प्रशिक्षण सुविधाची माहिती घेतली
दि. १० एप्रिल: लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी चेन्नई येथील ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’ला (ओटीए) भेट दिली. या भेटीत लष्कर उपप्रमुखांनी ‘ओटीए’मधील प्रशिक्षण सुविधांची माहिती घेतली, असे लष्कराच्या माहिती विभागाच्या महासंचालकांच्या (एडीजी-पीआय) ‘फेसबुक’ या समाजमाध्यम ‘अकाऊंट’वर म्हटले आहे.
लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी चेन्नई येथील ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’ला (ओटीए) भेट दिली. ‘ओटीए’चे कमांडंट लेफ्टनंट जनरल माणिक कुमार दास यांनी उपप्रमुखांचे स्वागत केले. या वेळी ‘ओटीए’मध्ये लष्करात अधिकारी म्हणून भारती होण्यासाठी निवड झालेल्या छात्रांसाठी असलेल्या एकात्मिक प्रशिक्षण सुविधा, पायाभूत सुविधा, महत्त्वाचे उपक्रम यांची माहिती त्यांना देण्यात आली. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी या वेळी तेथील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यात प्रशिक्षणार्थी महिला अधिकारी व मित्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा समावेश होता. लष्कर उपप्रमुखांनी साधलेल्या प्रेरणादायी संवादामुळे या भविष्यातील अधिकाऱ्यांना स्फूर्ती मिळाली, असे ‘एडीजी-पीआय’ने म्हटले आहे. जनरल द्विवेदी यांनी या प्रसंगी ‘ओटीए’च्या वैभवशाली परंपरेची जपणूक केल्याबद्दल ‘ओटीए’चे कमांडंट व कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले.
दक्षिण भारत विभागाला भेट
जनरल द्विवेदी यांनी या दौऱ्यात लष्कराच्या दक्षिण भारत विभागाला मुख्यालयालाही (दक्षिण भारत एरिया) भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दक्षिण भारत विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांनी त्यांचे स्वागत केले व विभागाच्या कार्याची माहिती दिली. विभागातील नव्याने करण्यात आलेल्या बदलांबाबत ही उपप्रमुखांना माहिती देण्यात आली. जनरल द्विवेदी यांनी मुख्यालयाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली व भविष्यात लष्करात होणाऱ्या फेरबदलांना सामोरे जाण्यासठी ‘डीजीटायझेशन’ व नावोन्मेश आदी बाबीवर अधिक जोर देण्याचे आवाहन केले. या वेळी दक्षिण भारत विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विनय चाटी
स्रोत: ‘एडीजी-पीआय’