भारत-ओमान हवाईदलाची संयुक्त सरावाची योजना

0

‘एअर स्टाफ टॉक्स’: द्विपक्षीय सहकार्य व क्षेत्रीय सुरक्षेवर भर

दि. ०२ मे: द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी व क्षेत्रीय सुरक्षेसाठी एकत्रित काम करण्यावर भारतीय हवाई दल आणि ओमानचे शाही हवाई दल यांच्यात गुरुवारी झालेल्या ‘एअर स्टाफ टॉक्स’मध्ये एकमत झाले. त्याचबरोबर दोन्ही हवाईदलांत समन्वय प्रस्थापित व्हावा, या उद्देशाने संयुक्त हवाई सरावाचे आयोजन करण्याबाबतही विचार करण्यात आला, अशी माहिती हवाईदलाने ‘एक्स’ या ‘मायक्रोब्लॉगिंग’ संकेतस्थळावर दिली आहे.

ओमानच्या शाही हवाईदलाचे शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर असून, यादरम्यान उभय हवाईदलांच्या ‘एअर स्टाफ टॉक्स’चे दहावे सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात उभयपक्षी सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही हवाईदलांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याबाबत चर्चा झाली. ‘एअर स्टाफ टॉक्स’ दरवर्षी उभय हवाईदलांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संवाद राहण्यासाठी आयोजित केले जातात. या चर्चेदरम्यान दोन्ही हवाईदलांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय सुरक्षेबरोबरच विविध सामरिक  आणि कार्यान्वयक विषयक मुद्द्यांवरही चर्चा केली. हवाईदलातील समन्वय साधण्याच्या उद्देशाने द्विपक्षीय सराव, प्रशिक्षण सुविधा व क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून संबंधवृद्धी आणि क्षमता वृद्धीसाठी प्रयत्न, अशा विविध शक्यतांवर या बैठकीत दोन्ही हवाईदलांच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा झाली. या दोन दिवसीय बैठकीत दोन्ही बाजूच्या वरिष्ठ अधिकारी तसेच प्रतिनिधींनी आपापल्या हवाईदलांबाबत मौल्यवान माहितीची देवाणघेवाण केली, असेही हवाईदलाकडून सांगण्यात आले आहे.

‘एअर स्टाफ टॉक्स’मध्ये प्रामुख्याने द्विपक्षीय हवाई सरावाबाबत चर्चा करण्यात आली. अशा स्वरूपाचा द्विपक्षीय सराव सातत्याने आयोजित करण्यात यावा; त्यामुळे दोन्ही देशांना जाणविणारे समान सुरक्षा विषयक धोके आणि त्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारी याबाबत एकत्रितपणे काम करता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच, व्यक्तिगत आणि व्यावसायिक विकासाच्या उद्देशाने प्रशिक्षण सुविधा अधिक सक्षम करण्यावरही या चर्चेत भर देण्यात आला. त्यामुळे उभय देशातील हवाईदलांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची क्षमत वृद्धी आणि कार्यपद्धतीत सुधारणा होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

विनय चाटी


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here