इराणी ‘ड्रोन’चा चीन ‘आचार्य’

0
Iran's
इराणी ड्रोनचे संग्रहित छायाचित्र.

चीनच्या मदतीनेच बहरतोय इराणी ‘ड्रोन’ उद्योग

दि. १२ एप्रिल: ‘ड्रोन’ची निर्मिती, विकास व उत्पादनात इराणने घेतलेल्या अविश्वसनीय आघाडीमुळे जागतिक संघर्षाचा आयाम पूर्णतः बदलून गेला आहे. सुदान, सीरिया, युक्रेनबरोबरच बऱ्याच देशांकडून इराणी ‘ड्रोन’चा वापर सुरू आहे. इतकेच नव्हे, तर दिवसेंदिवस तंत्रज्ञानाने अत्याधुनिक होत चाललेल्या या ड्रोनचा वापर अनेक देशांच्या लष्करांकडून आणि दहशतवाद्यांकडूनही सुरू झाला आहे. इराणवर अमेरिकेसह युरोपीय देशांनी निर्बंध घालूनही, त्याच्या ‘ड्रोन’ उद्योगात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाच्या विकासात आणि उत्पादनात इराणने घेतलेली आघाडी लष्करी व सामरिकदृष्ट्या कळीची ठरणार आहे. आपल्या सीमेच्या पलीकडेही प्रभाव निर्माण करण्यासाठी इराणला ‘ड्रोन’ व्यवसायातील हे यश महत्त्वाचे ठरणार आहे.

इराणने ‘ड्रोन’च्या उत्पादनात गेल्या दोन वर्षात घेतलेली आघाडी लपून राहिलेली नाही. दक्षिण अमेरिका व मध्य आशियातील किमान पाच देशांमध्ये इराणचे ‘ड्रोन’ उत्पादनाचे प्रकल्प सुरू आहेत. रशियाच्या लष्कराकडून इराणी ‘ड्रोन’चा वापर युक्रेनविरोधी युद्धात सातत्याने केला जात आहे. या आत्मघाती ‘ड्रोन’चा (कामिकाझे ड्रोन) वापर रशियाने युक्रेनच्या ऊर्जा क्षेत्राला व शहरी भागाला लक्ष्य करण्यासाठी सातत्याने केला आहे. इतकेच नव्हे, तर रशियाने इराणी ‘ड्रोन’चा उत्पादन प्रकल्पही  सुरु केला असून, त्याचा वापर युक्रेन विरोधात केला जाणार आहे.

अत्यंत कमी खर्चात व तुलनेने कमी तंत्रज्ञान वापरून निर्माण केलेले इराणी ड्रोन पश्चिम आशियाच्या स्थैर्याच्या दृष्टीने काळजीचा विषय बनले आहेत. इस्त्राईलने नुकताच सीरियात इराणच्या दूतावासावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड’ या सुरक्षादलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्याची धमकी इराणने इस्राईलला दिली आहे. या हल्ल्यासाठी इराणकडून ‘ड्रोन’चा वापर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर इराणचे आत्मघाती ‘ड्रोन’ सुरक्षेचे मोठे आव्हान उभे करणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. इराणच्या आत्मघाती ‘ड्रोन’च्या  हल्ल्यात अमेरिकेच्या जॉर्डन येथील टॉवर-२२ या लष्करी तळावरील तीन जवान मृत्युमुखी पडले होते. तर, या हल्ल्यात ४० जण जखमी झाले होते.

