लष्करप्रमुखांचे आवाहन: ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मधील संबोधन
दि ०९ एप्रिल: तंत्रज्ञानाचे शस्त्रीकरण करण्याची स्पर्धा जगभरातील विविध देशांमध्ये सुरू आहे. येत्या काळात हे मोठे सामरिक आव्हान असणार आहे. त्यामुळे कोणत्याही अनपेक्षित मुकाबल्यासाठी (ब्लॅक स्वान इव्हेंट) लष्कराने सज्ज राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी केले. वेलिंग्टन येथील ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’च्या ७९ व्या अभ्यासक्रमातील अधिकाऱ्यांशी ते बोलत होते.
भारताच्या तिन्ही सैन्यदलातील भविष्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तामिळनाडूतील वेलिंग्टन येथे असलेल्या ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मध्ये प्रशिक्षण दिले जाते. तिन्ही सैन्यदलातील भविष्यातील ‘स्टाफ ऑफिसर्स’ना प्रशिक्षण देण्यासाठी १९४७मध्ये या महाविद्यालयाची स्थापना झाली होती. या महाविद्यालयात सैन्यदलातील अधिकाऱ्यांबरोबरच निमलष्करी दले व प्रशासनातील निवडक अधिकारी, तसेच मित्रदेशांतील लष्करी अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षित केले जाते. या अधिकाऱ्यांसमोर बोलताना जनरल पांडे यांनी तंत्रज्ञानाचा वापर शस्त्र म्हणून करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे सांगितले. माहिती, माहिती तंत्रज्ञान ते जागतिक पुरवठा साखळी, या सर्वांवरच तंत्रज्ञानाचे शस्त्रीकरण झाल्याचा परिणाम झाला आहे, असे ते म्हणाले.
‘तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत आणि ते सर्वसामान्यांच्या आवाक्यातही आले आहे. याचे जसे फायदे आहेत तसेच काही नकारात्मक बाजूही आहेत; त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या परिप्रेक्ष्यात व त्याच्या आराखड्यानुसार धोक्यांचे परिणामकारक विश्लेषण करणे, अंदाज घेणे, रणनीती आखणे, क्षमता समजून घेणे, धोरणांची आखणी करणे, कोणत्याही धोक्यासाठी सज्ज राहण्याची तयारी करणे व योग्य त्या पद्धतीने त्याला उत्तर देणे, यासाठी तिन्ही सैन्य दलाने परस्पर समन्वयातून काम करणे गरजेचे आहे. ही तिन्ही सैन्य दलाची जबाबदारी आहे,’ असे जनरल पांडे म्हणाले. जगाची एकूणच भूराजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. नवीन सत्ता उदयाला येत आहेत. हा बदल पारंपारिक युद्ध पद्धतीला आव्हानात्मक ठरणारा आहे. त्यामुळे पारंपरिक युद्ध पद्धतीला नवा आयाम जोडण्याची गरज आहे. तंत्रज्ञान तो आयाम असू शकते, असेही जनरल पांडे यांनी स्पष्ट केले.
लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आपल्या भाषणात बदलत्या युद्ध पद्धतीचाही उहापोह केला. तसेच, युद्धाच्या नव्या आयामाबद्दलही त्यांनी चर्चा केली. अवकाश, सायबर, विद्युत चुंबकीय आणि माहिती तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या युद्ध पद्धतीबद्दल त्यांनी आपल्या भाषणात विचार व्यक्त केले. या नव्या युद्ध पद्धतीमुळे युद्ध क्षेत्र अधिक गतिमान व धोकादायक झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याप्रसंगी जागतिक व्यासपीठावर झालेला भारताच्या उदयाबद्दलही त्यांनी चर्चा केली. भारताचे राष्ट्रीय हित जपण्यासाठी सामरिक दृष्टिकोन अधिक विस्तृत करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्याची क्षमता आपल्याला वाढवावी लागेल असेही लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केले.
रविशंकर