जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचे ‘झीरो टॉलरन्स’ : अतिरेकी कारवायांमध्ये लक्षणीय घट

0
Image Courtesy: India.com

दहशतवादाविरुद्ध भारताने ‘झीरो टॉलरन्स’चे धोरण स्वीकारले असल्याने जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सुरक्षा दलांच्या दक्षतेमुळे जम्मू आणि काश्मीरमधील अतिरेकी कारवायांमध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे. 2018मध्ये दहशतवादी हल्ल्याच्या 417 घटना घडल्या होत्या. तर, 2021मध्ये अशा 229 घटना नोंदवल्या गेल्या.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. अतिरेकी हल्ल्यांमध्ये झालेल्या घटीचा तपशील देताना नित्यानंद राय म्हणाले की, 2021मध्ये 229 अशा घटनांची नोंद झाली. तर, 2020मध्ये 244, 2019मध्ये 255 आणि 2018मध्ये 417 घटनांची नोंद आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये 2021मध्ये झालेल्या या अतिरेकी हल्ल्यांत 42 जवान शहीद झाले. 2020मध्ये 62, 2019मध्ये 80 आणि 2018मध्ये 91 जवानांना अतिरेकी हल्ल्यांमध्ये प्राण गमवावा लागला होता. याशिवाय, या अतिरेकी कारवायांमध्ये 2021 या वर्षी 41 सर्वसामान्य नागरिक ठार झाले होते. तर, 2020मध्ये 37 आणि 2019 व 2018मध्ये प्रत्येकी 39 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

गेल्या काही महिन्यांत जम्मू आणि काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले आहेत का, असा प्रश्नही मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले की, अलीकडच्या काही महिन्यांत काश्मिरी पंडितांवरील हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. त्यात एकाचा मृत्यू तर, अन्य एक जण जखमी झाला.

काश्मीर खोऱ्यातील अल्पसंख्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना सरकारने केल्या आहेत. येथील सुरक्षाव्यवस्थेसह गु्प्तचर यंत्रणेचे जाळे आणखी मजबूत केले असून येथील परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. शिवाय, ठिकठिकाणी सुरक्षा दलांची गस्त, अतिरेक्यांविरुद्ध मोहीम राबविण्याबरोबरच चेकनाक्यांवर 24 तास तपासणी तसेच एखादा अतिरेकी हल्ला झालाच तर, परतवून लावण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी रोड ओपनिंग पार्टी तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी दिली.

यावर्षीच्या 30 जूनपर्यंत एकूण सात नागरिकांवर हल्ले करण्यात आले. तर, 2021मध्ये 12, 2020 आणि 2019मध्ये प्रत्येकी 28 नागरिकांवर हल्ले करण्यात आले. तथापि, 2018मध्ये 33 नागरिकांवर हल्ले करण्यात आले होते.

घुसखोरीचे प्रयत्न सुरूच
सन 2020-2021मध्ये घुसखोरीचे 176 प्रयत्न झाले. त्यापैकी 2020मध्ये घुसखोरीचे 99 प्रयत्न झाले. त्यात 19 अतिरेकी ठार झाले. तर, 2021मध्ये 77 प्रयत्न झाले आणि त्यात 12 अतिरेक्यांचा खात्मा तर, एका अतिरेक्याला अटक करण्यात आली.

अधिकृत आकडेवारीनुसार, 2021मध्ये एलओसीवरून 31 अतिरेक्यांनी घुसखोरी केली आहे. यावरून जम्मू आणि काश्मीरमधील अतिरेकी कारवायांना फूस लावण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरूच आहे, हे यावरून स्पष्ट होते. 2021मध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकींमध्ये 171 अतिरेकी ठार झाले. त्यात 147 स्थानिक तर 24 पाकिस्तानी अतिरेकी होते. श्रीनगर, पूंछ, पुलवामा, राजौरी, अनंतनाग, बारामुल्ला या भागांमध्ये या चकमकी झाल्या आणि लष्कर ए तैयबा व जैश ए मोहम्मद या संघटनेशी सबंधित हे अतिरेकी होते.

पूर्वी शांत आणि दहशतवादमुक्त समजल्या जाणाऱ्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये अतिरेकी कारवाया वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 13 चकमकी झाल्या आणि एलओसीजवळ लष्कराने घुसखोरीचे सुमारे 6 प्रयत्न उधळून लावले. घुसखोरीसाठी जम्मूकडील एलओसी आणि पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेचा वापर करण्यास अतिरेक्यांनी सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानचे नवे धोरण
काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान कायम प्रयत्नशील असतो, म्हणूनच शस्त्रसंधी असूनही सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. अतिरेक्यांऐवजी अधिकाधिक शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा भारतीय हद्दीत पाठविण्याचे नवे धोरण पाकिस्तानी लष्कराने अवलंबल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे सापडली आहे.


Spread the love
Previous articleRenegotiate Indus Water Treaty With Pakistan: Parliamentary panel
Next articleChina Sore Over Soaring India-Sri Lanka Ties Amid Economic Crisis

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here