्या नवीन वर्षाच्या संदेशांचा उद्देश देशाला हे आश्वासन देणे होता की, चीन आपल्या अर्थव्यवस्थेवरील आत्मविश्वास, तंत्रज्ञानावरील श्रद्धा आणि पुढील वर्षांसाठी स्पष्ट दिशा घेऊन स्थिरपणे पुढे वाटचाल करत आहे.

रेशम

+ posts
Previous articleकार निकोबार बेटावरील हवाई दलाच्या सुधारित धावपट्टीचे CDS यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleहिंसक दंगलीनंतर ट्रम्प यांची इराणला धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here