व्यापार चर्चेनंतर शी जिनपिंग यांनी, APEC शिखर परिषदेत नेतृत्व केले

0

शुक्रवारी, दक्षिण कोरियात झालेल्या पॅसिफिक रिम लीडर्सच्या शिखर परिषदेत, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रमुख भूमिका बजावली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांच्यासोबत झालेल्या व्यापार करारासंबंधी प्राथमिक चर्चेनंतर, जिनपिंग कॅनडा, जपान आणि थायलंडच्या नेत्यांची भेट घेणार होते.

ट्रम्प यांनी, दक्षिण कोरिया सोडण्यापूर्वी केलेल्या करार चर्चेनंतर, चीनच्या दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवरील पुढील निर्बंध स्थगित करण्यात येतील, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती होती.

पुरवठा साखळी मजबूत करणे आणि व्यापारातील अडथळे कमी करणे, हे ग्येओंगजू या ऐतिहासिक शहरात झालेल्या चर्चेचे प्रमुख उद्दिष्ट होते. तथापि, 21 सदस्यांचा समावेश असलेल्या या आर्थिक गटाचे निर्णय बंधनकारक नसतात, वाढत्या भू-राजकीय तणावांमुळे यावर एकमत होणे अधिक अवघड झाले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, “शंभर वर्षांत न दिसलेले बदल आता वेगाने घडत आहेत,” असे वक्यव्य, जिनपिंग यांनी शुक्रवारी सकाळी बंद-दाराआड झालेल्या उद्घाटन सत्रात केले.

बहुपक्षीय व्यापार प्रणालीचे संरक्षण आणि अधिक सखोल आर्थिक सहकार्याचे आवाहन करत, जिनपिंग म्हणाले की, “समुद्र जितका खवळलेला असेल, तितके आपण एकत्र राहणे आवश्यक असते.”

ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी त्यांचे प्रतिनिधित्व केले.

जिनपिंग जपानच्या नव्या पंतप्रधानांना भेटणार

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत, जिनपिंग यांच्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. शी जपानच्या नवनिर्वाचित नेत्या- साने ताकाईची यांच्यासोबत भेट घेण्याची अपेक्षा आहे.

त्यांच्यातील ही पहिली बैठक, शुक्रवारी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ताकाईची यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, ‘शी यांच्यासोबतच्या भेटीची तयारी सुरू आहे.’

गेल्या काही वर्षांत, चीन आणि जपान यांच्यातील संबंध काहीसे स्थिर झाले असले, तरी ताकाईची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान असल्याने आणि त्यांच्या राष्ट्रवादी आणि सुरक्षा-धोरणांमुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

पदभार स्विकारल्यानंतर, ताकाईची यांनी घेतलेल्या पहिल्या काही निर्णयांपैकी एक म्हणजे, चीनच्या पूर्व आशियातील वाढत्या लष्करी हालचालींना रोखण्यासाठी जपानच्या संरक्षण क्षमतेत वाढ करणे. तसेच, जपान हे अमेरिकेच्या परदेशातील सर्वात मोठ्या लष्करी तळांचे ठिकाण आहे.

याशिवाय, चीनमध्ये जपानी नागरिकांचे अटक प्रकरण, तसेच जपानी गोमांस, समुद्री अन्न आणि शेती उत्पादनांवरील चिनी आयात निर्बंध, हेही या चर्चेतील संवेदनशील विषय असतील.

चीनसोबत पुन्हा संवाद सुरू करण्याचा कॅनडाचा उद्देश

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि शी जिनपिंग यांची भेट, शुक्रवारी 4 वाजता (0700 GMT) होणार असल्याचे, त्यांच्या कार्यालयाने सांगितले. ही बैठक दोन्ही देशांतील काही वर्षांपासून बिघडलेल्या संबंधांना पुनर्जीवित करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे.

अमेरिकेसोबत तणावपूर्ण व्यापारयुद्धात अडकलेल्या कॅनडाचा उद्देश, त्यांच्यावरील अवलंबित्व कमी करून, नव्या बाजारपेठा शोधणे हा आहे. चीन हा कॅनडाचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.

