पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून काश्मीरची पॅलेस्टाईनशी तुलना

0
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

शाहबाज शरीफ यांनी आळवला ‘काश्मीर राग’

 

दि. ०४ मार्च : सत्ताग्रहण करताच पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा ‘काश्मीर राग’ आळवला असून जम्मू-काश्मीरची तुलना युद्धग्रस्त पॅलेस्टाईनशी केली आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानात झालेल्या ‘नॅशनल असेंब्ली’च्या  सार्वत्रिक निवडणुकीत गैरप्रकार करून लष्कराच्या पाठिंब्यावर सत्ता मिळवल्यामुळे लष्कराला खुश करण्यासाठी शरीफ यांनी हे विधान केल्याचे मानले जात आहे. एकीकडे सर्व शेजारी देशांबरोबर पाकिस्तानला चांगले संबंध हवे आहेत, असे म्हणत असतानाच भारताविरोधात गरळ ओकून शरीफ यांनी पाकिस्तानचा दुटप्पीपणा सिद्ध केल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानात शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्त्वाखाली कडबोळे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारला पाकिस्तानी लष्कराचाही पाठींबा आहे. शरीफ यांची गेल्या दोन वर्षांत दुसऱ्या वेळेस पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच ‘नॅशनल असेंब्ली’त केलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी पाकिस्तानातील सर्व राजकीय पक्षांना काश्मीरच्या मुक्ततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. ‘आपण सर्वांनी एकत्र येऊन काश्मीर आणि पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यसंग्रामाला साथ दिली पाहिजे. या भाग स्वतंत्र करावेत, असा ठराव सर्वांनी मिळून ‘नॅशनल असेंब्ली’त मंजूर करावा,’ असे शरीफ या भाषणात म्हणाले. आमच्या शेजारी देशांबरोबरच जगातील आघाडीच्या देशांशीही आम्हाला चांगले संबंध हवे आहेत. मात्र, हे संबंध बरोबरीच्या नात्याचे असणे आवश्यक आहे, असेही शरीफ यांनी स्पष्ट केले. भारत सरकारने मात्र अद्याप शरीफ यांची या विधानावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) हा भारताशी चांगले संबंध ठेवण्यासाठी इच्छुक असल्याचे पाकिस्तानात मानले जाते. त्याला प्रामुख्याने शरीफ यांची व्यावसायिक गणितेही कारणीभूत असल्याचे मानले जाते. शाहबाज यांचे मोठे बंधू व पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ या साठी अधिक उत्सुक मानले जातात, तर शाहबाज यांना पाकिस्तानी लष्कराचा पाठींबा असल्याचे मानले जाते. पहिल्या वेळेस सत्तेवर आल्यानंतर शाहबाज यांनी भारताशी संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भारताने ३७० कलम पुन्हा लागू केल्यानंतरच ही चर्चा करण्यात येईल, असे सांगत ‘यु-टर्न’ घेतला होता. लष्कराने कान पिळल्यानंतर शाहबाज यांनी आपली भूमिका बदलल्याची चर्चा होती. भारताने २०१९ मध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने एकतर्फी निर्णय घेऊन भारतातून त्यांच्या उच्चायुक्तांना माघारी बोलावले होते व भारताशी राजनैतिक  संबंध तोडले होते.

विनय चाटी


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here