रशियातील महत्त्वाचे विरोधी पक्षनेते दिवंगत ॲलेक्सी नवाल्नी यांची पत्नी युलिया नवाल्नी यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी रशियात 15 ते 17 मार्च या काळात मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी दुपारी मतदान केंद्रांवर लांब रांगा लावण्याचे आवाहन त्यांनी रशियन जनतेला केले आहे. निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष म्हणून पुतीन पाचव्यांदा जिंकण्याची अपेक्षा आहे.
“आपण अस्तित्वात आहोत आणि आपल्यापैकी बरेचजण यावर सहमत आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याला निवडणुकीच्या दिवसाचा वापर करण्याची गरज आहे”, असे युलिया यांनी गुरुवारी प्रसारित झालेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. आपल्या दिवंगत पतीचे काम यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. हे प्रस्तावित निषेध आंदोलन “मिडडे अगेन्स्ट पुतीन” म्हणून ओळखले जात आहे.
मतदान केंद्रांवर दुपारी रांगा लावण्याची मूळ कल्पना ॲलेक्स नवाल्नी यांची असून 16 फेब्रुवारी रोजी आर्क्टिक तुरुंगात त्यांचा मृत्यू होण्याच्या दोन आठवडे आधी ती प्रसारित झाली होती. एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) ॲलेक्स यांच्या वकिलांनी पोस्ट केलेल्या संदेशात नवाल्नी म्हणाले होते, “निवडणुकीच्या दिवशीचे आंदोलन ही खरी ‘सर्व-रशियन नागरिकांची निषेध प्रतिक्रिया बनू शकते. जी प्रत्येकासाठी, सर्वत्र उपलब्ध असेल. त्यात लाखो लोक सहभागी होऊ शकतील आणि लाखो लोक ते पाहतील.”
दुपारच्या वेळी मतदान केंद्रांवर येणे ही एक “अतिशय सोपी आणि सुरक्षित कृती” असेल जी कोणताही अधिकारी रोखू शकत नाही, असे युलिया यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. त्यानंतर लोक पुतीन व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराला मतदान करू शकतात किंवा त्यांची मतपत्रिका खराब करू शकतात किंवा मोठ्या अक्षरांमध्ये ‘नवाल्नी’ लिहू शकतात, असे त्या म्हणाल्या.
आपल्या पतीच्या मृत्यूनंतर युरोपियन संसदेला संबोधित करणाऱ्या आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा करणाऱ्या युलिया- ज्यांनी आपल्या पतीच्या मृत्यूसाठी पुतीन जबाबदार असल्याचा आरोप केला-म्हणाल्या की गेल्या आठवड्यात मॉस्कोमध्ये तिच्या पतीच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या मोठ्या गर्दीमुळे आणि अंत्यसंस्कार झाल्यापासून बोरिसोव्स्कोये स्मशानभूमीतील नवाल्नींची कबरीवर नागरिकांकडून कायमच वाहण्यात येत असलेल्या फुलांमुळे आपण भारावून गेलो आहोत.
“हे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे ते मी व्यक्त करू शकत नाही”, असे नमूद करत त्या पुढे म्हणाल्या “ॲलेक्सीने भविष्यातील सुंदर रशियाचे स्वप्न पाहिले होते-आणि ते तुम्ही पूर्ण करणार आहात.”
रामानंद सेनगुप्ता