येमेनमधील हौती बंडखोरांकडूनही लालसमुद्रातील समुद्री व्यापारी मार्गावर व व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यासाठी इराणी ‘ड्रोन’चा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सुवेझ कालव्यातून होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक सुमारे ५० टक्क्यांनी घटली आहे. जानेवारी २०२४मध्ये  हौती बंडखोरांनी लाल समुद्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणी ‘ड्रोन’चा वापर करून १८ हल्ले केले होते. हे सर्व हल्ले येमेनमधून करण्यात आले होते. सौदी अरेबियानेही हौतींची ‘ड्रोन’ पाडली होती. येमेनेने हौती बंडखोरांना पाठींबा दिल्यामुळे सौदी व अखातातील इतर देशांबरोबर येमेनचे संबंध ताणले गेले आहेत. इराणी ‘ड्रोन’ हौती बंडखोरांना सहज उपलब्ध होत असल्यामुळे अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हातात (नॉन स्टेट ॲक्टर्स) पडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे, तर ऑक्टोबरमध्ये गाझापट्टीतील युद्ध सुरू झाल्यापासून इराणचा पाठिंबा असलेल्या दहशतवादी गटांनी अमेरिकेच्या पश्चिम आशियातील विविध लष्करी तळांवर ड्रोन हल्ले केले आहेत. ‘ड्रोन’ तंत्रज्ञानात इराणने घेतलेल्या आघाडीमुळे हा संघर्ष केवळ पश्चिम आशिया पुरता मर्यादित राहिलेला नाही. तर, पाकिस्तानसारख्या देशांपर्यंतही तो पोहोचला आहे. पाकिस्तानच्या सीमा भागात इराणकडून दहशतवादी गटांना पाठिंबा आणि मदत करण्यात येत असल्याबद्दल पाकिस्तानकडून सातत्याने आरोप करण्यात येतात. पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि खैबर पाख्तुन्खा प्रांतात इराणच्या पाठिंब्याने दहशतवाद्यांनी हल्ल्यांचे सत्र अवलंबिले आहे, असा आरोप पाकिस्तानकडून करण्यात येतो. या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करासह नागरिकांनाही लक्ष्य केले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही आपल्या ताज्या अहवालात ‘ड्रोन’सारख्या तंत्रज्ञानाची उपलब्धता दहशतवादी गटांना झाल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांततेच्या दृष्टीने हे धोकादायक असल्याचे मत या अहवालात नोंदविण्यात आले होते. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी धोरण ठरविण्याच्या दृष्टीने अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टीन यांनी एका विशेष दलाची स्थापना केली असल्याचेही सांगितले जाते. ‘ड्रोन’चे तंत्रज्ञान चोरट्या मार्गाने दहशतवाद्यांना पुरवण्यात इराणी सरकारचा हात असल्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे.

चीनची मदत

इराणमध्ये बहरत असलेल्या ‘ड्रोन’च्या उद्योगाला चीनचा पाठिंबा असल्याचे लपून राहिलेले नाही. युक्रेनने एप्रिल २०२३ मध्ये त्यांच्यावर डागलेले एक इराणी ड्रोन पाडले होते. या ड्रोनमध्ये नेव्हीगेशन यंत्रणेसाठी चिनी तंत्रज्ञान वापरल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळेच इराणच्या ‘ड्रोन’ उद्योगाच्या भरभराटीला त्यांचे चीनबरोबरचे सहकार्य कारणीभूत आहे असे मानले जाते. या भागीदारी मुळेच इराणचे ‘ड्रोन’ तंत्रज्ञानातील वर्चस्व वाढले आहे. चीनने इराणला ‘एरोडायनामिक्स,’ ‘एव्हिओनिक्स,’ व ड्रोनला आवश्यक असणारी प्रोपल्शन यंत्रणेचे महत्त्वाचे सुटे भाग पुरविल्याचे म्हटले जाते.

चीन आणि इराणच्या ‘ड्रोन’बाबतच्या सहकार्यामागे भूराजकीय कारण महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे. चीनबरोबरील सहकार्यामुळे इराणची तंत्रज्ञानातील ताकद वाढणार आहे. तर, पश्चिम आशियातील अधिक विस्तृत उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी चीनला इराणची मदत होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २०२३मध्ये इराणच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या आयात-निर्यातीवर बंदी घातली होती. तीनशे किलोमीटरपेक्षा अधिक पल्ला असणाऱ्या दोनच्या निर्मितीवर आजही बंदीच आहे. असे असूनही चीनकडून इराणला सातत्याने ड्रोनच्या सुट्या भागांचा पुरवठा करण्यात येत आहे. दोन्ही देशातील अनेक दशकापासून सुरू असलेल्या राजनैतिक व लष्करी भागीदारीमुळेच हे शक्य झाल्याचे म्हटले जाते. अमेरिकेच्या पश्चिम आशियातील वर्चस्वाला शह देण्यासाठी चीनला इराणची गरज आहे. त्यामुळेच चीन इराणबरोबरील आपले लष्करी सहकार्य वाढवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चीनने इराणला अत्याधुनिक ‘ड्रोन’ तंत्रज्ञान पुरविले आहे. या उभय देशांदरम्यानची सामरिक भागीदारी म्हणून याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे भविष्यात इराणी ड्रोनच्या दहशतीपासून वाचायचे असेल, तर इराणला पुरविण्यात येणाऱ्या ‘ड्रोन’ तंत्रज्ञानावर स्वतः चीननेच पुढाकार घेऊन बंदी आणावी लागेल, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्याचबरोबर इराणी ड्रोनला रोखण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पुनीत श्याम गोरे

 

 


Spread the love
Previous articleरशियाच्या अंगाराचे तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी प्रक्षेपण
Next articleमॉस्कोसारखाच अमेरिकेतही दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here