‘ऑन द शॉप फ्लोअर’: ‘भारत फोर्ज’च्या बाबा कल्याणी यांची माहिती
दि. १५ एप्रिल: ‘ऑटोमेटिव्ह फोर्जिंग’च्या क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी मानल्या जाणाऱ्या ‘भारत फोर्ज’ने आता आपला मोर्चा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासनाकडे वळविला असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी ‘भारतशक्ती’चे मुख्य संपादक नितीन गोखले यांच्याशी बोलताना दिली. ‘ऑन द शॉप फ्लोअर’ या ‘भारतशक्ती’च्या विशेष मालिकेत ते बोलत होते. कल्याणी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ‘भारत फोर्ज’ अत्यंत वेगाने डिजिटायझेशन आणि नावोन्मेश (इनोव्हेशन) प्रक्रिया राबवित असून, संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करीत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाच्या विकसनाबाबत बोलताना कल्याणी म्हणाले, की आम्ही संशोधन व विकास प्रक्रिया केवळ राबवीत नाही, तर यात आम्ही अग्रेसर आहोत. संरक्षण उत्पादनांच्या संशोधन व विकास क्षेत्रामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आम्ही या क्षेत्रात २०११ पासून काम करीत आहोत व सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपये आम्ही नव्या उत्पादनांच्या विकासासाठी गुंतविले आहेत. भारत फोर्जमध्ये उत्पादित होणारी सर्व संरक्षण सामग्री, मग त्या मोठ्या तोफा असोत वा वाहनाद्वारे ओढून नेण्याच्या अत्याधुनिक तोफा असोत (एटीएजीएस) अथवा रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे वा दारुगोळा असो, हे सर्व आमच्या कंपनीअंतर्गत सुरु असलेल्या संशोधन व विकास प्रक्रियेतून निर्माण झाले आहे. ही उत्पादने तयार करणाऱ्या सर्व विभागांचे आता डिजिटायझेशन झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता ही सर्व प्रक्रिया राबविण्यात येते, असेही कल्याणी यांनी स्पष्ट केले.
‘तोफा बनविण्यासाठी आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. हे सगळे डिजिटल प्रक्रियेतून घडते. ‘एटीएजीएस’ ही या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादित करण्यात आलेली पहिली तोफ आहे. या तोफेची सर्व संशोधन व विकास प्रक्रिया संगणकाने नियंत्रित केलेल्या डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आली आहे व त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे,’ असे कल्याणी यांनी सांगितले. या प्रसंगी कल्याणी यांनी पुण्यातील त्यांच्या नव्या कारखान्याची माहितीही दिली. ‘आम्ही आता केवळ नाविन्यतेच्याच मागे नाही आहोत, तर कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून एका पूर्णपणे डिजिटल अभियांत्रिकी विभागाची उभारणीही करीत आहोत,’ असेही कल्याणी यांनी स्पष्ट केले. आमच्या या दृष्टिकोनामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विशिष्ट क्षेत्रातील चार ते पाच ‘स्टार्ट-अप्स’बरोबर आम्ही आता काम सुरु केले आहे. तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात्त आघाडीवर राहण्याचा आमचा या मागचा दृष्टीकोन आहे, असेही ते म्हणाले. संरक्षण सामग्रीचे उत्पादन आणि त्याच्या निर्यातीचे एक मोठे केंद्र बनण्याची भारताची क्षमता आहे व या सामग्रीचा जगभरात पुरवठा करण्याची ताकदही भारताकडे आहे, असे त्यांनी गोखले यांच्याशी बोलताना स्पष्ट केले. भारतीय लष्कराकडून ‘एटीएजीएस’ पुरविण्याची मागणी अद्याप आमच्याकडे झाली नसली, तरी जगभरात आम्ही त्याची निर्यात करीत आहोत. संरक्षण सामग्रीचा आमचा ८० टक्के व्यवसाय निर्यातीवर आधारित आहे. आम्ही नुकत्याच सहा ‘एटीएजीएस’ निर्यात केल्या आहेत व आणखी सहा या महिन्यात निर्यात करण्यात येतील. आमच्याकडे सध्या ७२ ‘माउंटेड’ तोफांची मागणी आहे. त्याचबरोबर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र व दारुगोळ्याचा पुरवठाही आम्ही अनेक देशांना करीत आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.
आरेखन, अभियांत्रिकी, धातुशास्त्र व उत्पादन कौशल्यातील पाच दशकांच्या परंपरेच्या आधारे ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड’ने (केएसएसएल) नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या संरक्षण सामग्रीचे उत्पादन केले आहे. १५५ मिलिमीटर व्यासाच्या हलक्या होवित्झर तोफा, माउंटेड तोफा, नौदलासाठी उपयुक्त ७६ आणि १२७ मिलिमीटर व्यासाच्या तोफा, छोटी शस्त्रे, दारुगोळा, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र, रणगाडा विरोधी सुरुंग, चिलखती वाहने, संरक्षक वाहने, हवाई संरक्षण यंत्रणा व संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील त्यांची उत्पादने लष्कर, नौदल आणि हवाईदलासाठी उपयुक्त आहेत. त्यांचा संरक्षण सामग्री उत्पादनाचा व्यवसाय भारत फोर्जच्या वृद्धीसाठी तर महत्त्वाचा आहेच, पण या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या भारतासाठीही महत्त्वाचा आहे, असे कल्याणी यांनी स्पष्ट केले. भारत फोर्जची उपकंपनी असलेली ‘केएसएसएल’ या आत्मनिर्भर भारताच्या प्रयत्नात योगदान देण्यासाठी सिद्ध आहे. त्यामुळेच कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘डिजिटायझेशन’वर भर दिला आहे. हा प्रयत्न सिस्टीम इंजीनियरिंग सिस्टीम कॅपॅबिलिटी व डेटा मॅनेजमेंट विषयात महत्त्वाची भूमिका बजावेल.
टीम भारतशक्ती