युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की आपल्या राजीनाम्यामुळे जर युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होणार असेल तर आपण राजीनामा देण्याचा विचार करू. युक्रेनच्या नाटोमधील सहभागासाठी ते राजीनामा देऊ शकतात.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चिडलेल्या झेलेन्स्की यांनी “जर (याचा अर्थ) युक्रेनमध्ये शांतता येणार असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला माझे पद सोडण्याची खरोखर गरज असेल, तर मी तयार आहे,” असे उत्तर दिले. शांतता हा आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा मुद्दा असल्याचेही ते म्हणाले.
“जर नाटो (सदस्यत्व) साठी ती अट असेल तर मी त्वरित पदत्याग करू शकतो,” असे राष्ट्रपती पुढे म्हणाले.
नियमबाह्य नेता?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना ‘हुकूमशहा’ म्हणून संबोधून युक्रेनमध्ये निवडणुका घेण्यावर जोर दिला आहे. कारण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून झेलेन्स्की यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ अधिकृतपणे 2024 मध्ये संपुष्टात आला आहे. तो संदर्भ ट्रम्प यांच्या वक्तव्यामागे आहे. ते एक नियमबाह्य नेता आहे असा दावा करत रशियाने यापूर्वीच युक्रेनमधील परिस्थितीचा हवाला दिला आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण करत असल्याचे घोषित केल्यानंतर तिथे मार्शल लॉ लागू झाला. अशा परिस्थितीत युक्रेनियन कायद्याने निवडणुका घेता येत नाहीत. झेलेन्स्की यांना अवघ्या चार टक्के जनतेचा पाठिंबा असल्याचा खोटा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
“मी अनेक दशके सत्तेत राहणार नाही याची मला जाणीव आहे, मात्र आम्ही पुतीन यांना युक्रेनच्या प्रदेशांवर सत्ता गाजवू देणार देणार नाही,” असे झेलेन्स्की यांनी रविवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा उल्लेख करत म्हटले.
‘डिसइन्फॉर्मेशनचा बुडबुडा’
या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणाने झेलेन्स्की यांचे रेटिंग 63 टक्क्यांवर ठेवले. त्यामुळे रविवारी ट्रम्प यांच्या दाव्यांबद्दल बोलताना झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्या खोट्या विधानांना “धोकादायक” असे संबोधित करताना याचा संदर्भ दिला.
“मला विश्वास आहे की ही चूक नाही, तर जाणीवपूर्वक ही अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे ज्याचा परिणाम होतो,” असे झेलेन्स्की म्हणाले.
झेलेन्स्की यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम “डिसइन्फॉर्मेशन बबल” मध्ये वावरत होते. रविवारी, त्यांनी पूर्वीच्या वक्तव्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. “(माहिती) मला पाठिंबा देणारे फक्त चारच टक्के युक्रेनियन नागरिक आहेत हे रशियन लोकांनी जाणीवपूर्वक पसरवलेल्या खोट्या विधानांपैकी एक आहे, म्हणूनच मी म्हटले की हा एक चुकीचा हल्ला होता,” असे झेलेन्स्की रविवारी म्हणाले.
गेल्या काही आठवड्यांपासून या दोन्ही नेत्यांमधील संबंध झपाट्याने बिघडल्याने ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर टीका केली.
झेलेन्स्की यांनी या युद्धात युक्रेनमध्ये निवडणुका घेण्याच्या कल्पनेला विरोध केला आहे आणि या निर्णयाला देशांतर्गत मुख्य राजकीय विरोधकांचा पाठिंबा आहे.
युक्रेनच्या अध्यक्षांनी असेही सांगितले की त्यांना ट्रम्प यांना युक्रेनसाठी भागीदार म्हणून पाहायचे आहे आणि हे कीव तसेच मॉस्को यांच्यातील मध्यस्थीपेक्षा अधिक आहे.
“मला खरोखरच मध्यस्थी करण्यापेक्षा अधिक हवे आहे … ते पुरेसे नाही,” असे त्यांनी कीव येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
खनिजांबाबतचा करार
ट्रम्प म्हणाले की युक्रेनने अमेरिकेला 500 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा कच्चा माल द्यायला हवा. कीवला पूर्वीच्या जो बायडेन प्रशासनाकडून आधीच मिळालेल्या मदतीच्या बदल्यात हा पुरवठा व्हावा अशी ट्रम्प यांची मागणी आहे.
झेलेन्स्की यांनी गेल्या आठवड्यात यासंदर्भातील अमेरिकेच्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. या करारामुळे वॉशिंग्टनला युक्रेनमधील 50% अत्यावश्यक खनिजे मिळतील, ज्यात ग्रेफाइट, युरेनियम, टायटॅनियम आणि लिथियम यांचा समावेश आहे. यातील काही इलेक्ट्रिक कार बॅटरीमध्ये वापरला जाणारा एक प्रमुख घटक आहे.
युक्रेनला हा करार करायचा आहे, परंतु त्या बदल्यात त्याला स्वतःच्या सुरक्षेची हमी हवी आहे.
शुक्रवारी, त्यांनी सांगितले की अमेरिका आणि युक्रेनियन संघ एका करारावर काम करत आहेत आणि ट्रम्प म्हणाले की लवकरच करारावर स्वाक्षरी होईल.
रविवारी, झेलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की युक्रेनने अमेरिकेला 500 अब्ज डॉलर्स देणे बाकी आहे ही कल्पना नाकारली.
“कोणतीही अशी मदत असू शकत नाही जी आम्हाला जुन्या मदतीसाठी (दिलेल्या मदत) कर्जदार बनवेल.”
झेलेन्स्की यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की वॉशिंग्टनने आपल्या देशाला 67 अब्ज डॉलरची शस्त्रे आणि 31.5 अब्ज डॉलर्सचे थेट बजेट समर्थन रशियासोबतच्या जवळपास तीन वर्षांच्या युद्धात पुरवले होते.
“युक्रेनियन नागरिकांच्या पुढच्या 10 पिढ्यांना कराव्या लागणाऱ्या परतफेडीसाठी मी स्वाक्षरी करणार नाही,” असे झेलेन्स्की यांनी खनिज कराराबद्दल सांगितले.
युक्रेनचे अर्थमंत्री युलिया स्व्हिरीडेन्को यांनी रविवारी सांगितले की, रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या 18% भागात सुमारे 350 अब्ज अमेरिकन डॉलरचा कच्चा माल आहे, आणि त्यासंदर्भात दशकांपूर्वीची माहिती अद्ययावत करण्यासाठी अतिरिक्त भूवैज्ञानिक संशोधन करत आहे.
युक्रेनियन खनिजे विकसित करण्याच्या करारावर त्यांनी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रचनात्मक नवीन चर्चा केल्याचे राष्ट्रपतींचे कर्मचारी प्रमुख आंद्री येरमाक यांनी रविवारी सांगितले.
“आम्ही आमच्या कामात प्रगती करत आहोत. ही एक रचनात्मक चर्चा होती,” असे येरमाक यांनी टेलिग्रामवर लिहिले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)