कार्नी यांचे पूर्व-अधिकारी जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात, चिनी अधिकाऱ्यांनी कॅनेडियन नागरिकांना अटक केली होती आणि काहींना फाशीही दिली होती. तसेच, कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांनी चीनने किमान दोन केंद्र निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचे निष्कर्ष काढले होते. जिनपिंग यांनी त्यावेळी सार्वजनिकपणे ट्रूडो यांना फटकारले होते, आणि असा आरोप केला होता की, त्यांनी त्यांच्यातील चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

कॅनडाने चिनच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 100% कर लावण्याची घोषणा केल्यानंतर एका वर्षाने, चीनने कॅनेडियन कॅनोला आयातीवर अँटी-डंपिंग शुल्क लागू करण्याची प्राथमिक घोषणा ऑगस्टमध्ये केली. दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी यावर चर्चा करण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला भेटले होते, पण यावेळी कोणतीही प्रगती झाल्याचे संकेत मिळाले नाहीत.

दुपारनंतर, थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नवीराकुल, यांच्यासोबत जिनपिंग यांची भेट नियोजित आहे. गेल्या रविवारी, त्यांनी कंबोडियासोबत एक विस्तारित युद्धविराम करार केला होता, ज्याचे निरीक्षण स्वतः ट्रम्प यांनी केले होते.

ट्रम्प यांनी, स्वतःला वारंवार “जागतिक शांततेचा मध्यस्थ” म्हणून गौरवले आहे. जिनपिंग यांनी गुरुवारी ट्रम्प यांना सांगितले की, ‘चीनही अनेक संवेदनशील मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी आणि सामंजस्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे.’

दक्षिण कोरियाला संयुक्त निवेदनाची आशा

“आपण नेहमी एकाच बाजूला असू शकत नाही, पण एकत्र काम केल्याशिवाय सामायिक समृद्धी साधता येणार नाही,” असे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी त्यांच्या उद्घाटनच्या भाषणात म्हटले. म्युंग हे या वर्षीच्या परिषदेचे यजमान आहेत.

दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चो ह्युन यांनी गुरुवारी सांगितले की, ‘मंत्री-स्तरीय बैठकीसाठीच्या संयुक्त निवेदनावरही वाटाघाटी सुरू आहेत, पण त्यांना विश्वास आहे की, शनिवारी शिखर परिषदेच्या अखेरीस हे निवेदन नेत्यांच्या घोषणेसह स्विकारले जाईल.’

“आम्ही अंतिम टप्प्याच्या खूप जवळ पोहोचलो आहोत,” असे ते म्हणाले. मात्र, APEC सदस्य देशांतील दोन मुत्सद्द्यांनी गोपनीयपणे सांगितले की, ‘जागतिक राजकारणातील तणाव पाहता, हे निवेदन फार महत्त्वाचे ठरेल असे वाटत नाही.’

2018 आणि 2019 मध्ये, ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात, APEC ला संयुक्त घोषणापत्र स्विकारण्यात अपयश आले होते.

APEC प्रदेश, जो रशियापासून ते चिली पर्यंत पसरलेला आहे, तो जागतिक व्यापाराच्या 50% आणि GDP च्या 61% साठी जबाबदार आहे.

Nvidia कंपनीचे सीईओ जेन्सन हुआंग, हे आज दुपारी APEC परिषदेतील उद्योग परिषदेत भाषण करणार आहेत.

हुआंग यांच्यासाठी हा आठवडा विशेष महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण Nvidia ही $5 ट्रिलियन मूल्य ओलांडणारी पहिली कंपनी ठरली. तथापि, चीनमधील प्रगत AI चिप्सच्या विक्रीचा मुद्दा जिनपिंग-ट्रम्प बैठकीतील चर्चेत आला नसल्याचे दिसते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleयुक्रेनच्या ऊर्जा केंद्रांवर रशियचे हल्ले, लहान मुलीसह सात जणांचा मृत्यू
Next articleशटडाऊन कायम राहिल्यास अमेरिकेत हॉलिडे एव्हिएशनचे संकट: व्हॅन्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here